HSC Exam: बारावी पेपर लीक प्रकरण काय आहे आणि आता पुढे काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबईत HSC बोर्डाची प्रश्नपत्रिका मुंबईहून लीक झाल्याबाबत विद्यार्थी-शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. पण पेपर लीक झाला नसल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
शनिवारी (12 मार्च 2022) HSC विज्ञान शाखेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मिळाली, अशी बातमी पसरल्याने खळबळ उडाली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत बोलताना सांगितलं, "प्रश्नपत्रिका फुटली नाही तर परीक्षा सुरू होण्याआधी एका विद्यार्थिनीकडे व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका आढळली. परीक्षा विद्यार्थ्यांना दिल्यानंतर प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली आहे."
परीक्षा केंद्रावर काय घडलं?
राज्यभरात बारावी HSC बोर्डाची परीक्षा 9 हजार 435 परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. 14 लाखहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
4 मार्च ते 30 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शनिवारी (12 मार्च) मुंबईतील विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) परीक्षा होती.
नेहमीप्रमाणे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. HSC बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. बेंचवर आपला सीट क्रमांक पाहून ते बसले. बॅगेतून कंपासपेटी काढली, विद्यार्थ्यांनी हातात पेन घेतले. तेवढ्यात एक विद्यार्थिनी वर्गात आली.

फोटो स्रोत, Getty Images
परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर का झाला म्हणून तिची विचारपूस करण्यात आली. ती घाबरली आहे असं पर्यवेक्षकांच्या लक्षात आलं.
विद्यार्थिनीची आणखी चौकशी केली तर काहीतरी गडबड आहे असं शिक्षकांनी ओळखलं.
तपासात आढळलं की, विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आजच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो आहेत. 10 वाजून 24 मिनिटांनी व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिकेचे फोटो असल्याचे आढळले.
यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड विधानपरिषदेत म्हणाल्या, "सकाळी 10.20 वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं. एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये 10 वाजून 24 मिनिटांनी आढळला."
याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
एका शिक्षकाला अटक?
या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना विलेपार्ले पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, "हे पेपर लीकचं प्रकरण नसून कॉपीचं आहे. कारण प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपवर पेपर आढळला आहे. संबंधित विद्यार्थिनी उशिरा आल्याने हे कॉपीचं प्रकरण म्हणून गुन्हा नोंदवला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"मलाड येथून एका खासगी कोचिंग क्लासच्या मालकाला आणि शिक्षकाला आम्ही ताब्यत घेतलं आहे. त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका कशी आली आणि किती विद्यार्थ्यांना पेपर पाठवला, याची चौकशी सुरू आहे,"
मुकेश यादव या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळली आहे.
पुढे काय होणार?
राज्य शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कॉपी करणारे विद्यार्थी आणि पेपर लीकमध्ये सामील असणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते.
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकं नेमण्यात आली आहेत.
भरारी पथकं वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेते.

फोटो स्रोत, Getty Images
HSC बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सुरुवातीला पोलीस अशा प्रकरणांचा तपास करतात, प्रक्रियेनुसार तक्रार किंवा गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर मंडळ शिक्षा सूचीनुसार बोर्डाचे तपास अधिकारी चौकशी करतात."
विद्यार्थ्याने कोणत्या स्वरुपाची कॉपी केली आहे त्यानुसार कारवाई केली जाते.
अलीकडच्या काळात व्हॉट्सअप आणि मोबाईलचा वापर करुन कॉपी किंवा पेपर लीकचे प्रमाण वाढले आहे. "सायबर क्राईमनुसारही विद्यार्थी, शिक्षकांवर कारवाई केली जाते."
"कॉपी प्रकरणांमध्ये विद्यार्थ्याला 'त्या' विषयापुरतं डिबार केलं जातं. म्हणजेच संबंधित विषयाच्या पुढील सात परीक्षा त्या विद्यार्थ्याला देता येत नाही. जवळपास तीन वर्षे विद्यार्थ्याला परीक्षा देता येत नाही," असंही शरद गोसावी म्हणाले.
पेपर लीकमध्ये आणखी गंभीर स्वरुपाची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करू शकतात आणि दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























