सुप्रिया सुळे: 'माझ्या घरावर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. माझ्या घरावर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता - सुप्रिया सुळे
'सिल्व्हर ओक'वरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता आणि माझ्या आईवर हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर हल्ला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
त्या औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
"माझ्या घरावर हल्ला झाला तेव्हा माझ्या आई आणि मुलीने तातडीने पडदे बंद केले. तरी सुद्धा हे काय झालं कळायला मार्ग नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवं. या प्रकरणात अटक झालेल्या महिलांना मला भेटायचं आहे. मी पोलिसांना तशी विनंती केली आहे. त्या माझ्या घरी का आल्या होत्या? ही आपली संस्कृती नाही." असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
8 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाला होता. एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या घराबाहेर जमले होते.
आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे लोक बोलतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "प्रत्येक संघटनेला बोलायचा हक्क आहे आणि ते बोलतात. कोणाला कुठे जायचं आहे त्यांना तिथे जाऊ द्या."
2. 'दंगलखोरांवर अशी कारवाई करा...,'अमित शाह काय म्हणाले?
दिल्लीतील जहांगीरपुरी येथे 16 एप्रिलला झालेल्या हिंसक घटनांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्व्याच्या सूचना केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं, "दंगलखोरांवर अशी कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल, हिंसाचार घडू नये. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक पावलं उचला. तसंच या प्रकरणाचा तपास जलदगतीने करा."
या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांना अटक झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवरून याबाबत चर्चा केली.
लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या या घटनांबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे.
3. 'हिंदुंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि दोन मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी द्यावी' - साध्वी ऋथंबरा
"हिंदुंनो तुम्ही चार मुलं जन्माला घाला, त्यापैकी दोन मुलं राष्ट्रासाठी द्या," असं वादग्रस्त वक्तव्य साध्वी ऋथंबरा यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, SADHVI RITAMBHARA/TWITTER
त्या कानपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, "ज्या लोकांनी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत दगडफेक केली त्यांना देशाचा विकास बघवत नाही. राजकारण करून जे लोक हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मातीत मिळवलं जाईल. भारत लवकरच हिंदू राष्ट्र होणार आहे."
"हिंदू दम्पत्यांनी चार मुलांना जन्म द्यावा आणि दोन मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी द्यावी," असंही त्या म्हणाल्या.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
साध्वी ऋथंबरा या राम मंदिर आंदोलनाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.
4. 'गणेश नाईक यांची DNA चाचणी करा', तक्रारदार महिलेची मागणी
भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्यावर लिव्ह-इन संबंधांमध्ये राहण्याचा आरोप केलेल्या महिलेने आता डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
आपल्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसून माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे असंही संबंधित महिलेने म्हटलं आहे.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/GANESH NAIK
राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देणे आणि इच्छेविरोधात शारीरीक संबंध ठेवणे याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश नाईक यांना तात्काळ याप्रकरणी अटक करा, असंही राज्य महिला आयोगाने म्हटलं आहे.
DNA चाचणी केल्याशिवाय या प्रकरणाचा निकाल लागणार नाही. त्यामुळे आपण तशी मागणी करत आहोत. मदत मिळेल तिथे आपण जाणार असून कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचंही संबंधित महिलेने स्पष्ट केलं आहे.
5. कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ?
कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध राज्यासह देशभरात शिथिल झाल्यानंतर आतामात्र काही ठिकाणी रूग्णसंख्या वाढल्याचं दिसत आहे.
देशात सोमवारी (18 एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संख्येत 89.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रविवारी (17 एप्रिल) देशात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 150 होती. परंतु गेल्या 24 तासांत 90 टक्के रुग्णसंख्या वाढली असून 214 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
भारतात सध्या दैनंदिन करोना विषाणूच्या संसर्गाचा दर 0.31 वरून 0.83 वर गेलाय. तर दुसरीकडे सक्रीय रुग्णांच्या संख्येत मात्र काही प्रमाणात घट पहायला मिळते. सक्रिय रुग्णांशी संख्या 11 हजार 558 वरून 11 हजार 542 वर गेलीय.
दरम्यान, राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 517 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























