सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट : 'केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्याने माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस', #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, @supriyasule
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्याने माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस - सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि इनकम टॅक्सच्या रेडबाबत गौप्यस्फोट केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तरसभेत, अजित पवारांना केंद्रीय तपास यंत्रणाची नोटीस येते पण सुप्रिया सुळेंना का नाही येत? असा सवाल उपस्थित केला होता.
त्यावर पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचा गौप्यस्फोट स्वतः सुप्रिया सुळे यांनी केलाय. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.
सुळे म्हणतात, "माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली मनही. कदाचित त्या लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ज्या दिवशी मी केंद्र सरकारच्या विरोधात तीन भाषणं दिलं. त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय."
2. देशात लवकरच समान नागरी कायदा होईल - अमित शहा
देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत, सीएए, राम मंदिर, कलम 370, ट्रिपल तलाक, समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही.डी.शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

फोटो स्रोत, NurPhoto
यावेळी शहा म्हणाले, "सीएए, राम मंदिर, कलम 370 आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे. उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केले जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेले काम योग्य पद्धतीने पूर्ण केले जाईल."
दिव्य मराठी या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.
3. पंजाबचा शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाचपट कर्ज घेतो
पंजाबमधील शेतकरी हा यूपी मधल्या शेतकऱ्याच्या तुलनेत चारपट तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाचपट कर्ज घेत असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे. तीन राज्य सरकारांनी नुकत्याच केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट - नाबार्डने भारत कृषकच्या सहकार्याने अभ्यास करण्यात आला होता.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
पंजाबमधील अल्पभूधारक शेतकरी वार्षिक 3.4 लाख रुपये कर्ज घेतात, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी अनुक्रमे 84000 आणि 62000 रुपये कर्ज घेतात, असेही या अभ्यासातून समोर आले आहे.
अभ्यास करण्यात आलेल्या या तीन राज्यांपैकी, पंजाबचे शेतकरी सर्वात जास्त कर्ज घेताना दिसून आले. त्याचप्रमाणे कर्जासाठी हे शेतकरी गैर-संस्थागत म्हणजेच सावकार, कमिशन एजंट्स, जमीनदार यांवर अवलंबून असल्याचं या अभ्यासात दिसून आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसमूहाने ही बातमी दिलीय.
4. पाण्याची टाकी साफ करताना 3 कामगारांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात सांडपाण्याची टाकी साफ करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने दिली आहे. एआयएडीएमकेचे आमदार सेलूर के राजू यांनी कामगारांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सध्या तामिळनाडूच्या विधानसभेत हा मुद्दा गाजतोय.
शिवकुमार, सरवणकुमार आणि लक्ष्मणन अशी मृतांची नावे आहेत.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी रात्री पलंगनाथम येथील पंपिंग स्टेशनवरील 30 फूट खोल सांडपाण्याच्या टाकीच्या आत असलेल्या मोटरमध्ये ब्लॉकेज काढण्यासाठी कामगारांना बोलावलं होतं.
त्यातील एका नातेवाईकाने सांगितलं की, "गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास ते टाकीत पडले. जवळपास एकही रुग्णवाहिका नव्हती. आम्ही त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेलं. मात्र आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही."
"सरकारच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झालायं. त्यांनी मशिनचा वापर केला असता तर हे तीन जीव वाचले असते."
पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून अग्निशमन आणि बचाव कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
5. पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना जामीन
सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि 115 आंदोलक कर्मचाऱ्यांना अखेर जामीन मिळाला. सदावर्ते यांना 50 हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तर सर्व 115 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुन एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते आणि एसटीच्या 115 कर्मचाऱ्यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत. सर्वांची सुटका होण्यासाठी सोमवारही उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























