आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला आई-वडिलांकडून मारहाण, फरपटत माहेरी आणले

फोटो स्रोत, Nitesh raut
मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या आईवडिलांनीच तिला मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिला मुलाच्या घरातून फरफटत बाहेर आणल्याचा प्रकार समोर आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावात ही घटना घडली.
नवविवाहित दांपत्याने दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 28 एप्रिलला आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता. त्यानंतर 4 मे रोजी मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला मारहाण केली आणि तिला जबरदस्तीने मुलाच्या घरातून फरफटत घरी नेले, असा आरोप नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दहा बारा जणांनी मुलीला फरफटत नेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सावरखेडमधील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील 21 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. मुलगी मराठा समाजातली आहे, तर मुलगा माळी समाजातला आहे.
पण मुलीच्या घरच्या मंडळींचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. पण त्यांचा विरोध न जुमानता प्रेयसी आणि प्रियकराने 28 एप्रिल रोजी अमरावतीच्या आर्य समाज मंदिरात विवाह केला. विवाहानंतर दोघेही अंबाडा येथे पतीच्या निवासस्थानी राहू लागली.

फोटो स्रोत, Nitesh raut
इथे मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी कुठे गेली याबाबत शोधाशोध केली असता ती अंबाडा येथे असल्याचं त्यांना समजलं.
मुलीच्या आई-वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे 4 मे रोजी मुलीचे आई-वडील आणि इतर नातेवाईक असे सुमारे दहा-बारा जण मुलाच्या घरी गेले.
दरम्यान, दोन्ही पक्षांची मुलाच्या घरी बैठक सुरू असताना अचानक मुलीचे आई-वडील आणि इतरमंडळींनी तिला खेचले. यानंतर मुलीला अक्षरशः फरफटत घराबाहेर नेले.
या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ मुलाच्या कुटुंबीयांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर मुलाकडच्या मंडळींनी या घटनेबाबत मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलगी सासरी परतली
पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक घटनास्थळी रवाना केलं. नवऱ्या मुलाने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करून योग्य ती कारवाई करू, असं मोर्शी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Nitesh raut
पण तीन दिवस होऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल मुलाकडच्या मंडळींनी नाराजी दर्शवली होती.
अखेर, मुलीचा जबाब घेण्यासाठी पोलीस सावरखेडला पोहोचले. यावेळी मुलीने सासरी जाण्याची इच्छा पोलिसांसमोर व्यक्त केली.
"नवऱ्या मुलासोबत नांदायचे आहे, पण आई-वडिलांविरुद्ध कोणतीही तक्रार द्यायची नाही,"असं मुलीने म्हटलं.

फोटो स्रोत, Nitesh raut
यावेळी घरच्या मंडळींनीही आपली कठोर भूमिका सोडून देत मुलीशी चर्चा केली. अखेर, तिला सासरी पाठवण्याबाबत सर्व नातेवाईकांनी सहमती दर्शवली.
मुलगी सज्ञान आहे. तिला तिच्या नवऱ्याच्या घरी जायचे आहे, आर्य समाज पद्धतीने त्यांचे लग्न झाले आहे, असं सांगत तिची पाठवणी पुन्हा सासरी केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी दिली.
( या बातमीसाठी अमरातवतीहून नितेश राऊत यांनी इनपुट पाठवले आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























