पोलिसानेच केला तरुणावर बलात्कार, आरोपीला अटक

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरमधून
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पोलिसानेच तरुणावर अत्याचार केल्याची घटना सांगली जिल्ह्यात समोर आली आहे. इस्लामपूर इथं ऑक्टोबर महिन्यात घडलेली ही घटना पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर आता उघडकीस आली.

इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायावर या प्रकरणी अनैसर्गिक अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत देवकर असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. यामुळं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी हणमंत देवकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस खात्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

हणंमत देवकर हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे. 27 ऑक्टोबरच्या रात्री गस्तीवर असताना देवकर याने पहाटे त्या तरुणाला अडवून विचारणा केली.

त्यावर वसतिगृहात जाणाऱ्या तरुणाने मैत्रिणीला भेटून जात असल्याची माहिती दिली. इतक्या रात्री फिरत जाऊ नको अशा सूचना देत देवकर याने मुलाचा मोबाइल नंबर मागितला. त्याची सर्व माहिती घेतली. मग त्याला जाऊ दिले.

त्यानंतर दोन दिवसांनी 29 ऑक्टोबर रोजी देवकर याने पीडित तरुण महाविद्यालयात शिकत असताना त्याची भेट घेतली. त्यावेळी मैत्रिणीसोबतच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना देण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणाने मित्राकडून चार हजार रुपये उसने घेऊन देवकरला दिले.

त्यानंतर मैत्रिणीसोबत शरीरसंबंधाची मागणी करत तिचा संपर्क क्रमांक मिळवून देण्यासाठी देवकर याने तरुणावर दबाव आणला. या गोष्टीला नकार देणाऱ्या तरुणावर त्याच्याच खोलीत बलात्कार केला. देवकर याने या घटनेचा व्हीडिओ बनवून याप्रकरणाची वाच्यता करू नकोस अन्यथा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या तरुणाने याबाबत कुणालाही माहिती दिली नाही. पण 21 नोव्हेंबर रोजी देवकर याने पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यावेळी मात्र या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळं हे प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कलम 384, 377, 504, 506 या अंतर्गत अनैसर्गिक अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हणंमत देवकर याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

'कुणी बेकायदा कृत्य करत असल्यास पोलिसांकडे मदत मागा'

या तरुणासोबत झालेले कृत्य चुकीचे असल्याचे सांगली पोलीस अधीक्षक गेडाम दीक्षित यांनी सांगितलं.

पुरुष अत्यााचार

फोटो स्रोत, Getty Images

"कायदा सर्वांसाठी समान आहे त्यामुळे पोलिसांकडून जरी अशा प्रकारच्या घटना घडल्या तरी त्याची पोलीस खात्याकडून योग्य दखल घेतली गेली आहे. त्यामुळे संशयित आरोपी देवकरवर पोलिस खात्यांतर्गत नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल," असेही दीक्षित यांनी सांगितलं.

"भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी पोलिसांशी योग्यवेळी संपर्क करत अन्यायाला वाचा फोडावी, त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल," असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

संबंधित घटनेतील तरुण तक्रार देण्यास धजावत नव्हता. यावेळी पोलिसांनी पुढाकार घेत तरुणाची समजूत घालत न्याय देण्याचा विश्वास निर्माण केल्याचं पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितलं. त्यामुळे त्याने तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला गेला.

'जनता आणि पोलिसांमधील दरी वाढता कामा नये'

या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी हनुमंत देवकर याने अशा प्रकारचं निंदनीय कृत्य इतर कोणासोबत केले आहे का याबाबतचा तपास सुरू असल्याचं पिंगळे यांनी सांगितलं.

हिंसाचार

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे असंही म्हणाले की, "पोलीस असं वागू लागले तर समाजात पोलिसांप्रती असलेल्या विश्वासाला तडा जाईल. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारची विकृती दूर ठेवत जनतेला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, अन्यथा पोलीस आणि जनता यांच्यातली दरी वाढत जाईल," भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केलं जाईल असंही पिंगळे यांनी सांगितलं.

दरम्यान प्रतिष्ठेच्या कारणावरून बऱ्याचदा अशा घटना लपवल्या जातात. पण तसं न करता कोणतीही विकृती वाढू नये सर्वांनी पुढाकार घेत तक्रार देण्यासाठी समोर येणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

यासाठी पोलीस नियंत्रण कक्षासह निर्भया पथका सारखी यंत्रणा सर्वत्र कार्यरत आहे. पोलिसांशी सहज संपर्क होईल अशा सुविधा उपलब्ध आहेत.

त्याचा लोकांनी वापर करावा आणि अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं पिंगळे यांनी आवाहन केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)