संजय राऊत : 'चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट'

संजय राऊत चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट - संजय राऊत

चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप आणि निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता त्यांनी आपल्या प्रतिमेला जपावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, "या संपूर्ण देशात सर्वात चांगली कामगिरी महाराष्ट्रात सुरू आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल."

"मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. एसटी महामंडळाच्या 215 आगारांतून वाहतूक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरू झालं आहे. आतापर्यंत 26 हजार 500 पर्यंत कामगार कामावर रुजू झाले.

गुरुवारी 215 आगारांतून 2382 बस सोडण्यात आल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

एसटी बस

फोटो स्रोत, KAILASH PIMPALKAR/BBC

दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा मिळावी यासाठी महामंडळाने एसटीचे सेवानिवृत्त आणि कंत्राटी पद्धतीने चालक नेमणूक सुरू केल्याचं चन्ने यांनी सांगितलं.

लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर परतावं, असं आवाहन शेखर चन्ने यांनी केलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

3. भारतात अल्पसंख्यांकावरील हल्ल्यांमध्ये वाढ, ह्यूमन राईट्स वॉचचा अहवाल

देशात धार्मिक अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असं ह्युमन राईट्स वॉचने संस्थेने आपल्या वर्ल्ड रिपोर्ट 2022 मध्ये म्हटलं आहे.

मुस्लीम नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

तसंच भारतातील सरकारने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सरकारवर टीका करणाऱ्या टीकाकारांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये गोवलं आणि त्यांना लक्ष्य केलं, असा आरोप या अहवालातून करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त कोरोना काळात सरकारकडून अत्यावश्यक आरोग्य सेवांचा पुरवठा न झाल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोनामुळे स्थगित

राज्यात येत्या 23 जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोना संसर्ग वाढीमुळे पुढे ढकलम्यात आली आहे.

पोलिओ डोस

फोटो स्रोत, Reuters

केंद्र सरकारने पत्रामार्फत दिलेल्या सूचनेनंतर ही लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

यासंदर्भात आरोग्य विभागाने राज्यातील कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन, शालेय आरोग्य विभाग तसंच जिल्हा आरोग्य विभाग यांना पत्र पाठवलं आहे.

स्थगित लसीकरण मोहीम आता 7 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाईल, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

5. मजूराने एकट्याने एका दिवसात तोडला 16 टन ऊस

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कुंडलवाडी येथे एका ऊसतोड मजूराच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

ईश्वर रामचंद्र सांगोलकर (वय 50) असं या ऊसतोड मजूराचं नाव असून ईश्वर यांनी एकट्याने एका दिवसात 20 गुंठे आवारातील 16 टन ऊस तोडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार केला.

विशेष म्हणजे, हे काम करत असताना मजूर ईश्वर यांनी जेवणाचीही पर्वा केली नाही. दिवसभर केवळ दोन बिस्कीटे आणि ताक पिऊन 16 टन ऊस तोडण्याचं काम त्यांनी केलं, असं लोकमतने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)