एन. डी. पाटील- शरद पवार या दोघांना जेव्हा शारदाबाईंनी एक-एक मेगामाईक आणून दिला होता...

प्रा. डॉ. एन. डी. पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रा. डॉ. एन. डी. पाटील
    • Author, विजय चोरमारे
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या परंतु नातेसंबंधांतल्या दोन कुटुंबांचे कौटुंबिक संबंध आणि राजकीय संबंध कसे असावेत, या दोन्हींचा ताळमेळ कसा राखावा याचे पवार कुटुंबीय आणि एनडी पाटील यांच्याइतके प्रगल्भ उदाहरण महाराष्ट्रात दुसरे आढळणार नाही.

शरद पवार यांच्या भगिनी सरोज या एन. डी. पाटील यांच्या पत्नी. शरद पवार आणि एनडी पाटील नात्याने मेहुणे. शरद पवार काँग्रेसच्या विचारधारेत वाढले.

एनडी पाटील सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणजे डाव्या विचाधारेशी एकनिष्ठ. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष परस्परांचे कट्टर विरोधक.

काँग्रेस सत्ताधारी तर शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष त्यामुळे कोणत्याही पातळीवर तडजोड नाही. स्वाभाविकपणे शरद पवार आणि एनडी पाटील राजकारणात सक्रीय झाले ते परस्परांचे विरोधक म्हणूनच.

मधल्या काळात म्हणजे 1978 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष आदींच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार स्थापन केले.

त्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री आणि एनडी पाटील सहकारमंत्री होते. तो दोन वर्षांचा काळ दोघांनी एकत्रितपणे काम केले. परस्परांच्या भूमिकांचा आदर राखत त्यांनी एकदिलाने सरकारमध्ये काम केले. नंतरच्या काळात पुन्हा पवार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

राज्याचे नेते शरद पवार आणि विरोधी पक्षाचे लढाऊ नेते एनडी पाटील हे आमने सामने आले. एकूण पाहिले तर शरद पवार आणि एनडी पाटील हे जास्तीत जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणात परस्परांच्या विरोधातच राहिले.

पवार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले तरी आपल्या राजकीय भूमिकेनुसार एनडी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर, त्यांच्या भूमिकेवर सातत्याने टीका केली; परंतु त्यामुळे त्यामुळे कौटुंबिक नात्यात कधीच अंतर पडले नाही. राजकारणात दोघांच्या भूमिका भिन्न होत्या.

शरद पवार, एन डी पाटील, सरोज पाटील

फोटो स्रोत, Facebook/Sharad Pawar

फोटो कॅप्शन, शरद पवार, प्रा. डॉ. एन. डी पाटील आणि सरोज पाटील

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातही शरद पवार हे मुख्य धारेत राजकारण करीत राहिल्याने एनडी पाटील यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी सातत्याने पवारच राहिले. परंतु त्यातून कधीच पवार कुटुंबीय व आमच्या कुटुंबात अंतर निर्माण झाले नाही.

एनडी पाटील यांनी स्वतः म्हटले हे की, 'महाराष्ट्रात मी अन्य कोणत्याच नेत्यांवर टीका केली नसेल तेवढी टीका शरद पवार यांच्या राजकारणावर, त्यांच्या भूमिकेवर मी केली आहे; कारण समोर तेच होते. प्रस्थापित राजकारणात ज्यांच्यावर टीका केल्याशिवाय माझे राजकारणच होऊ शकत नव्हते, असे पवारच होते. त्या काळात माझा रोल होता तो मी करीत राहिलो;

'परंतु तरीही त्याबद्दल स्वत: शरद पवार अथवा पवार कुटुंबीयांतील अन्य कुणीही नाक मुरडल्याचे मला जाणवले नाही व समाजालाही कधी पाहायला मिळाले नाही. राजकीयदृष्ट्या आमच्या दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या होत्या. मी माझ्या भूमिकेला न्याय दिला. शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला. आम्ही दोघांनीही राजकीय भूमिका की नाते असा प्रश्न आल्यावर राजकीय भूमिकेलाच महत्त्व दिले.'

एनडी पाटील यांचे पवार कुटंबाशी संबंध आले ते सर्वांत थोरले बंधू वसंतराव पवार यांच्यामुळे. अप्पासाहेब पवार यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध होते.

पवार कुटुंबासह एनडींना बांधून ठेवणारा जो धागा होता तो म्हणजे शरद पवार यांच्या आई आणि एनडी पाटील यांच्या सासूबाई शारदाबाई पवार. त्यांचे एनडींवरही पुत्रवत प्रेम होते. घरातली सगळी मंडळी त्यांना बाई म्हणत, तसे एनडीही त्यांना बाई म्हणत.

शारदाबाईंच्या एनडीवरील प्रेमाची गोष्ट सांगायची तर 1967 च्या निवडणुकीतली एक आठवण आवर्जून सांगायला हवी.

1967 च्या निवडणुकीत शरद यांच्या प्रचारासाठी शारदाबाईंनी एक मेगामाईक आणला होता. तो आणताना फक्त त्यांच्यासाठीच आणला नाही, तर एनडी पाटील यांच्यासाठीही एक मेगामाईक आणला.

'हा तुमच्याकरिताच आणला आहे. एक शरदसाठी आणला आणि एक तुम्हांसाठी.' असे म्हणाल्या.

वाळवा (जि. सांगली) विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी तेव्हा एनडी उभे होते.

सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीत त्या काळी मेगामाईकला फार महत्त्व होते. शरदला जसा मेगामाईक लागणार, तशीच त्याची नारायणरावांनाही गरज आहे. म्हणजे शरद यांचा जेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर विचार आला तेव्हा आपल्या जावयाचाही विचार त्यांच्यापुढे कायमपणे आला.

एनडी सर शारदाबाईंबाबत म्हणतात की, "त्यांची माया ही अशी होती की ती मला एका चुंबकीय क्षेत्राप्रमाणे ओढून घ्यायची. मला दैनंदिन व्यस्ततेतून वेळ मिळाला की दोन-अडीच तासांचा प्रवास करून मी बारामतीला जात असे व त्यांना भेटत असे."

शरद पवार आणि एन डी पाटील

फोटो स्रोत, Facebook/Sharad Pawar

फोटो कॅप्शन, प्रा. डॉ. एन. डी. पाटलांचा गौरव करताना शरद पवार

एनडी हे फिरस्ते गृहस्थ आहेत, हे सगळ्या राजकीय वर्तुळात माहीत होते. एनडींचे लग्न ठरत असल्याच्या काळात शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार बारामतीला आले असता गोविंदराव पवार यांनी त्यांना घरी जेवायला बोलावले.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलीचे लग्न ठरत असल्याचे गोविंदराव त्यांना बोलले. त्यावर कोण मुलगा म्हणून अप्पासाहेबांनी चौकशी केली. त्यांनी सांगितले आहे एक मुलगा, तुमचा विद्यार्थीच आहे एन. डी. पाटील. ते ऐकून अप्पासाहेब पवार म्हणाले, 'एन. डी. पाटील होय! मग आता एक साखळदंड करायला ऑर्डर द्या म्हणजे त्यांचा पाय तुम्हांला बांधून घालता येतील!'

एनडी पाटील शेतकरी कामगार पक्षाचे पूर्णवेळ काम करीत होते. वय 29 वर्षे होते आणि प्राध्यापकाची नोकरी सोडून दिली होती.

वकिलीचे शिक्षण घेत होते, परंतु वकिली करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले होते. तशा परिस्थितीत शारदाबाईंनी आपली मुलगी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. लग्न ठरवताना भाई उद्धवराव पाटील, दाजिबा देसाई, नाना पाटील अशी त्याकाळच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेतेमंडळी होती.

एकाअर्थाने एनडींचे लग्न लावून देण्यासाठी पुढाकार शारदाबाईंनीच घेतला होता. लग्नानंतर एनडी पाटील सपत्नीक मुंबईत राहात होते. त्या काळात कुणी काही कामानिमित्त मुंबईला आले तर किंवा त्या स्वत: मुंबईला काही कामानिमित्त आल्या तर त्या आठवणीने एका टिक्क्यात गहू आणि दुसऱ्या टिक्क्यातून ज्वारी पाठवत असत. कुटुंबाला आधार देण्याचा हा वारसा पवार कुटुंबीयांनी फार मनापासून सांभाळला.

शारदाबाईंच्यानंतर हा जिव्हाळा तेवढ्याच आत्मीयतेने टिकवला आणि वाढवला तो शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताईंनी. एनडी पाटील यांच्या कुटुंबातील कुणी आजारी असेल किंवा दवाखान्यात असेल तर जेवणाचा डबा पाठवण्यापासून औषधोपचारापर्यंत सगळी जबाबदारी प्रतिभाताई निभावत.

प्रतिभा पवार आणि सरोज पाटील या नणंद भावजयांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत. गेली दोन वर्षे एनडी पाटील सरांना माणसे ओळखता येत नव्हती. त्या काळात एकदा प्रतिभाताई त्यांना भेटायला आल्या होत्या. त्यांनी हात हातात घेतल्यावर एनडी पाटील यांनी त्यांना नावानिशी हाक मारून ओळखले. इतका व्यक्तिगत जिव्हाळा होता.

एनडी पाटील यांचा नातू सागर पाटील याचे अकाली निधन झाले. त्याच्या आजारपणाच्या काळात प्रतिभाताईंबरोबरच सुप्रिया सुळे यांनीही व्यक्तिगत लक्ष घालून काळजी घेतली. सुप्रिया सुळे कॉलेज जीवनात असताना आपल्या आत्याला पत्रे लिहित असत, त्यातही जिव्हाळा ओतप्रोत भरलेला असे.

शरद पवार

फोटो स्रोत, Facebook/Sharad Pawar

फोटो कॅप्शन, शरद पवार

शरद पवार आणि एनडी पाटील राजकीय विरोधक असले तरी रयत शिक्षण संस्थेत त्यांनी सुमारे चार दशके एकत्र काम केले. शरद पवार अध्यक्ष आणि एनडी पाटील कार्याध्यक्ष असले तरी रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात अखेरचा शब्द एनडी पाटील यांचा असायचा.

पवार कुटुंबातील छोटे मोठे मतभेद मिटवण्याची जबाबदारी काहीवेळा एनडी पाटील यांच्यावर यायची आणि एनडींचा शब्द कधी कुणी पडू दिला नाही.

एकदा छत्रपती साखर कारखान्याच्या निमित्ताने अजित पवार आणि राजेंद्र पवार यांच्यात मतभेद झाले. तेव्हा शरद पवार यांनी निरोप धाडला, 'नारायणराव, तुम्हांला जरा बारामतील जायला लागतंय. थोडेसे नाजूक काम आहे. हे तुम्हीच करायचे व तुम्हीच ते करू शकता.' मग छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात राजेंद्र पवार यांची समजूत काढून एनडींनी त्यांना माघार घ्यायला लावली.

जिथे राजकारण होते तिथे ते अत्यंत कठोरपणे केले आणि जिथे नाते जपायचे तिथे नातेही जपले, असाच पवार कुटुंबीय व एनडी पाटील यांच्यातील 60 वर्षांचा प्रवास आहे. शारदाबाई पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, राजेंद्र पवार यांच्यापासून ते रोहित पवार, पार्थ पवार यांच्यापर्यंत सगळ्यांनी आजवर हे नाते आणि जिव्हाळा जपला आहे.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)