छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही, तिचा जीर्णोद्धारही केला नाही- संभाजीराजे भोसले #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली नाही, तिचा जीर्णोद्धारही केला नाही- संभाजीराजे भोसले
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही वा तिचा जीर्णोद्धार केला नाही. कोणाही व्यक्तीला इतिहासावर बोलायचे असेल तर इतिहासाचा अभ्यास करून जबाबदारीने बोलले पाहिजे, असे मत संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील जाहीर सभेमध्ये, रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असल्याचे विधान केले होते. हे विधान वादग्रस्त ठरले असून राज्यात ठाकरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली जात आहे. ''छत्रपतींचा वंशज म्हणून मी स्पष्ट करू इच्छतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1925 मध्ये करण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले विधान ऐतिहासिकदृष्टय़ा चुकीचे ठरते'', असे संभाजीराजे म्हणाले.
1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी राजर्षि शाहू महाराजांना पत्र लिहून समाधीच्या जिर्णोद्धारासाठी उभा करत असलेल्या 'शिवाजी फंडा'साठी निधी द्यावा, अशी विनंती केली होती. शाहू महाराजांनी मोठी रक्कम या फंडासाठी दिल्याचा उल्लेख तीन पत्रांमधून मिळतो. 'शिवाजी फंडा'तील निधी डेक्कन बँकेत जमा केला गेला. ही बँक बुडीत निघाल्यामुळे 'शिवाजी फंडा'तील पैसे जीर्णोद्धारासाठी वापरता आले नाहीत. त्यानंतर 1925 मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला गेला, असे संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.
2.गुन्ह्यामुळे नोकरीवरून काढता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
'आपल्यावरील गुन्ह्याची माहिती लपविणे अथवा चुकीची माहिती दिल्याबद्दल एखाद्याला तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही,' असा निकाल सर्वोच्च न्यायालयातील न्या. अजय रस्तोगी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिला. या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
पवनकुमार नावाच्या व्यक्तीने रेल्वे सुरक्षा दलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील बाब स्पष्ट केली. पवनची रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून (आरपीएफ) निवड झाली होती. प्रशिक्षण सुरू असतानाच तडकाफडकी त्याला कमी केल्याचा आदेश आरपीएफ प्रशासनाने काढला. भरती होण्याआधी आपल्याविरोधातील 'एफआयआर'ची माहिती लपविल्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असे स्पष्टीकरण 'आरपीएफ'कडून देण्यात आले.
एखादी व्यक्ती खटल्यात दोषी ठरली की नाही, याचा विचार न करता केवळ तिच्याविरोधातील गुन्ह्याची माहिती लपविल्याबद्दल पेनाच्या फटकाऱ्यासरशी कोणालाही नोकरीवरून काढून टाकता येणार नाही. मात्र, नोकरीला लागण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या चारित्र्याबाबतची सत्य माहिती आणि पडताळणी सादर करणे आवश्यकच आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
3.राणा दाम्पत्याच्या घराची महापालिकेकडून पाहणी
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे.
प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा हे दोघंही गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी कोणीच नाही. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर आज नोटिस चिकटवली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
4. भाजप राजस्थानला लक्ष्य करत आहे- गेहलोत
जोधपूरमध्ये दंगल झाली असती. हे सर्व करौलीतही भाजपच्या इशाऱ्यावर घडले असून आरोप काँग्रेसवर लावण्यात आले. हे सर्व एका अजेंड्याअंतर्गत केले जात आहे. लोकांना कसे भडकावायचे याची माहिती हायकमांडने भाजप नेत्यांना दिली आहे. हे सर्व त्यांच्याकडून होत आहे. मात्र कोणत्याही धर्माच्या, जातीच्या नावावर होणारी हिंसा इथे खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना मी सर्वांना दिल्या आहेत. आमच्या सतर्कतेमुळे कोणीही जखमी झाले नाही आणि दंगलही झाली नाही", असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदनिमित्त मोठा गोंधळ झाला. झेंडे लावण्यावरून दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेक आणि तोडफोडीत झाले.
5.केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म
आसाममधील तिनसुकियात शनिवारी धक्कादायक प्रकार घडला. येथील मिरानातील इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री उपस्थित असलेल्या सोहळ्यात स्क्रिनवर अचानक पॉर्न चित्रपट सुरु झाला.
मिथेनॉल मिश्रीत एम 15 पेट्रोलच्या पायलट रोलआऊटची सुरुवात या प्रसंगी करण्यात येत होते. व्यासपीठावर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे अधिकारी भाषण करत होते. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
स्क्रिनवर मिथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाचा व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. मात्र व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रिनवर एक पॉर्न चित्रपट दिसू लागला आणि तोच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. सदरील व्हिडिओ काही सेकंद सुरु होता. ऑपरेटरने ताबडतोब तो बंद केला.
केंद्रीय मंत्री म्हणाले, मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होतो. त्यामुळे माझे लक्ष स्क्रिनकडे नव्हते. मात्र माझ्या पीएने घडलेला प्रकार मला सांगितला. प्रोजेक्टर ऑपरेटला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























