Molnupiravir: कोव्हिड-19 वरील पहिल्या औषधाबद्दल नेमका वाद काय आहे?

फोटो स्रोत, MERCK
- Author, मयांक भागवत,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोव्हिड-19 वरील पहिलं औषध Molnupiravir वर वाद निर्माण झालाय. हे औषध सुरक्षित आहे का नाही? यावरून वादाला तोंड फुटलंय.
भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या औषधाचे साईड इफेक्ट असल्याचं म्हटलंय.
ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, "याचे साईड इफेक्ट आहेत. सुरक्षेचे प्रश्न आहेत. त्यामुळे याचा नॅशनल टास्कफोर्स टृीटमेंटमध्ये समावेश करण्यात आलेला नाही."
ICMR च्या दाव्याला प्रत्युत्तर देताना हे औषध बनवणाऱ्या कंपनीने, "औषधात काळजी करण्याजोगी कोणतीही गोष्ट आढळली नाही," असा दावा केलाय.
Molnupiravir चे साईड इफेक्ट आहेत?
भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी डिसेंबर 2021 मध्ये कोरोनाविरोधी उपचारात Molnupiravir च्या आपात्कालीन वापराला परवानगी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, "अमेरिकेत 1433 रुग्णांवर झालेल्या चाचणीच्या आधारे याला मान्यता देण्यात आली. या रुग्णांनी कोव्हिडविरोधी लस घेतलेली नव्हती."
Molnupiravir वर बोलताना ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, "या औषधाच्या सुरक्षिततेबाबात मोठे प्रश्न आहेत." याचे काही साईड इफेक्टही आहेत.
या औषधाच्या साईटइफेक्ट बाबत डॉ. भार्गव यांनी माहिती दिली
1- टेरेटोजेनोस्टी
2- म्युटेनजेनेसिटी
3- कार्टिलेजना इजा पोहोचू शकते
4- शरीरातील स्नायूंनादेखील इजा होऊ शकते
"हे औषध घेतल्यानंतर तीन महिने गर्भनिरोधक साधने वापरावे लागतील. याचं कारण, जन्माला येणाऱ्या बाळावर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात," ते पुढे सांगतात.
या औषधाला केंद्र सरकारने नॅशनल टास्कफोर्स उपचारात समाविष्ट केलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याचा समावेश केलेला नाही.
स्तनदा माता, लसीकरण, संसर्ग झालेल्यांना हे औषध दिलं तर काय होईल, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे असं ICMR चं म्हणणं आहे.
डॉ. भार्गव पुढे म्हणाले, "फक्त तीन टक्क्यांमध्ये या औषधांमुळे सौम्य आजार मध्यम स्वरूपाचा बनत नाही असं दिसून आलंय."
औषध सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा
रुग्णालयात दाखल नसलेल्या पण कोरोना रुग्णांना हे औषध देण्यासाठी भारतात मान्यता देण्यात आलीये. भारतातील आठ औषध निर्मिती कंपन्यांना हे तयार करण्याची परवानगी मिळालीये.

फोटो स्रोत, Getty Images
ICMR च्या औषधाचे साईड इफेक्ट असल्याच्या दावा कंपनीने खोडून काढलाय, "या औषधात काळजी करण्याजोगी कोणतीही गोष्ट आढळली नाही," असं कंपनीचं म्हणणं आहे. फेज-3 चाचणीत औषधामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यू कमी झाल्याचा कंपनीचा दावा आहे.
त्याचसोबत जगभरात त्सुनामी सारखा पसरणार्या ओमिक्रॅान व्हेरियंटवरही प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये औषध प्रभावी असल्याचं दिसून आलंय.
डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध दिलं जाणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
म्युटेनजेनेसिटी आणि टेरेटोजेनोस्टी म्हणजे काय?
म्युटेनजेनेसिटी म्हणजे शरीरातील पेशीच्या जनुकीय सूत्रांवर होणारा परिणाम. हा परिणाम एका जिनमध्ये किंवा एकांपेक्षा जास्त जिनमध्ये होतो.

फोटो स्रोत, MSD
फार्मकोलॅाजीचा अभ्यास केलेले कैलाश तांदळे सांगतात, " म्युटेनजेनेसिटीत शरीरात जनुकीय बदल होतात. ज्यांचा परिणाम आपल्या येणार्या पिढीपर्यंत दिसून येऊ शकतो."
तज्ज्ञ सांगतात, "टेरेटोजेनोस्टी म्हणजे औषधामुळे आईच्या पोटातील गर्भाला इजा पोहोचू शकते. जन्माला येणार्या मुलात व्यंग असू शकतो."
Molnupiravir काय आहे?
कोव्हिडवरील पहिलं अँन्टी-व्हायरल औषध म्हणून Molnupiravir कडे पाहिलं जातं.
या गोळीच्या वापराला अमेरिका आणि यूकेमध्ये मान्यता देण्यात आलीये. कोरोनाची साथ संपण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं औषध आहे असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना ही गोळी दिवसातून दोन वेळा देण्यात यावी असं सूचवण्यात आलंय.
Molnupiravir गोळीची निर्मिती मेरेक, शार्प आणि डोहमे तसंच रिजबॅक बायोफार्मास्युटिकल्स या औषध कंपन्यांनी केलेली आहे.
कोव्हिडविरोधात उपचारासाठी तयार करण्यात आलेली ही गोळी तोंडावाटे घेता येते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही गोळी त्या एन्झाईम्सला टार्गेट करते. ज्यामुळे व्हायरसला आपल्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.
Molnupiravir च्या वापराबाबत तज्ज्ञांमध्ये दिसून येत आहेत मतमतांतरं
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत काही दिवसांपूर्वी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात Molnupiravir चा समावेश करण्यात आलाय.
कोणत्या रूग्णांना द्यावं हे औषध?
1- सहव्याधी नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्यांना (होम क्वारेन्टाइन किंवा कोव्हिड सेंटरमध्ये दाखल) 200 mg पावर असलेली गोळी पाच दिवस
2- ऑक्सिजनवर असलेल्यांना, गर्भवती महिलांना देण्यात येऊ नये
3- लक्षणं असलेल्या सहव्याधीग्रस्त रुग्णांना
याबाबत राज्याच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "या औषधाच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न लक्षात घेऊन गर्भवती महिला आणि ऑक्सिजनवर असलेल्यांना देऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत."
मुंबईत आणि भारतात अनेक डॅाक्टर कोव्हिडच्या उपचारात molnupiravir चा वापर करत आहेत.
कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत म्हणतात, "आम्ही हे औषध ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना कमीतकमी एक सहव्याधी आहे अशांना देतोय." त्याचसोबत हायरिस्क किंवा ज्यांना गंभीर लक्षणं होऊ शकतात त्यांना देण्यात येतंय.
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही हे औषध देण्यात येतंय.
ICMR ने उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर ते सांगतात, "याचे काहीच साईडइफेक्ट दिसून आलेले नाहीत. 18 वर्षांखालील मुलांना हे देण्यात येणार नाहीये."
कोलकात्याचे इन्डोक्रायनोलॅाजिस्ट डॉ. अवधेश कुमार सिंह यांनी Molnupiravir वर संशोधन केलंय.
डॉ. सिंह आपल्या संशोधनात लिहतात, "कोरोनाविरोधातील लढाईत Molnupiravir एक महत्त्वाचं शस्त्र आहे." कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्यांमध्ये या औषधांमुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यू खूप कमी होतात.
पण मध्यम स्वरूपातील लक्षणं असलेल्यांना गंभीर बनण्यापासून हे बचाव करेल का यावर संशोधन गरजेचं आहे.
बाबीसीशी बोलताना डॉ. ए. के. सिंह म्हणाले, "संशोधनात हे औषध सुरक्षित असल्याचं आढळून आलंय," हायरिस्क असलेल्या प्रौढ नागरिकांना ज्यांना कोरोनाची लागण झालीये, त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण खूर कमी झालंय.
"हे औषध 18 वर्षांखालील मुलांना हे देण्यात येणार नाही. त्यामुळे प्राण्यांवरील चाचणीत काय परिणाम समोर आले याचा मनुष्याबाबत काहीच संबंध नाही," ते पुढे सांगतात.
पण काही डॉक्टर या औषधाच्या वापराबाबत अजूनही साशंक आहेत.
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा सांगतात, "याची चाचणी लस न घेतलेल्यांवर करण्यात आली. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण फक्त 30 टक्क्यांनी कमी होत," आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालंय. त्यामुळे याचा काहीच फायदा नाही.
"या औषधाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्याचबरोबर ओव्हर द काउंटर मिळत असल्याने याचा गैरवापर झाला तर?" हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे डॉ. गिलाडा म्हणाले.
तज्ज्ञ म्हणतात हे औषध घेतल्यानंतर तीन महिला गर्भवती राहू शकणार नाही. जनुकीय बदलाचे परिणाम दिर्घकाळ दिसून येऊ शकतात.
तर डॉक्टरांनी केस-टू-केस या औषधाबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना राज्य सरकारने केलीये.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























