शरद पवार: 'अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही' #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, @PawarSpeaks

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही - शरद पवार

"सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरवताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत," असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे रविवारी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 2021 कार्यक्रमात पवार यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, "आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना त्यांचे हक्क देण्याची, त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे."

पवार पुढे म्हणाले, "आदिवासी समाजातील इतर घटकात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळेच ते रयतेचे राज्य म्हटले जाते."

2. पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही

रेल्वे प्रशासनाने गाड्यांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरू आहे.

रेल्वे

फोटो स्रोत, ANI

त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्ययावत केली जात आहे. हे काम 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान रात्री साडे अकरा ते पहाटे साडे पाच या वेळेत केले जाणार आहे. त्यामुळे सहा तास आरक्षण प्रणाली बंद असणार आहे. प्रवाशांना या वेळेत आरक्षित तिकीट काढता येणार नाही. ऑनलाईन व आरक्षण केंद्रावरून देखील या वेळेत तिकीट सुविधा बंद असणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

कोव्हिड पूर्वीचे रेल्वेचे क्रमांक व अन्य सुविधा प्रवाशांना बहाल करण्यासाठी क्रिस हि संस्था आरक्षण प्रणालीत बदल करीत आहे. त्यासाठी आरक्षण प्रणाली पुढचे सात दिवस बंद ठेवली जाणार आहे.

3. अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार

बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

बातमीत नमूद केल्यानुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली.

महिला अत्याचार

पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली.

याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे.

4. झिका व्हायरसचे कानपूरमध्ये 123 रुग्ण

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे 123 रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

कानपूरमध्ये 23 ऑक्टोबर रोजी झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी आम्ही आवश्यक ती पावलं उचलत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत आहोत, असं प्रशासनानं म्हटलं आहे.

5. पुढचे 4 दिवस पावसाची शक्यता

दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील 4 दिवसांत पावसाची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)