कालीचरण महाराज अटक: पोलिसांनी भक्त बनून केला फोन आणि पीए म्हणाला, 'दर्शनासाठी एक लाख वेटिंग'

कालीचरण, महात्मा गांधी, धर्मसंसद

फोटो स्रोत, CG KHABAR

फोटो कॅप्शन, कालीचरण यांना अटक करण्यात आली.
    • Author, आलोक प्रकाश पुतुल
    • Role, रायपूरहून बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

बुधवार संपून मध्यरात्रीनंतर गुरुवार सुरू झाला होता. सगळीकडं असलेल्या शांततेमध्ये अगदी लहान सहान आवाजांकडंही स्पष्टपणे लक्ष वेधलं जात होतं.

घड्याळ्याच्या काट्यांनी मध्यरात्रीची वेळ ओलांडत तीनचा आकडा गाठला होता. त्याचवेळी काही गाड्या येण्याचा आवाज आला.

बागेश्वर होम स्टेच्या मुख्य हॉलमध्ये चार जणांनी प्रवेश केला आणि समोरच ते बसले. मात्र, केशरी रंग दिलेल्या खोली क्रमांक 109 कडे जाण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी घेराव घातला.

कशी झाली अटक?

अभिजीत सारग ऊर्फ कालीचरण यांना मध्यप्रदेशच्या बागेश्वर धाममध्ये रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

"कालीचरण यांनी आधी तर पोलिसांना ताव दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोबत जाण्याशिवाय काही पर्याय नसल्यामुळं नाईलाजानं त्यांनी पोलिसांबरोबर येण्याची तयारी दाखवली," असं एक पोलिस अधिकारी म्हणाले.

रविवारी सायंकाळी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'धर्म संसद' मध्ये अल्पसंख्याक आणि महात्मा गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कालीचरण हे सोमवारी परतणार होते.

कालीचरण, महात्मा गांधी, धर्मसंसद

फोटो स्रोत, CG KHABAR

फोटो कॅप्शन, कालीचरण

वादग्रस्त वक्तव्यानंतर ते कार्यक्रम स्थळावरून निघू लागले, तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी रायपूरच्या पुजारी पार्कमध्ये येण्यास सांगितलं. त्याठिकाणी ते थांबलेले होते.

इकडे कार्यक्रम स्थळी वातावरण तापायला सुरुवात झाली होती. 'भारत देश को हिंदू राष्ट्र घोषित किया जाए' या विषयावर त्यावेळी इतर साधु संतांची भाषणं मात्र सुरू होती.

दुसरीकडे, रात्री नऊ वाजेपर्यंत कालीचरण यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर टिकरापारा पोलिस ठाण्यात धर्म संसदेच्या आयोजन समितीतील काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर पोलिस पुजारी पार्कला पोहोचले तेव्हा कालीचरण त्याठिकाणी नसल्याचं समजलं.

"सायबर टीमनं कालीचरण आणि त्यांच्याशी संबंधित इतरांचे मोबाईल लोकेशन शोधले तर ते सर्व फोन बंद होते. कालीचरण महाराज आणि त्यांचे सहकारी रस्तेमार्गाने निघाले असल्याचं पोलिसांना समजलं," असं एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोन लोकेशन

कालीचरण यांचा शोध कुठे घ्यावा, हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. सर्व फोन बंद होते आणि येण्या-जाण्याबाबत फार काही माहिती मिळत नव्हती.

यादरम्यान, कालीचरण यांच्या पीएच्या फोनचं लोकेशन खजुराहोच्या आसपास असल्याचं समजलं.

खजुराहो रेल्वे स्टेशन जवळच पल्लवी गेस्ट हाऊस आणि रेस्तरॉ आहे.

"छत्तीसगडचे पोलिस आमच्या इथे साध्या वेशात पोहोचले तेव्हा आम्हाला समजलं की, सोमवारी रात्री जे लोक आले होते, त्यांच्यामध्ये कालीचरण यांचाही समावेश होता," असं त्याठिकाणच्या एका कर्मचाऱ्याने बीबीसीला सांगितलं.

कालीचरण, महात्मा गांधी, धर्मसंसद

फोटो स्रोत, CG KHABAR

फोटो कॅप्शन, कालीचरण

मोबाइल लोकेशनच्या आधारे खजुराहोला पोहोचलेल्या छत्तीसगड पोलिसांना कालीचरण आणि त्यांचे तीन सहकारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पल्लवी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले होते, अशी माहिती मिळाली. त्यानंतर कालीचरण यांचे एक शिष्य त्याठिकाणी पोहोचले.

जवळपास तासभर त्याठिकाणी थांबल्यानंतर आणि जेवणानंतर कालीचरण त्याठिकाणाहून एका टॅक्सीत बसून अज्ञात ठिकाणाकडे निघून गेले. पण त्यांचे एक सहकारी त्याचठिकाणी थांबले.

"पोलिसांच्या पथकानं त्याठिकाणी गेल्यानंतर कालीचरण यांचे भक्त असून दर्शन करायची इच्छा असल्याचं सांगितलं. कालीचरण यांच्या पीएचा फोन सुरू होता. त्यावर संपर्क करून पथकातील एका सदस्यानं दर्शनाची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांनी नकार दिला. एक लाख लोक दर्शनासाठी वेटिंगमध्ये असल्याचं पीए म्हणाले," असं एका पोलिस कर्मचाऱ्यानं सांगितलं.

बागेश्वर धामला कसे पोहोचले पोलिस

पीएच्या सेलफोनचं लोकेशन खजुराहोपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बागेश्वर धामच्या आसपास असल्याचं दाखवत होतं.

पोलिसांनी कालीचरण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बागेश्वर धामपर्यंत पोहोचवणाऱ्या टॅक्सी चालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच टॅक्सी चालकाच्या मदतीनं बुधवारी रायपूर पोलिस गढा गावापर्यंत पोहोचले.

गढा गावामध्ये एक अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांमध्ये लोक होम स्टेची सुविधा उपलब्ध करून देत असतात.

याच गढा गावातील बागेश्वर धाम होम स्टेमधील पत्र्यांच्या खोल्यांध्ये जमिनीवर गाद्या टाकून राहण्याची सुविधा आहे. त्याठिकाणी एका दिवसाचं भाडं 300 रुपये आहे.

"मंगळवारी रात्री कालीचरण पोहोचले तेव्हा त्यांनी जीन्स आणि टी-शर्ट परिधान केला होता आणि चेहरा झाकलेला होता. त्यांनी तीन खोल्या बूक केल्या होत्या. होम स्टेमधील खोली क्रमांक 109 मध्ये सचिन उर्फ राजू कुटे नावानं कालीचरण थांबलेले होते. तर त्यांच्या सहकाऱ्यांसाठी खोली क्रमांक 103 आणि 112 बूक केल्या होत्या. त्यापैकी एक मुलगा यापूर्वी ऑगस्टमध्येही आमच्या इथे थांबला होता," असं बागेश्वर धाम होम स्टेचे संचालक शंकर शिवहरे बीबीसी बरोबर बोलताना म्हणाले.

"दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीनंतर कालीचरण आणि त्यांचे सहकारी बागेश्वर धामला गेले. बागेश्वर धामला जातानाही त्यांनी जीन्स परिधान केली होती. त्यामुळं ते साधू आहेत हे मला लक्षातही आलं नाही. त्यांच्याबरोबरच्या दोन जणांनी भगवी वस्त्र परिधान केली होती," असं शंकर म्हणाले.

साध्या वेशामध्ये पोहोचले पोलिस

शंकर शिवहरे यांच्या मते, रायपूर पोलिस बुधवारी दुपारी साध्या वेशामध्ये 12 वाजता पोहोचले आणि खोली पाहण्याच्या निमित्तानं याठिकाणी थांबलेल्या इतर लोकांची माहिती घेऊ लागले.

त्यानंतर पोलिस सायंकाळी चार वाजेच्या सुमारास परत आले. पुन्हा त्यांनी खोल्यांचं भाडं येण्या-जाण्याचा रस्ता याची माहिती घेतली.

"साध्या वेशातल्या पोलिसांनी कालीचरण महाराजांचा लांब केसांचा फोटो दाखवून ते याठिकाणी थांबले आहेत का अशी विचारणा केली. त्यावर महाराष्ट्रातून चार लोक आले आहेत, मात्र त्यांच्यात यांचा समावेश आहे का हे माहिती नाही," असं सांगितल्याचं शंकर म्हणाले.

शंकर शिवहरे यांच्या मते, पोलिसांनी ते बाबाचे भक्त असून त्यांच्या दर्शनासाठी आलेले असल्याचं सांगितलं.

त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या आसपास साध्या वेशातील पोलिसांनी कालीचरण यांच्या खोलीच्या शेजारी असलेली खोली क्रमांक 110 बूक केली.

या दरम्यान, ज्या तीन जणांनी खोली बूक केली आहे, ते पोलिस असल्याचा थांगपत्ता त्यांनी शंकर किंवा इतर कोणालाही लागू दिला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण काळामध्ये ते कालीचरण यांच्या पीएच्या संपर्कात होते आणि भक्त असल्याचं नाटक करत एकदा दर्शनासाठी विनंती करत होते.

"कालीचरण यांना बागेश्वरधाममध्ये जाऊन पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलिसांच्या टीमला भक्त बनून स्टे होममध्ये थांबणंच योग्य वाटलं. कालीचरण हे बागेश्वरधाममध्ये महंत धीरेन्द्र कृष्ण गर्ग यांना भेटायला गेले असल्याची बातमी तोपर्यंत आली होती," असं एका पोलिस कर्मचाऱ्यानं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

कालीचरण निसटणार असं वाटलं

मात्र, रात्र झाली तरी कालीचरण आणि त्यांचे सहकारी परत आले नाही, त्यामुळं पोलिसांचा धीर सुटू लागला होता. 7-8 अंशापर्यंत पारा खाली आलेला होता. या थंडीमध्ये कालीचरण हातून निसटणार अशी भीती पोलिसांना वाटली.

मात्र, पीएच्या फोनचं लोकेशन बागेश्वरधामच्या आसपास असल्याचंच दिसत होतं. त्यामुळं काहीसी आशा कायम होती.

त्यानंतर रात्री उशिरा दोन वाजेच्या आसपास कालीचरण पोहोचले, तेव्हा पोलिसांनी जराही वेळ न दवडता त्यांना ताब्यात घेतलं.

"आमच्या पथकानं सर्व नियमांचं पालन केलं. अटकेनंतर लगेचच कालीचरण यांचे वकील आणि नातेवाईकांना अटकेची माहिती दिली. तसंच 24 तासांच्या आत त्यांना रायपूरच्या न्यायालयात हजरही केलं," असं रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल म्हणाले.

कालीचरण यांच्या अटकेबाबत आम्ही त्यांचे वडील धनंजय सारग आणि भावाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबाचा बोलण्यास नकार

कालीचरण यांच्या कुटुंबीयांशी बोलणं होऊ शकलं नाही. मुलाच्या अटकेनंतर या मुद्द्यावर काहीही बोलायचं नसल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं.

धनंजय सारग आणि त्यांचा दुसरा मुलगा अकोल्यामध्येच एक मेडिकल स्टोर चालवतात.

कालीचरण, महात्मा गांधी, धर्मसंसद

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण

"अभिजीत सारग यांना याठिकाणी फारसं कोणी गांभीर्यानं गेत नाही. अकोल्यात त्यांचा आश्रम वगैरेही नाही. त्यांचे काही समर्थक आहेत. मात्र 2017 मध्ये त्यांनी मनपा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. गेल्यावर्षी भोजपूर मंदिराचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना देशभरात ओळख मिळाली," असं कालीचरण यांना अनेक वर्षांपासून ओळखणारे अकोल्याचे स्थानिक पत्रकार उमेश अलोणे म्हणाले.

कालीचरणचे भक्त असल्याचं सांगणारे अकोल्यातील तरुण आशिष भावे यांनी कालीचरण यांच्या अटकेचा विरोध करण्यासाठी त्यांचे शिष्य रायपूरला जाणार असल्याचं म्हटलं.

"कालीचरण महाराजांवर कालीमातेचा आशीर्वाद आहे. जगातील कोणतीही शक्ती त्यांना कैद करू शकत नाही. ते सिद्ध पुरुष आहेत. ते खरं बोलतात. त्यांच्याबाबत ईर्ष्या असलेले लोक हेच त्यांच्या विरोधात बोलतात," असं आशिष म्हणाले.

कालीचरण हे भावसार समाजातील आहे. या समुदायाचे अध्यक्ष अनिल मावळे यांनी त्यांच्याबाबत माहिती दिली. कालीचरण यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वर्तनाला कंटाळून शिकण्यासाठी त्यांना मालेगावला आजीच्या गावी पाठवलं होतं. तिथूनही नंतर इंदूरला मावशीकडे पाठवावं लागलं. त्याठिकाणी ते भय्यू महाराजांच्या संपर्कात आले, असं मावळे म्हणाले.

"एक दिवस अभिजीत याठिकाणी परतले आणि स्वतःला महाराज घोषित केलं. पण त्यांच्याबरोबर असलेले लोक चांगले नव्हते. त्यांनी गायत्री परिवारबरोबर मिळून काम करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या लक्षात आलं तर लोकांनी त्यांच्यापासून दुरावा केला," असं मावळे म्हणाले.

महिला आणि मुलींच्या मुद्द्यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर असे काही लोक जोडले गेले ज्यांना समाजात चांगलं समजलं जात नाही. कोणी मोटारसायकल चोर, तर कोणी गुंड. कालीचरण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवरही काही प्रकरणं दाखल आहेत.

कालीचरण, महात्मा गांधी, धर्मसंसद

फोटो स्रोत, BBC/VARSHA SINGH

फोटो कॅप्शन, धर्मसंसद

समाजाच्या कुलदैवताचं मंदिर कालीचरण यांच्या घराच्या जवळच आहे. त्याठिकाणी त्यांच्याबरोबर नेहमी भेट होत होती, असं अनिल मावळे म्हणाले.

"अभिजीत मोठ्या मोठ्या गप्पा करत असतात. कालीमातेनं त्यांना दर्शन दिलं आहे आणि ते खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान बनणार असं सांगत असतात," असं मावळे म्हणाले.

कालीचरण ऊर्फ अभिजीत सारग यांचं राजकीय भवितव्य कसं असेल हे सांगणं कठिण आहे. मात्र सध्या तरी सगळ्यांच्या नजरा त्यांच्या जामीनाच्या अर्जावर असून त्यावर तीन जानेवारीला सुनावणी होऊ शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)