कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल : जयश्री जाधवांच्या विजयाचा अर्थ काय?

नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल लागला.

या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना 18 हजार 901 मतांनी पराभूत केले.

महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी ही निवडणूक खूपच चुरशीची होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अनेकांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागल्या होत्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील लढत असं राज्य पातळीवर पाहिलं जात असलं तरी कोल्हापुरात स्थानिक पातळीवर पाटील विरुद्ध महाडिक म्हणूनही या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष होतं.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. 12 एप्रिल रोजी मतदान झालं. मतदानाची टक्केवारी एकूण 61.91 टक्के इतकी राहिली.

महाविकास आघाडीतील पक्षांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केला. तिन्ही पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या.

जयश्री जाधव

फोटो स्रोत, facebook

दुसरीकडे भाजपनेही विशेष जोर लावल्याचं दिसून आलं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर टीका केली. त्यांनी हिंदुत्वासाठी भाजपला मत द्या, अशी हाक मतदारांना दिली होती. पण भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही, असं म्हणावं लागेल.

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या सहा महिने आधी पंढरपुरातही पोटनिवडणूक झाली होती. याठिकाणी भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारली होती. त्यामुळे कोल्हापुरात होत असलेल्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं.

काँग्रेसने याठिकाणी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.

एकीकडे भाजपकडे कोल्हापूरमध्ये नेतृत्व नसल्याची टीका होत असते. खासदार की असो आमदार, भाजपाकडे जिल्ह्यात एकही नेतृत्व नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती.

जयश्री जाधव

फोटो स्रोत, facebook

त्यातच चार राज्यातल्या निवडणुकीतील विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता, मात्र पुरोगामी कोल्हापूरमध्ये भाजपच्या हिंदुत्वाचा पेटंट चालला नाही असेच म्हणावे लागेल.

हिंदुत्व कुणाचं खरं, कुणाचं खोटं यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे या जागेवर शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपनं पुरेपूर प्रयत्न केले होते.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाहीत असा मेसेज दिला गेला होता मात्र जयश्री जाधव यांच्या या विजयामुळे भाजपचा होरा चुकला आहे.

यंदाच्या निवडणुकीत 61.19 टक्के इतकं मतदान झालं होतं. जास्त मतदानाचा फायदा भाजपला होईल, असा दावाही करण्यात येत होता. मात्र, जयश्री जाधव यांचा 18 हजार 901 मतांनी विजय झालाय.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कट्टर शिवसैनिक काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला, असंच यामुळे म्हटलं जात आहे. या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली गेली.

सत्यजित कदम

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, सत्यजित कदम

भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून महिलेला उमेदवारी देण्याबद्दल टीका झाली होती त्यावर देखील कोल्हापूरमधील महिला वर्गाने मोठी नाराजी व्यक्त केली.

महाडिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूरला पहिल्या महिला आमदार जयश्री जाधव यांच्या स्वरुपात मिळाल्या अशी प्रतिक्रिया कोल्हापूरमध्ये उमटली आहे.

भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे 2024 साठीची लिटमस टेस्ट म्हणूनही पाहिलं जात होतं. एकीकडे देशभरात मोदींना असलेली साथ पाहता कोल्हापूरमध्ये भाजपचा विजय सोपा असेल, असा विश्वास भाजपला होता. मात्र मोदींचा हा करिश्मा कोल्हापूरमध्ये चालला नाही, असंच म्हणावं लागेल.

'वैयक्तिक हितसंबंधांवर ठरतो कोल्हापुरातला विजय'

दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "या निवडणुकीत भाजपची मते वाढल्याचे दिसते त्यामुळे हिंदुत्व हा मूळ मुद्दा नव्हता तरीही भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पडलेली मते पाहता भाजपच्या मता मतांच्या आकडेवारीत यावेळी वाढ झाल्याचं चित्र आहे गेल्या वेळेस भाजपला याच ठिकाणी 40 हजारांच्या आसपास मतं होती मात्र यावेळी हीच आकडेवारी 70 हजारांच्या आसपास गेली आहे".

ते पुढे म्हणाले, "कोल्हापूर मध्ये लढली गेलेली निवडणूक हिंदुत्व किंवा इतर कुठल्याही मुद्द्यांवर लढली गेली जात नाही निवडणुकीतल्या यश-अपयशाला इथल्या गटातटाचे राजकारण जबाबदार असतं. वैयक्तिक हितसंबंध यावर इथला जय पराजय ठरतो".

"एकीकडे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी राज्यातले सत्ता असणारे पक्ष आणि दुसरीकडे एकता भाजप असा असता नाही काँग्रेसच्या उमेदवाराला अवघ्या अठरा हजारांचे मताधिक्य मिळाले त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकासआघाडी तील पक्षांना अधिक काम अधिक काम करावे लागणार आहे असं दिसतंय", असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)