रामदास आठवले: 'शिवसेना ऐकणार नाही, भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा' #5मोठ्याबातम्या

रामदास आठवले, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र, काँग्रेस
फोटो कॅप्शन, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. आता शिवसेना ऐकणार नाही, भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा- आठवले

"शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रिपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यावं", असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. भाजपला वाटत होतं की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. पण भाजपाचा अंदाज चुकला, असंही नमूद केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

आठवले म्हणाले, "शिवसेनेचा जो अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणे शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावा. भाजपाला वाटत होतं की तिन्ही पक्ष एकत्र येणार नाही. आता भाजपाने मोठं मन करावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करण्यासाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा विचार करावा."

2. मोदींनी राष्ट्रपती तर योगींनी पंतप्रधान व्हावं-टिकैत

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती होतील आणि योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान व्हावं असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत काय भूमिका आहे? भाजपला विरोध करताना विशिष्ट पक्षाला पाठिंबा देणार का? असा प्रश्न टिकैत यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी स्पष्ट काही सांगणं टाळलं. भाजपला मतदान करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

राकेश टिकेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेतकरी नेते राकेश टिकेत

"भाजप जनतेच्या मताने जिंकणार नाही. मात्र, गडबड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भाजपला कोणीही मतदान करणार नाही. ते बेईमानी करतील. निवडणूक लढवणाऱ्यांनी सावधानी बाळगावी. तीन-तीन वकील तयार ठेवावेत," असा सल्ला टिकैत यांनी दिला.

योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता? टिकैत म्हणाले, "अहो, त्यांना पंतप्रधान होऊ द्या, त्यांना राज्यात कशाला अडकवायचे, त्यांनी पंतप्रधान व्हावे. त्यांना मोदींकडे जायचे आहे."

3. जिल्ह्यात माफियाराज बोकाळल्याचा आणखी पुरावा काय देऊ- पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सवाल

माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार असून कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या करून घेतात. त्यामुळे स्वरक्षणासाठी अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रिव्हॉल्वर देण्याची मागणी केली आहे.

"आता या प्रकरणावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आमने-सामने आल्या आहेत. जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बीड, परळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "वास्तविक पाहता, अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही राहिले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्ह्यात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्सी हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत."

"गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्ह्यात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही, त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्ह्यात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय?" असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

4. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमक्यांचे फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीसंदर्भातील सुनावणीला विरोध करणारे धमक्यांचे बेनामी दूरध्वनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना करण्यात आले असून त्यात काही मराठी वकिलांचाही समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नियुक्त केलेल्या समितीने या बेनामी दूरध्वनी प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयातील वकिलीसाठी वकीलपत्र (अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड) मिळालेल्या वकिलांना ब्रिटनमधील दूरध्वनी क्रमांकावरून दोन वेळा फोन केले गेले. ज्या वकिलांनी हे फोन उचलले त्यांना आधीच ध्वनिमुद्रित केलेला धमकीचा संदेश ऐकवण्यात आला.

'शीख फॉर जस्टिस' या अमेरिकेतील संघटनेच्या वतीने इशारा दिला जात असल्याचा दावा हा संदेशात केला गेला. पंजाबमधील मोदींचा ताफा अडवण्याची जबाबदारीही या संघटनेने घेतली असून सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या सुनावणीला वकिलांनी विरोध करावा व ही सुनावणी थांबवावी, असा इशारा देण्यात आला आहे.

1984 मध्ये शिखांविरोधात झालेल्या नरसंहाराविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही, हे वकिलांनी लक्षात ठेवावे, असे संदेशात म्हटले आहे.

5. गोव्यात भाजपला धक्का, तीन आमदारांनी सोडला पक्ष

विधानसभा निवडणूक जाहीर होताच गोव्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत़ विज्ञान- तंत्रज्ञानमंत्री, भाजप आमदार मायकेल लोबो आणि आमदार प्रवीण झान्टे यांनी सोमवारी भाजपचा राजीनामा दिला़.

लोबो यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला़ मंत्रिपदाबरोबरच आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याचे लोबो यांनी स्पष्ट केल़े ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आह़े. लोबो कळंगुटचे आमदार होते.

लोबो यांच्या पाठोपाठ मये विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण झान्टे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़ ते 'मगोप'मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आह़े. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

"आता गोवा भाजपमध्ये मनोहर पर्रिकर यांचा वारसा चालवण्यासारखे काहीही उरलेले नाही. ज्यांनी पर्रिकर यांना समर्थन आणि पाठिंबा दिला त्या कार्यकर्त्यांना हटवले जात आहे," असे मायकल लोबो म्हणाले. पण मनोहर पर्रिकर असते तर आपण राजीनामा दिला नसता, असे लोबो यांनी स्पष्ट केले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)