शरद पवारः महिलांनी लष्करात यावे यासाठी मी प्रयत्न केले #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, @PawarSpeaks

फोटो कॅप्शन, शरद पवार
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाचमोठ्याबातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. संरक्षणमंत्री असताना महिलांनी लष्करात यावे यासाठी प्रयत्न केले- शरद पवार

"महिलांनी लष्करात यावे यासाठी संरक्षण मंत्री असताना प्रयत्न केला होता, त्यावेळी लष्करातील अधिकाऱ्यांनी महिलांना हे जमणार नाही असंही सांगितलं. मात्र तरीही मी तसा निर्णय घेतला", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.

साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. घर पुढं नेण्यासाठी मुलींचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही पवार यावेळी म्हणाले. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

ग्रामीण भागातील मुलं मुंबई-पुण्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचतात, याचा अभिमानही पवारांनी व्यक्त केला. शेती गरजेची आहे. पण कुटुंबातील एकानं शेती करावी आणि इतरांनी संधी मिळेल तिथं काम करत नाव कमवावं असं आवाहनही त्यांनी केलं.

"ज्ञान आणि आत्मविश्वासातून कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं हे पाहायला मिळालं आहे. त्याला पर्याय नसल्यामुळं ज्ञान मिळवत राहायला हवं", असंही पवार म्हणाले.

2.सहा दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये तिपटीने वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली चिंता

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आणखी एक चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सहा दिवसांत राज्यात कोरोना रुग्ण तिपटीने वाढले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यावर उपाययोजना याविषयी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यात सहभागी झाले होते.

जानेवारी महिन्याच्या मध्यामध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता यावेळी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या संदर्भात कृती दलाची बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

3. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तसंच जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

चांगदेव याठिकाणाहून एका कार्यक्रमानंतर रोहिणी खडसे घरी येत होत्या. त्यावेळी सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

रोहिणी खडसे यांच्या गाडीची समोरची काच फोडण्यात आली. त्यामुळं रोहिणी खडसे या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावल्या आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचंही पाहायला मिळालं आहे. दरम्यान पोलिसांनी लगेचच रोहिणी खडसे यांच्या घरी जाऊन प्रकरणाची माहिती घेतली.

4. आनंदराज आंबेडकर यांची रामदास आठवलेंवर टीका

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी थेट टीका केली आहे. "आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक असल्याचं" आनंदराज आंबेडकर म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आनंदराज आंबेडकर याठिकाणी आले होते. त्यावेळी विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आठवलेंवर टीका केली.

ओमिक्रॉन गंभीर विषाणू नाही, त्याचा धोका जास्त नाही त्यामुळं यावर्षी शौर्यदिन लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न होईल असंही ते यावेळी म्हणाले.

वंचित आघाडीवर मात्र त्यांनी टीका केली नाही. वंचितला भाजपची बी टीम म्हटलं जातं, पण कुणीही वेगळा पर्याय देऊन उभं राहिलं तर हा आरोप होतच असतो असं ते म्हणाले.

5. पोलिसांच्या कारवाईविरोधात हजारो निवासी डॉक्टर रस्त्यावर

दिल्लीमध्ये नीट-पीजी (NEET-PG)परीक्षेमधील विलंबाबात निवासी डॉक्टरांनी काढलेला मोर्चा रोखल्यामुळं सोमवारी रात्री पोलीस आणि डॉक्टरांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.

निवासी डॉक्टर दिल्लीचे आरोग्य मंत्री मनसुख मंडावीय यांच्या घराकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण आणि महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या प्रकारानंतर जवळपास चार हजार निवासी डॉक्टरांनी सरोजनी नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांची संघटना याबाबत आंदोलन करत आहे.

दरम्यान, निवासी डॉक्टरांनी अॅप्रन परत करत प्रतिकात्मक विरोधही केला आहे. या आंदोलनामुळं दिल्लीमधील काही रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांवरही परिणाम झाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)