साई निकेश : तामिनाडूतून युक्रेनमध्ये शिकायला गेला, आता सैनिक होऊन रशियाविरोधात लढतोय

Sai Nikesh

फोटो स्रोत, Sai Nikesh

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियन आर्मीच्या विरोधात लढण्यासाठी भारताच्या तामिळनाडूचा एक विद्यार्थी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाला आहे. हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

या विद्यार्थ्याचे नाव आहे साई निकेश. तो तमिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील थुडियालूर या गावचा रहिवासी आहे.

साई निकेशला सैन्यात भरती व्हायचं होतं. त्यानं आपलं शिक्षण 2018 पर्यंत पूर्ण केलं. आणि नंतर भारतीय सैन्य मध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याने असे दोन प्रयत्न केले. मात्र यात तो काही यशस्वी झाला नाही.

त्यानंतर साई निकेशने अमेरिकन सैन्यात भरती होण्यासाठी चौकशी केली. मात्र त्याला अपेक्षित असा प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यानंतर त्याने खारकीव्ह नॅशनल एरोस्पेस यूनिवर्सिटीमध्ये एरोस्पेस इंजिनियरिंग करायचं ठरवलं.

पण मागच्या काही आठवड्यात रशियाने युक्रेनसोबत युद्ध छेडलं आणि त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी खारकीव्ह शहर सोडलं.

पण साई निकेशने युक्रेन सोडायला नकार दिला. यावेळी त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरी परतण्यासाठी आर्जव केली, मात्र त्यांच्या पदरी निराशाचं पडली. कारण साई निकेशने नकार कळवला होता.

यासंदर्भात साई निकेशच्या कुटुंबियांशी संवाद साधायचा प्रयत्न केला असता त्याच्या कुटुंबीयांनी सध्या माध्यमांशी बोलण्याची आपली मानसिक स्थिती नसल्याचं कळवलं आहे.

साई निकेशच्या एका नातेवाईकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हटले, "सैन्यात भरती होण्याचं साई निकेशचं खूप जुनं स्वप्न होतं. मात्र भारतात त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही."

"त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला पाठवलं. मात्र त्याचं सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहाणं सुटलं नव्हतं. त्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितलं की मी एक गेमिंग कंपनी जॉईन करतोय. पण त्याच्या कुटुंबाला अंदाज नव्हता की साई निकेश अजूनही सैन्यात भरती होण्याचं स्वप्न बघतोच आहे."

त्याचे नातेवाईक पुढे सांगतात, "कोणालाच माहीत नाही की त्याने हा निर्णय का घेतला. त्याच्या कुटुंबीयांना तर पोलिसांच्या गुप्तचर विभागामार्फत या गोष्टी कळाल्या. त्यानंतर भारतीय गुप्तचर विभागाच्या तसंच संरक्षण मंत्रालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी भेटी दिल्या."

"या सगळ्या प्रकारात साई निकेशचं कुटुंब तणावाखाली असल्याने ते कोणत्याही माध्यमांशी संपर्क साधून इच्छित नाहीत. साई निकेश बरोबर सातत्याने संपर्क साधू नये असंही मी त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं आहे. आम्हाला कोणालाच समजतं नाही की त्याला तिथून परत कसं आणायचं."

Sai Nikesh

फोटो स्रोत, Sai Nikesh/fb

"जेव्हा साई निकेशच्या युक्रेन आर्मीमध्ये भरती झाल्याच्या बातम्या आल्या तेव्हा मी त्याच्याशी संपर्क केला. त्याला व्हॉट्सऍप द्वारे एक व्हॉइस नोट पाठवली आणि सांगितलं, आम्ही इथे अवघडातील अवघड परिस्थिती सांभाळू तू काळजी करू नकोस. सध्या आमची प्राथमिकता आहे साई निकेशने घरी सुरक्षित परतावं."

जेव्हा बीबीसीने पोलीस विभागाच्या गुप्तचर विभागाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं, "बातम्यांमध्ये जे काही प्रसिद्ध झालं आहे त्याउपर आमच्याकडे कोणतीच अधिकची माहिती नाही. पण असं वाटतं की, तो विद्यार्थी स्वतःच्या मनाने युक्रेन सैन्यात भरती झाला असावा.

सध्या आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र संपर्क झाला नाही. तिथे कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे त्याचाही आम्हाला अंदाज नाही. आम्ही अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत."

निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल आर. हरिहरन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी लोकांना रशिया विरोधात युक्रेनियन सैन्यासोबत लढण्याचं आवाहन केलं होतं. पण यावर वाद विवाद करू शकत नाही की या गोष्टी चुकीच्या आहेत की बरोबर. खरंतर युद्ध होणार हीच चुकीची गोष्ट आहे.

झेलेन्स्कीच्या आवाहनानंतर, बऱ्याच युक्रेनियन शहरांतील लोकांना लढण्यासाठी हत्यारं पुरविण्यात आली. नेमकी हीच परिस्थिती दुसऱ्या महायुद्धावेळी होती. रशियाने आपल्या सामान्य नागरिकांच्या हातात अशी हत्यारे दिली होती."

हरिहरन सांगतात, "झेलेन्स्की यांनी युरोपियन राष्ट्रांना हत्यारे पुरवण्याची विनंती केली होती. आणि तशी मदतही युरोपियन राष्ट्रांनी केली. आता ज्या मुलाने भरती होण्याचा निर्णय घेतला तो विद्यार्थी जॉर्जियामधील स्वयंसेवक गटात सामील झाला होता. त्याला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती असं ही सांगितलं जातंय. त्यामुळे हा केवळ त्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो असं म्हणता येईल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)