You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कल्याण रेल्वे व्हायरल व्हीडिओ: ऋषीकेश मानेंनी रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्या युवकाला असं वाचवलं
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"अचानक उडी मारेल, असं वाटलं नव्हतं पण त्याने प्लॅटफॉर्मवरुन रेल्वे रूळावर खाली उडी मारली आणि समोरुन भरधाव वेगाने मदुराई एक्सप्रेस येत होती. मी काही सेकंदातच त्याला वाचवण्यासाठी खाली उतरलो," कल्याण रेल्वे पोलिसात कार्यरत असलेल्या ऋषीकेश माने यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
बुधवारी (23 मार्च) दुपारी साधारण अडीच वाजता विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर कुमार पुजारी या युवकाने रेल्वे रुळावर उडी मारली.
ऋषीकेश माने त्यावेळी प्लॅटफॉर्मवर गस्त घालत होते. एक तरुण अचानक रुळावर उतरल्याचं माने यांनी पाहिलं. त्याच वेळी समोरुन मदुराई एक्सप्रेस येत होती. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या पाच सेकंदात ऋषीकेश माने रेल्वे रुळावर उतरले.
बीबीसी मराठीशी बोलताना ऋषीकेश माने म्हणाले, "मी पोलीस आहे. सर्वांना मदत करणं पोलिसांचं कामच आहे. मला वाटलं नव्हतं हा मुलगा उडी मारेल. पण त्याने उडी मारली. काही सेकंद मी थांबलो तेव्हा समोरुन येणाऱ्या गाडीचा अंदाज घेत होतो."
'आम्ही छत्रपतींच्या राज्यातील पोरं आहोत...'
समोरुन एक्सप्रेस येत असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून तुम्ही कुमार पुजारी यांचे प्राण वाचवले, तुम्हाला भीती वाटली नाही का?
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही छत्रपतींच्या राज्यातली पोरं आहोत त्यामुळे असं काही वाटलं नाही."
"क्षणभर मी सुद्धा घाबरलो होतो, पण मला वाटलं की याचे प्राण वाचवू शकतो. म्हणून मी प्रयत्न केला," असंही ते म्हणाले.
कुमार पुजारी यांना रेल्वे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं आहे. तसंच त्यांना समुपदेशनासाठी नशामुक्ती केंद्रात पाठवल्याचंही रेल्वे पोलिसांनी सांगितलं.
"त्या मुलाची मानसिकता बरी नव्हती. मी त्याच्या आईला भेटलो. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. एका आईचा मुलगा आपण वाचवला. आपण एवढं कमवलं असं मला वाटलं. समाधान वाटलं." ऋषीकेश यांनी अशा भावना व्यक्त केल्या.
'पाच सेकंदात' कसं ठरवलं?
पाच सेकंदात माने यांनी त्या युवकाला रेल्वे रुळावरून बाजूला केलं अशी माहिती रेल्वे पोलिसांचे आयुक्त कैसर खालिद यांनी दिली.
अवघ्या पाच सेकंदात त्यांनी युवकाचे प्राण वाचवले असं रेल्वे पोलिसांनी सांगितलं आहे.
याविषयी बोलताना ऋषीकेश माने म्हणाले, "रुळावर उतरण्यापूर्वी सेकंदात मी विचार केला की हा मुलगा उभा आहे, रुळावर खाली झोपला नाहीय. त्यामुळे कमी वेळात आपण त्याला बाजूला करू शकतो. समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसचा वेगही जास्त होता. तो झोपला किंवा बसला असता तर आणखी वेळ लागला असता. मी त्याच्या मागे उडी मारली जेणेकरुन त्याला सुरक्षित बाजूच्या रुळावर नेता येईल."
या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. ऋषीकेश माने यांच्या कुटुंबीयांनीही हा व्हिडिओ पाहिला.
कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? याबाबत बोलताना ते म्हणाले, "त्यांना कौतुक आहे पण काळजीही आहे. पोलिसांच्या कुटुंबाला अशा परिस्थितीची कल्पना असते. पण घरातले म्हणाले, बायका,मुलं आहेत तुला, त्यांना डोळ्यासमोर ठेऊन ड्यूटी करत जा."
"पण एवढ्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. कारण असा भावनिक विचार केला तर मग ड्यूटी कशी करायची?" असंही ते म्हणाले.
एवढ्या भयानक प्रसंगाला पहिल्यांदाच सामोरे गेलो असंही ते म्हणाले.
'25 हजारांचे बक्षीस जाहीर'
रेल्वे पोलिसांकडून ऋषीकेश माने यांना 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. तसंच राष्ट्रपती पदक प्रस्तावासाठी ही केस पात्र ठरेल का यावरही आम्ही काम करतोय असंही पोलीस आयुक्त खालिद म्हणाले.
रेल्वे जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात 'मिशन जीवन रक्षक' याअंतर्गत रेल्वे सुरक्षा दल जवानांनी सात प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. रेल्वे मालमत्तावरील गुन्हे, आत्यंतिक हिंसाचार, रेल्वे वाहतूकीत अडथळा आणणे, बेपत्ता मुलांची सुटका करणे, अंमली पदार्थ जप्त करणे अशा अनेक जबाबदाऱ्या रेल्वे पोलिसांकडे आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)