भगतसिंह कोश्यारी: राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात - सामनातून टीका, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात - सामनातून टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, "दाऊद हा राष्ट्रदोही आणि त्याला पाकिस्तातून इकडे आणण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणीच रोखले नाही. पण, दाऊदच्या नावावर राजकीय भाकरीचे तुकडे तोडणे थांबवा एवढंच आमचं म्हणणं आहे. भाजपला दाऊदच्या नावाचं राजकारण करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला.

"मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यांना साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग राग इतिहासात कुणी केला नसेल."

अग्रलेखात पुढे म्हहटलंय, "अनेक राज्यांच्या विधानसभेत अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही. त्यांनी जय हिंद म्हटले नाही व जय महाराष्ट्र म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे.

"अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आलं त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले आहे."

2. 'पुन्हा शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही'; स्वतः चित्रीकरण करीत तरुणाची आत्महत्या

'पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही', असं म्हणत एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने चित्रफित तयार केली.

त्यात तो म्हणतो की, "शेतकऱ्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होत. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकऱ्याच्या कधी नादाला लागत नाही. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही."

ही चित्रफित केल्यानंतर सूरजने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयात झाला मृत्यू झाला.

3. नारायण राणे, नितेश राणेंना 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात दिंडोशी न्यायालयाकडून या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे.

10 मार्चपर्यंत दोघांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.

याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस संबंधित ठाण्याच्या पोलिसांनी पाठवली आहे. मात्र, दिंडोशी न्यायालयाकडून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता.

त्यानंतर दिशा सालियानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

4. रोहित पवारांनी आधी आजोबांचा आणि दाऊदचा संबध पाहावा - पडळकर

एन. के सूद नावाचे निवृत्त रॉ ऑफिसर आहेत. रोहित पवारांनी त्यांची मुलाखत बघावी. त्या मुलाखतीत तुमचे आजोबा आणि दाऊदविषयी त्यांनी काय खुलासे केलेत, याकडे आधी लक्ष घाला आणि मग महाराष्ट्राला शहाणपणा शिकवण्याचं काम करा, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पडळकर पत्रकारांशी बोलत होते.

"रोहित पवार यांच्यासाठी हा राजकारणाचा विषय असेल. पण भाजपसाठी नाही. नवाब मलिकांच्या पाठीमागे का उभं राहता, याचं उत्तर पवार कुटुंबीयातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीनं लोकांना द्यावं," असंही पडळकर पुढे म्हणाले.

5. महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चितीला प्रारंभ

महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चिती नसल्याने लगतच्या गुजरात राज्याने तलासरी तालुक्यातील वेवजी गावातल्या जमिनीवर घुसखोरी केली. याबाबत स्थानिक नागरिकांनी हद्द निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली.

त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून गुरुवार, 3 मार्च रोजी दुपारी प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वेवजी-सोलसुंभा सीमा निश्चितीला सुरुवात झाली. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)