उद्धव ठाकरे म्हणतात, आदित्यने माझा ताण कमी केला, भाजप नेते म्हणतात जनतेचा ताण वाढला #5मोठ्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना, भाजप

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.मुख्यमंत्री म्हणतात, "आदित्यने माझा ताण कमी केला"

प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित नव्हते.

आपले चिरंजीव आणि मंत्री आदित्य यांच्यामुळे ताण कमी झाला असं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका करत तुमच्यामुळे लोकांचा ताण वाढला आहे असं म्हटलं आहे.

"आता आदित्य आहे. जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि केवळ काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबई म्हणून, मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जे काम सुरु केलं. रस्त्यांचं काम कसं सुरु आहे, नालेसफाईचं काम कसं चाललं आहे, सौंदर्यीकरणाचं काही असेल तर तिथे कसं सुरु आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देतो.

हे पाहत मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्यांची कामं, साधारण ही कामं मध्यरात्रीनंतर सुरु होतात. आता दिवसाही कामं होतात. पण नालेसफाईचं काम त्या काळात काही ठिकाणी नाल्यात उतरुनही पाहिलं आहे. मग दहिसर नदीचं काम असेल, अजून कुठलं काम असेल. आता हा माझा ताण आदित्यने पूर्णपणे कमी केला आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.

"तुमच्या पावलावर पाऊल ठेवत ते देखील मंत्रालयात पाऊल ठेवत नाहीत. जनप्रतिनिधी हे तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी नाही तर जनतेचं टेन्शन कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे तुमचं टेन्शन कमी झालं असलं तरी जनतेचं टेन्शन वाढलंय हे नक्की", अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ आलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी आदित्य ठाकरे एकदाही फिरकले नाहीत असंही ते म्हणाले. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

2. राज्यात पावणेदोन लाख मुलांना लस

राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 1 लाख 76 हजार मुलांना लसलाभ मिळाला. लसपात्र मुलांपैकी 2.9 टक्के मुलांचे लसीकरण पहिल्याच दिवशी झाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सोमवारपासून सुरू झालं.

केंद्रांच्या नियमावलीनुसार या वयोगटातील बालकांसाठी कोव्हॅक्सिन लशीलाच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पुढील 28 दिवसांतच या मुलांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण होणार आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लसीकरण

राज्यभरात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 19 हजार 829 मुलांचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. या खालोखाल पुण्यात 17 हजार 276, नगरमध्ये 16 हजार 127 तर सांगलीमध्ये 14 हजार 450 मुलांना लस देण्यात आली.

मुलांच्या लोकसंख्येनुसार, सांगलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल धुळे, नगर, पालघर, कोल्हापूर, बीड, यवतमाळ आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात सर्वात कमी प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यात मिळाला असून मुलांच्या लोकसंख्येनुसार या जिल्ह्यात केवळ 0.2 टक्के(237) मुलांचे लसीकरण झाले आहे.

3.गोव्यातही काँग्रेस-शिवसेना एकत्र?

गोव्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.

या चर्चेमुळे गोव्यातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग होणार का याबद्दल शक्यतांना उधाण आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील स्थानिक नेतृत्त्वासोबत सोमवारी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बैठक झाली. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

गोवा, महाविकास आघाडी, शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खासदार संजय राऊत

गोवा फॉरवर्ड पक्षाला युतीसाठी ताटकळत ठेवलेल्या काँग्रेसननं आता युतीसाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचं राजकीय घडामोडींवर दिसून येतंय.

डिसेंबर महिन्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधींसोबतही चर्चा केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार का, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

शिवसेनेची गोव्यात फारशी ताकद नाही. त्यातही उत्तर गोव्यातील मोजक्याच मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. दक्षिण गोव्यात तर गोव्याच अस्तित्व नगण्य असल्यासारखंच आहे. अशावेळी जर महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला, तर शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

4. ओमिक्रॉन हा विषाणूजन्य ताप-योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी 'ओमिक्रॉन'चे वर्णन 'विषाणूजन्य सामान्य ताप' असं केलं आणि त्यासाठी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे.

उतर प्रदेश, योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

"ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने होतो, हे खरे आहे, परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेशी तुलना केली तर हा नवा विषाणू अतिशय कमकुवत आहे. तो फक्त एक 'विषाणूजन्य सामान्य ताप' आहे. तरीही कोणत्याही रोगाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. भयभीत होऊ नये", असं योगी म्हणाले. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

किशोरवयीन मुलांसाठीच्या लसीकरण मोहिमेची पाहणी केल्यानंतर आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

5.पुण्यात तरुणीची महिला पोलिसांना मारहाण

शेजाऱ्यांसमवेत झालेल्या भांडणाची पोलिस चौकीत तक्रार दाखल केल्यानंतरही तरुणी व तिच्या आईने दुसऱ्या चौकीत जाऊन बीट मार्शल महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली. याप्रकरणी तरुणीविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 'सकाळ'ने ही बातमी दिली.

शेजाऱ्यांसमवेत झालेल्या भांडणाची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी वाईट वागणूक दिल्यामुळे हा प्रकार घडला, वरिष्ठांनी संबंधित चौकशी करून पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी तरुणीच्या कुटुंबीयांनी केली.

मृणाल किरण पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तसेच, मृणाल व तिची आई संजना किरण पाटील यांच्याविरुद्ध सुनीता दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)