नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे. जे. रुग्णालयात दाखल

फोटो स्रोत, Getty Images
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तुरुंगात पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
23 फेब्रुवारीला ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली होती.
त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.
अटकेचं दाऊद इब्राहिम कनेक्शन
नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर थेट टीका करत होते.
काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणात त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.
त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना (2005-06) त्यांनी अटकेतील दाऊद इब्राहिमच्या साथीदारांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली, असा आरोप केला होता.
नोव्हेंबर 2021 दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील खडाजंगी चांगलीच रंगली होती. याबाबतची बीबीसीने केलेली बातमी इथं क्लिक करून वाचता येईल.
फडणवीस काय म्हणाले होते?
नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं.
त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, "1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी LBS रोडवर जागा विकत घेतली."

फोटो स्रोत, Getty Images
आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं.
सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.
"1 लाख 23 हजार स्क्वेअर फुटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे," असं फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं.
हा व्यवहार आधी एका व्यक्तीच्या नावे मग नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असं करत झाल्याचं फडणवीस म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, मरिअम बाई ऑफ गोवावाला, प्लंबर यांच्या वतीने सलीम पटेल यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्यांना वली खान यांच्याकडून जमीन मिळाली होती. ही जमीन त्यांनी सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली.
नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही कंपनी आहे. सॉलिडसमध्ये नवाब मलिक होते. मंत्री झाल्यावर त्यांनी सॉलिडस कंपनी सोडली. फरहान मलिक यांच्याकडे कंपनीची मालकी गेली.
"एलबीएस मार्गावर फिनिक्स मार्केट आहे. 2000 रुपये स्क्वेअर फूट दराने ही जमीन विकण्यात आली. अंडरवर्ल्डच्या लोकांकडून खरेदी केलेल्या जागेचं मूल्य 30 लाख रुपये इतके होतं. या व्यवहारात 20 लाखांचं पेमेंट झालं आहे. 15 लाख सलीम पटेल यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 10 लाख शाह वली खान यांना दिले आणि 5 लाख नंतर दिले जातील असं लिहिलं आहे," असं फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























