सुप्रिया सुळे : 'नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे नाराज नव्हे, तर हैराण झालीय' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे नाराज नव्हे, तर हैराण झालीय - सुप्रिया सुळे
"पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक सामान्यांना अपेक्षित आहे. पण सध्या ते सदासर्वकाळ राजकारण्यासारखे वागत आहेत. त्यांच्या वागण्यामुळे मी नाराज नव्हे तर हैराण झाले आहे," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलवरून मोदींनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
"ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. त्याबाबत मी लोकसभेत व त्यांना वैयक्तिक भेटल्यानंतरही सांगितलं आहे," असं सुळे यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने केली आहे.
2. आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्यासाठी काम करणार- रतन टाटा
आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार, अशी घोषणा उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. आसाममधील दिब्रुगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
हे कर्करोग उपचार केंद्र आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन (ACCF), टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकार यांच्यामार्फत बांधण्यात आलं आहे.
"कर्करोग हा केवळ श्रीमंतांचा आजार नाही. अत्याधुनिक सुविधांमुळे आसाम जागतिक दर्जाचं कर्करोग उपचार देणारं सक्षम राज्य म्हणून ओळखलं जाईल. आसामच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे," असं यावेळी टाटा म्हणाले. ही बातमी डीएनए हिंदीने दिली.
3. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 200 रुपयांचं अनुदान
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या (28 एप्रिल) बैठकीत घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रिकव्हरी रेट जिथे 10 टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत. ऊस वाहतूक 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर 5 रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 14 मे रोजी सभा
विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सभा घेणार आहेत. या माध्यमातून सभेला सभेनेच प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा विचार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ही सभा 14 मे रोजी होईल. यासोबतच 30 एप्रिल रोजी ते राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधतील, अशी माहिती समोर आली आहे. ही बातमी लोकमतने दिली.
5. माझ्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी - किरीट सोमय्या
आपल्यावर खार पोलीस ठाण्यासमोर झालेल्या हल्ल्याची CBIमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक याचिका उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी बनावट आणि फेरफार करून दाखल केलेल्या FIRची केंद्रीय CBIमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. गुरूवारी दाखल झालेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























