ST strike: 'संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घर चालवून दाखवावं' #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, संजय राऊत
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घर चालवून दाखवावं'

संजय राऊत यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाप्रती बोलता येत नसेल तर किमान आत्महत्या वाढवण्याचं काम तरी करू नये, त्यांनी जिभेवर ताबा ठेवावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं, असं आव्हान एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.

राज्यात एसटी कामगारांचा संप अजूनही सुरुच आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आहे त्या पगारावर काम करावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्याचा निषेध आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "महाविकास आघाडीचे सुत्र जुळवण्यासाठी खा.संजय राऊतांनी जसी धावपळ करुन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंना बसवले. तशीच धडपड आमच्या मागण्यांप्रती दाखवून पुढाकार घेत आमचाही प्रश्न मार्गी लावावा." ही बातमी मुंबई तकने केली.

2. भारतात परत या, त्याशिवाय पर्याय नाही, नरेंद्र मोदी यांचा कर्जबुडव्या उद्योगपतींना इशारा

हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सज्जड दम भरला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी

देश सोडून गेलेल्या सर्व पळपुट्या कर्जबुडव्यांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

दरम्यान, कोणत्याही उद्योगपतीचं थेट नाव घेणं मोदींनी टाळलं. कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या लोकांसमोर आता भारतात परतण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असं मोदी म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.

3. 'गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या,'

विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका असून त्यांना विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली आहे.

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, गोपीचंद पडळकर

पडळकर हे गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विरोधात सातत्याने आंदोलनं करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाहनावर हल्लाही झाला होता.

या पार्श्वभूमीवर, लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पडळकर यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा फडणवीस यांनी पत्रात दिला.

हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पाठवण्यात आलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. आदित्य ठाकरे यांच्या स्कॉटलंड दौऱ्यावर भाजपची टीका

ग्लासगो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेचे (COP-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नसतातना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन पर्यटन करण्याचं काम चालवलं.

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, facebook

इतडे एसटी कर्मचारी उपाशी पोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विनानिमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

या परिषदेस जाण्याची परवानगी केवळ देशांच्या प्रमुखांना असते. असं असताना आदित्य ठाकरे कोणत्या अधिकारात ग्लासगोला गेले? त्यांना त्याचं निमंत्रण होतं का? गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब घेऊन जाण्याचं काय कारण आहे?

हा संपूर्ण खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला का? एवढा लवाजमा नेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले, असे प्रश्न भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केले. ही बातमी लोकमतने दिली.

5. मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करूया - अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी काहीतरी तुफानी करूयात, मी पुन्हा येतेय, असं म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे त्या आता कोणती खळबळ माजवणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, अमृता यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्यांचं दिसून येतं. काहींच्या मते अमृता फडणवीस या नवं गाणं घेऊन येणार आहेत.

या ट्विटमुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्याचं नेमकं उत्तर अमृता फडणवीस याच देऊ शकतील. ही बातमी ई-सकाळने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)