परमबीर सिंह: सचिन वाझे यांना थेट उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांच्याकडून आदेश मिळायचे

फोटो स्रोत, Getty Images
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.
परमबीर सिंह यांनी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ला माहिती देताना अनेक नवे गौप्यस्फोट केले आहेत. सचिन वाझे हे गुन्ह्यांची माहिती थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देत होते, असंही परमबीर सिंह यांनी म्हटलं.
तर अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्याघरासमोरील गाडीच्या प्रकरणामागे परमबीर सिंहच असल्याचा आरोप केला आहे.
परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांचा काय परिणाम होतो, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
परमबीर सिंह EDच्या जबाबात काय म्हणाले?
परमबीर सिंह यांनी ED समोर दाखल केलेलं एक प्रतिज्ञापत्र काल (2 फेब्रुवारी) समोर आलं.
यामध्ये अनेक गंभीर मुद्दे पुढे आले आहेत. प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह म्हणतात, "सचिन वाझेला सेवेत परत घेण्यासाठी अनिल देशमुख यांचा थेट दवाब होता. मला याबाबत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आदेश मिळाला होता. मला वाझे यांना क्रांइम ब्रॅँचमध्ये पोस्टिंग देण्याचा आदेश देण्यात आला होता."
"मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांना काही महत्त्वाच्या केसेस देण्यात आले होते. सचिन वाझे यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडून थेट आदेश मिळत होते.
वाझेही थेट त्यांनाच ब्रिफिंग (माहिती) देत होते. तसंच काही महत्त्वाच्या प्रकरणात वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मला ब्रिफिंग करायचे.

"शिवाय, गृहमंत्र्यांच्या कार्यालयात IPS अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची नावं ठरवली जायची. मुंबईतील पोस्टिंगबाबतही गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून लिस्ट येत होती. काहीवेळा अनिल देशमुख आणि अनिल परब हेसुद्धा लिस्ट घेऊन येत आणि त्यावर चर्चा होत असे," असं परमबीर सिंह यांनी म्हटलं.
तसंच, "मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या पोस्टिंग रद्द करण्यासाठी सीताराम कुंटे यांचा मेसेज आला होता. त्यानंतर मी बदल्या रद्द केल्या. यानंतर अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती, असंही परमबीर सिंह यांनी सांगितलं.
अनिल देशमुखांचा ED समोर जबाब
दरम्यान, अनिल देशमुख यांनी ED समोर दिलेला जबाबही समोर आला आहे. यामध्ये "परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणी माहिती लपवत होते. तेच यामध्ये मास्टरमाईंड आहेत," असा आरोप देशमुखांनी केला आहे.

फोटो स्रोत, facebook
"सचिन वाझे यांना पैसे गोळा करण्याबाबत मी कधीच आदेश दिले नाहीत. सचिन वाझे यांनी मला किंवा माझ्या स्टाफला कधीच पैसे दिले नाहीत. परमबीर सिंह यांनी सचिन वाझेचा खंडणी वसूल करण्यासाठी वापर केला. याबाबत मी पुढील जबाबात माहिती देईन," असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
"मी कोणत्याही अधिकाऱ्याला आदेश दिले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांच्या समस्या जाणून घ्यायचो," असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं.
"सचिन वाझे यांना सेवेत परत कोणी घेतलं याची मला माहिती नाही. कारण हा अधिकार पोलीस आयुक्तांचा आहे. सचिन वाझे यांना मी एकटा कधीच भेटलो नाही. फक्त एका प्रकरणात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याचवेळी मी त्यांना माझ्या बंगल्यावर बोलावलं होतं," असंही देशमुख म्हणाले.
तसंच, "साई शिक्षण संस्थेच्या डे टू डे कामकाजात मी लक्ष देत नाही. कोणत्या कंपन्यांकडून साई शिक्षण संस्थेला पैसे आले याबाबत मला माहिती नाही. त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही," असंही देशमुखांनी EDच्या जबाबात म्हटलं आहे.
या प्रकरणात राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही ED समोर जबाब दिल्याची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी म्हटलं आहे.
परमबीर सिंह स्वतः एक आरोपी, त्यांच्या आरोपांचा काहीच उपयोग नाही - संजय राऊत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे स्वतः एक आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या आरोपांचा काहीच उपयोग नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं.
"आरोपी आपल्या बचावासाठी अशा प्रकारची नावे घेत असतो. विरोधी पक्षाने त्याचं भांडवलं करू नये. आम्हीही पंतप्रधानांचं नाव घेतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचंही नाव घेतलं जात होतं. कुणी कुणाचं नाव घेतल्याने फारसा फरक पडत नाही," असं संजय राऊत पुढे म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याआधी काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.

त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.
या पत्रानंतरच हे प्रकरण चव्हाट्यावर आलं असून त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
या प्रकरणात EDनेही अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावून त्यांना अटक केली आहे. हा सगळा मनी लॅांडरिंगचा प्रकार आहे, असं ED चं म्हणणं आहे.
जुलै 2021 मध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडी कोठडी मागताना ईडीनं 14 दावे केले होते. त्यामध्ये अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार आहेत. IPS अधिकाऱ्यांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता. सगळा व्यवहार रोखीने व्हायचा, असं पालांडेने सांगितलं. पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते, असं ED ने सांगितलं.
तसंच, चौकशीत अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांचा थेट सहभाग असलेल्या 11 आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 13 कंपन्यांची भूमिका आहे. अनिल देशमुख यांच्या अप्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यातून त्यांच्या प्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यात पैशांचा व्यवहार होत होता, हे चौकशीत उघड झालं आहे, असं ED ने म्हटलं.
अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत 4.18 कोटी रूपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाऱ्या दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत. हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले. अनिल देशमुख यांना बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये लाच म्हणून मिळाले, असा आरोपही ED ने केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























