आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस: 'गेल्या जन्मी मी कदाचित तात्या टोपे, झाशीच्या राणींसोबत इंग्रजांविरुद्ध लढलो असेन'

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. गेल्या जन्मी मी कदाचित तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत इंग्रजांविरुद्ध लढलो असेन - देवेंद्र फडणवीस

"मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. मागील जन्म असेल तर कदाचित 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत इंग्रजांविरुद्ध लढलो असेन," असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

अयोध्येतील बाबरी मशीद कोणी पाडली या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेत सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यादरम्यान बोलताना फडणवीस यांनी वरील शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

बाबरी पाडली तेव्हा आपण अयोध्येमध्ये होतो असा दावाही फडणवीसांनी केला होता.

त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी, "1857 च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल," अशी शब्दांत खोचक प्रतिक्रिया नोंदवली.

आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, "तुम्ही मागील जन्मात असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते 1857 ला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचं बंड होत असं ते मानतात". ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग नाही, पुणे पोलिसांची न्यायालयात माहिती

शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग नाही, असं पुणे पोलिसांनी न्यायालयात म्हटलं आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातूनही संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

संभाजी भिडे

फोटो स्रोत, RAJU SANADI/BBC

राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे हा हिंसाचार झाला होता. यामध्ये संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा पहिला हक्क - अजित पवार

जल, जंगल आणि जमिनीवर स्थानिक आदिवासींचा पहिला हक्क असून त्या दृष्टीने वन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. आदिवासी योजना परिणामकारकरित्या राबवाव्यात, कृषीसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वनहक्क मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी, या सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केली. ही बातमी लोकमतने दिली.

4. म्हाडाने दिलेला प्लॉट सुनील गावस्कर यांनी परत केला

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी त्यांच्याकडे 33 वर्षांपासून असलेली महाराष्ट्र सरकारचा एक प्लॉट परत केला आहे.

सुनील गावस्कर

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईतील वांद्रे या भागात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी ही जमीन गावस्कर यांना देण्यात आली होती. मात्र तब्बल 33 वर्षांपासून ही जमीन ओस पडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर गावस्कर यांनी ही जमीन परत केली आहे.

तीस वर्षांनंतरही या प्लॉटचा वापर न झाल्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर नाराजी व्यक्त करत ओस पडलेला हा प्लॉट परत करण्याची गावस्कर यांना विनंती केली होती, त्यानुसार हा प्लॉट सुनील गावस्कर यांनी परत केला आहे. ही बातमी एबीपी लाईव्हने दिली.

5. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देऊन पळ काढल्याचा आरोप लावत मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेकडून ठिकठिकाणी मनसेसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न काल (4 मे) करण्यात आला होता. यादरम्यान पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू होतं.

पण, मुंबईत पोलीस जेव्हा चौकशीसाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून घटनास्थळाहून निसटले.

त्यावेळी या झटापटीदरम्यान एक महिला कॉन्स्टेबल खाली पडल्या. त्यामुळे या प्रकरणात संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि संदीप यांचा वाहनचालक यांच्यासह तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)