MPSC : 'मुलाखतीची लिस्ट सहा महिने अगोदर आली असती, तर स्वप्नील आज जिवंत असता'

फोटो स्रोत, Facebook / Swapnil Lonkar
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
''हीच मुलाखतींची लिस्ट सहा महिन्यांपूर्वी आली असती तर आज स्वप्नील आपल्यात असता. आता त्याच्या नावाचा लिस्टमध्ये उल्लेख करुन आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम एमपीएससी करतंय.''
एमपीएससीची परीक्षा पास होऊन देखील मुलाखतीची लिस्ट लागत नसल्याने कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे वडील सांगत होते.
'एमपीएससी हे मायाजाल आहे' असं म्हणत पुण्यातील फुरसुंगी भागात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने 30 जूनला आत्महत्या केली होती.
स्वप्नील राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मुख्य परीक्षा पास झाला होता. परंतु पुढे दीड वर्ष झालं तरी मुलाखतीची यादी लागत नसल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली होती.
स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर एमपीएससीच्या परीक्षांना तसेच निकालांना होणारा उशीर याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विधानसभेतदेखील याचे पडसाद उमटले होते. स्वप्नीलने आत्महत्या केली तेव्हा आयोगामध्ये पुरेशी सदस्य संस्था नव्हती. त्याचबरोबर पूर्णवेळ अध्यक्ष देखील नव्हता. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद उमटल्यानंतर आयोगातील सदस्य भरण्यात आले.
स्वप्नीलच्या आत्महत्येला सहा महिने होत असताना एमपीएससीकडून मुलाखतीची यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत स्वप्नीलच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Facebook / Swapnil Lonkar
''स्वप्नीलचं त्या यादीत नाव आलं याचा आनंदच आहे, परंतु तो आपल्यात नाही याचं दुःख आहे.'' असं स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.
सुनील लोणकर म्हणाले, ''हीच लिस्ट सहा महिने अगोदर आली असती, आम्हाला आनंद वाटला असता आणि मुलगा सुद्धा गेला नसता. एमपीएससीच्या गोंधळामुळे आमचा मुलगा गेला. एमपीएससीच्या प्रसिद्धी पत्रकात स्वप्निलच्या आत्महत्येचा उल्लेख आहे, ते लेटर माझ्याकडे आहे ते लेटर असून सुद्धा एमपीएससीकडून माझ्या मुलाचं नाव त्यात घातलं जातंय. आमच्या जखमेवर मीठ चोळायचा हा प्रयत्न आहे.''
''काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतोय तर एमपीएससी आपली चूक दाखवून देतंय. स्वप्निलच्या नावाच्या जागी दुसऱ्या एखाद्या मुलाला संधी मिळाली असती, तो मुलगा मुलाखतीला जाऊ शकला असता,'' असं देखील लोणकर म्हणाले.

फोटो स्रोत, MPSC
ही लिस्ट जाहीर झाल्यानंतर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील एमपीएससीच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली.
MPSCचा विद्यार्थी किरण निंभोरे म्हणाला, ''एमपीएससीच्या नियमाप्रमाणे लिस्टमध्ये स्वप्नीलचं नाव आलं असणार. परंतु एमपीएससीने लवकर निर्णय घेतला असता तर स्वप्नीलचा बळी गेला नसता. अजूनही तीच परिस्थिती आहे. ज्यांचे रिझल्ट लागले आहेत ते विद्यार्थी सुद्धा दीड वर्ष झाले तरी जॉईनिंग कधी मिळेल याची वाट पाहतायत. स्वप्नीलचं उदाहरण असताना सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही.''
''राज्यसेवेमध्ये अधिकारी म्हणून निवड झाली आहे परंतु त्यांचं जॉईनिंग बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा रस्त्यावर उतरुन आंदोलन केली. परीक्षा सुद्धा आंदोलन केल्यावर घेण्यात आली. प्रत्येकवेळी विद्यार्थ्याला रस्त्यावर उतरावं लागतंय,'' किरण सांगतो.
''एमपीएससीचा कारभार संथ आहे. त्यात पेपरफुटी प्रकरणंदेखील समोर येतायत. इतका उशीर झाला की त्याला काही अर्थ राहत नाही,'' एमपीएससीची परीक्षा देणारी सोनल सावंत सांगते.
सोनल म्हणाली, '' स्वप्नील लोणकर गेल्यावर सहा महिन्यांनी त्याचं नाव लिस्टमध्ये येतंय. मुलाखतीत पास होऊन देखील जॉईनिंग लवकर दिलं जात नाही. एमपीएससी काही करुन विद्यार्थ्यांना वाट पाहायला लावत आहे. हे सगळं निराशाजनक आहे.''

असंच मत महेश निंबाळकर या विद्यार्थ्याचं देखील आहे. महेश म्हणतो, '' आयोगाने सहा महिन्यांपूर्वी ही तत्परता दाखवली असती तर स्वप्नील लोणकरला आता पोस्टदेखील मिळाली असती. एमपीएससीकडे मनुष्यबळ नाही. रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. स्वप्नीलने आत्महत्या केली तेव्हा आयोगाला अध्यक्ष देखील नव्हता, आणि एकच सदस्य होता. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर आता सदस्य नेमण्यास सुरुवात झाली. कर्मचारी वर्ग देखील आयोगाकडे तोकडा आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचारी वर्ग भरला तर ही दफ्तर दिरंगाई होणार नाही.''
स्वप्नीलचे 'ते' शेवटचे शब्द
पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकरने 30 जूनला आत्महत्या केली होती. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा तो तयारी करत होता. पूर्व आणि मुख्य परीक्षा त्याने उत्तीर्ण केली होती. मुलाखतीची तो वाट पाहत होता.
"येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत वय आणि ओझं वाढत जातं, आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि Self doubt वाढत जातो. कोरोना नसता तर सर्व सुरळीत झालं असतं. आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते सगळं साध्य झालं असतं," स्वप्नील लोणकरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातली ही वाक्यं होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























