एसटी कर्मचारी संप : सुप्रिया सुळे यांच्यात मला इंदिरा गांधी दिसल्या - जितेंद्र आव्हाड #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. ST संप : सुप्रिया सुळे यांच्यात मला इंदिरा गांधी दिसल्या - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ST कर्मचाऱ्यांनी कथितरित्या हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी (8 एप्रिल) दिसून आला.
याप्रसंगी आंदोलकांशी हात जोडून चर्चेच्या तयारीत असलेल्या सुप्रिया सुळेंचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यात इंदिरा गांधी यांची प्रतिमा दिसली, असं सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
आव्हाड म्हणाले, " 1977 साली JNUचं आंदोलन झालं. तेव्हा निवेदन स्वीकारायला JNUच्या गेटवर स्वत: इंदिरा गांधी गेल्या होत्या. तेव्हा त्यांचे नेते सीताराम येचुरी होते. हा भारताचा इतिहास आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. आज त्याच इंदिरा गांधी मला सुप्रिया सुळेंच्या रुपाने दिसल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर येताना त्या घाबरल्या नाहीत." ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. रशियाप्रमाणे चीन भारतावर हल्ला करू शकतो - राहुल गांधी
रशियाने ज्याप्रकारे युक्रेनवर हल्ला करून काही भागांवर आपला दावा केला आहे, तसाच हल्ला चीन भारतावर करू शकतो, अशी भीती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, facebook
JDU चे माजी अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "रशिया युक्रेनची सार्वभौमता मान्य करत नाही. दोनेत्स्क आणि लुहान्स्क हा युक्रेनचा भाग असल्याचं तो मान्य करत नाही. या आधारावरच त्यांनी युक्रेनवर हल्ला केला.
हाच सिद्धांत भारतावर लागू करत चीन हल्ला करू शकतो. त्यांनी आधीच त्यांचं सैन्य सीमेवर तैनात केलेलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. सरकारे न्यायाधीशांच्या प्रतिमा मलीन करत आहेत - सरन्यायाधीश
भारतात न्यायाधीशांची प्रतिमा मलिन केली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी खंत व्यक्त केली आहे. ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
छत्तीसगडचे माजी प्रधान सचिव अमन सिंग आणि त्यांची पत्नी यास्मिन सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. यावेळी एन. व्ही. रमण यांनी वरील वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "पूर्वी केवळ खासगी संस्था किंवा पक्ष न्यायालयात न्यायाधीशांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असत. पण आता हेच काम सरकारे करू लागली आहेत. ही परिस्थिती दुर्दैवी आहे." ही बातमी न्यूज 18 हिंदीने दिली आहे.
4. भारताचा पुढील पंतप्रधान शीख किंवा मराठा बनणार - माजी रॉप्रमुख
भारताचा पुढील पंतप्रधान शीख व्यक्ती बनेल, जर शीख व्यक्ती पंतप्रधान बनला नाही तर मराठा नक्कीच देशाचा पंतप्रधान बनू शकतो, असं वक्तव्य RAW चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांनी केलं आहे.
दुल्लत यांना पुण्याच्या सरहद्द संस्थेकडून संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संत नामदेव यांचं कार्य सर्वव्यापी असल्याचं प्रतिपादन दुल्लत यांनी केलं. पुढे बोलताना देशाच्या पुढील पंतप्रधानपदावर मराठा व्यक्ती असू शकतो, असं ते म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.
5. अक्सिस आणि IDBI बँकेला RBI कडून दंड
रिझर्व्ह बँकेने आज नियमांच्या अंमलबजावणीतील त्रुटींसंदर्भात अक्सिस बँक आणि IDBI बँकेला दंड ठोठावला आहे. यामध्ये अक्सिस बँकेला 93 लाख तर IDBI बँकेला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कर्ज देणे, दंडआकारणी, KYC आणि बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक नसणे यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अक्सिस बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तर IDBI बँकेने फसवणूक आणि सायबर सुरक्षा यासंदर्भात नियमभंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























