राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास रोहित पवारांच्या वडिलांचं नकार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Rohit Pawar
आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. कोश्यारींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास रोहित पवारांच्या वडिलांचं नकार
कृषी विभागाकडून देणाऱ्या येणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना जाहीर झाला.
पण राजेंद्र पवारांनी राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजेंद्र पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. ही बातमी लोकमतने दिली आहे.
या कार्यक्रमालाच जाणार नसल्याची भूमिका राजेंद्र पवार यांनी घेतली आहे.
राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत.
"गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फुले दांपत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मते मांडली जात आहेत. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे, महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक महत्वाच्या पदावर आहेत."
"गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अराजकता निर्माण केली जात आहे. याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी एखाद्या कृषी कार्यालयात अथवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला असता तर तो मी स्विकारला असता, अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केली आहे."
2. मनसेच्या महाआरत्या रद्द, आज भूमिका स्पष्ट करणार
औरंगाबादच्या सभेला 24 तासही उलटत नाहीत तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक पाऊल मागे आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचे आदेश राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र सोमवारी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर 4 तारखेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा अल्टिमेटम यांनी राज ठाकरे यांनी रविवारच्या औरंगाबाद येथील सभेत दिला होता. परंतु भोंग्यांबाबत आपली भूमिका मंगळवारी स्पष्ट करू, असे राज यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथील सभेत राज यांचे भाषण पोलिस ऐकतील, त्यानंतर त्यात आक्षेपार्ह आहे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
3. एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर 7.83 टक्क्यांवर
देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मार्चमध्ये हा दर 7.60 टक्के होता. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून, शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.22 टक्के होता, तर मार्चमध्ये तो 8.28 टक्के होता.

फोटो स्रोत, Getty Images
देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 7.18 टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये हा दर 7.29 टक्के होता. CMIE च्या मते, हरियाणामध्ये सर्वाधिक 34.5 टक्के बेरोजगारी दर नोंदवला गेला आहे.
त्यानंतर राजस्थान 28.8 टक्के बेरोजगारी दरासह दुसऱ्या स्थानावर आहे. बिहार 21.1 टक्क्यांसह तिसर्या आणि जम्मू-काश्मीर 15.6 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
4. MPSC परीक्षेचे स्वरूप बदलणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅट या पेपरला फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
ही बातमी सकाळने दिली आहे.
राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमधील सामान्य पेपर क्रमांक 2 (सी-सॅट) याच्या पात्रतेसाठी किमान 33 टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान 33 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
5. गणेश नाईकांचा जामीन फेटाळला
ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
ही बातमी TV 9 ने दिली आहे.
बलात्कार आणि महिलेला धमकावल्या प्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नाईकांना जामीन दिला तर ते तक्रारदार महिलेवर दबाव टाकू शकतात असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























