अमरावतीत कुत्र्यांमध्ये पसरतोय पायरोसदृश विषाणू, किती गंभीर आहे हा आजार?

श्वान, कुत्रा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, अमरावतीहून
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

अमरावती जिल्ह्यात श्वानांमध्ये पायरोसदृश व्हायरसशी संबंधित आजार पसरलाय. या आजाराने जवळपास एक हजार जवळपास श्वान बाधित झाले आहेत. सुदैवानं, कुठल्याही श्वानाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती पशुधन अधिकाऱ्यांनी दिलीय.

अमरावती शहरातील पशुचिकित्सागृहात श्वानांवर आलेल्या रोगांमुळे चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील पाळीव आणि मोकाट श्वानांवर पायरोसदृश व्हायरस या आजाराने ग्रासले आहे.

हा एकप्रकारचा संसर्गजन्य विषाणू असून त्याचा प्रसार एकापासून दुसऱ्याला होत आहे. त्यामुळं श्वानप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रथमेश उमक यांच्याकडे 'लॅब्राडोर' जातीचे कुत्रे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुत्र्याला मळमळ, हगवण अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळं त्याला उपचारासाठी पशुचिकित्सालयात आणलं गेलं, तिथे श्वानाला सलाईन लावण्यात आली.

ते म्हणतात, "गेल्या एक आठवड्यापासून कुत्रा अशक्त वाटत होता, त्याच्या शौचवाटे रक्त पडायला लागले होते. त्याने खानपान सोडूनच दिले होते. पण आता उपचारानंतर तो बरा होतोय."

दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात श्वानांवर पायरोसदृश विषाणूचा प्रसार होत असतो. सुरुवातीला श्वानांना उलटी होणे, हगवण लागणे, अशक्तपणा आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची?

पाळीव श्वानांना सुरवातीला 'पपीडीपी' नावाची इंजेक्शन देणे गरजेचे असते, असं मत व्हेटरनरी डॉक्टर निरंजन तायडे यांचे आहे.

ते म्हणतात, "पहिल्या लशीनंतर कुत्रा जेव्हा दीड महिन्याचा होतो, तेव्हा त्याला 'सेव्हन इन वन' किंवा 'टेन इन वन' लस दिली गेली पाहिजे. त्याच्या एक महिन्यानंतर त्याला बूस्टर डोस हवा असतो. बूस्टर लस दरवर्षी कायम असते."

श्वान, कुत्रा

फोटो स्रोत, Getty Images

पण हा आजार झाल्यानंतर काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. डॉक्टर तायडे यांच्या मते, "ज्या कुत्र्यांना पायरोसदृश्य व्हायरसची लागण झाली असेल त्यांना अलगीकरणात ठेवले पाहिजे. कारण शौचवाटे पडणाऱ्या रक्तातून इतरांना म्हणजेच इतर प्राण्यांना संसर्ग होतो, आणि तो पसरत जातो. यापासून माणसांना कोणताही धोका नाही. पण वेळीच उपचार मिळाले नाही तर कुत्र्यांचा जीव जाऊ शकतो,"

पेट पॅरेंट्सची मोठी गर्दी पशू चिकित्सक दवाखान्यात दिसून येत आहे. पायरो हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना देखील याची लागण होण्याची शक्यता आहे.

पशुधन अधिकारी डॉ. सागर ठोसर या आजाराविषयी अधिक माहिती देतांना सांगतात, "गेल्या 15 दिवसांमध्ये उलटी, शौचवाटे रक्त, ताप मळमळ अशा लक्षणांचे श्वान दवाखान्यात उपचारासाठी येत होते. या आजाराने ग्रासलेले जवळपास 800 श्वान उपचारासाठी दवाखान्यात आले आहेत. ज्या श्वानांचं लसीकरण झालेलं नाही अशा श्वानांमध्ये हा आजार झाल्याचं दिसून येत आहे."

श्वान, कुत्रा

फोटो स्रोत, Getty Images

लसीकरण झालेल्या श्वानांमध्ये या आजाराची सौम्य लक्षण जाणवतात. लसीकरण झालेले श्वान दोन दिवसांमध्ये बरे होतात. ज्या श्वानांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येतात, त्यांना सलाईन आणि त्यांचा आहार बंद केला जातो.

"या आजारामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. बाधित झालेले श्वान आठवडाभरात बरे होतात. गेल्या चार-पाच दिवसात याची तीव्रता कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी 25 च्या जवळपास केसेस येत होत्या. आता हा आजार आटोक्यात आला असून चार ते पाच श्वान उपचारासाठी दवाखान्यात येतात. त्यामुळं श्वानप्रेमींनी घाबरून न जाता शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे," असं डॉ. ठोसर सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)