आर्यन खान प्रकरण: 'श्रीमंतांच्या पोरांना अडकवायचं आणि खंडण्या उकळायच्या'- सामना #5मोठ्याबातम्या

सामना, शिवसेना, भाजप, ड्रग्ज
फोटो कॅप्शन, संजय राऊत, प्रभाकर साईल आणि समीर वानखेडे
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी संगनमत करून ड्रग्जसंदर्भातले खोटे गुन्हे दाखल करायचे

"सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी संगनमत करून ड्रग्जसंदर्भातले खोटे गुन्हे दाखल करायचे. प्रत्यक्षात भाजपचे हस्तक आणि पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दाफाश रोज सुरू आहे.

"श्रीमंतांच्या पोरांना अडकवायचं आणि खंडण्या उकळायच्या असा नवा कारभार भाजप पुरस्कृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचं अपहरण करण्यापर्यंत मजल गेली आहे. भाजपचे भागभांडवल या उद्योगात गुंतले आहे. असं असताना भाजप जनतेचा विश्वास जिंकेल असं पंतप्रधान कसं म्हणू शकतात," अशी 'सामनाच्या अग्रलेखात' जोरदार टीका करण्यात आली आहे.

अग्रलेखात पुढे लिहिलं आहे, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केली आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटर घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गाव वसवले आहे. चीनची ही सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडण्याची भाषा करा. सतत दोन वर्षं शर्थ करूनही सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाही ना- तेव्हा जरा जपून," असं सामनाने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे.

या अग्रलेखावर अद्याप भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

2. राज्य सरकारची खाजगी वाहतुकीला मान्यता

राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य करूनही कर्मचारी आंदोलकावर ठाम आहे. अखेर राज्य सरकारने प्रवाशांची पिळवणूक थांबवण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.

दिवाळी संपली तरही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न समिती स्थापन केली आहे. पण, तरीही एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलले आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

परिवहन विभागाने आता एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. एसटी महामंडळाच्या विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी मोटार अधिनियम 1988 (1988 चा 59) चे कलम 66 चे उपकलमचा खंड (N) अधिकारानुसार सर्व खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ही परवानगी एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही, तोपर्यंत लागू राहणार आहे. एसटी कर्मचारी कामावर परतल्यानंतर ही अधिसूचना रद्द होईल, असंही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

एसटी, संप
फोटो कॅप्शन, संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

"उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही समिती गठीत केली आहे. दुपारी 3 वाजता GR काढला. 4 वाजता बैठक घेतली, 3 सदस्यीय बैठक झाली. 5 वाजता बैठक घेऊन मिनिट्स दिले. कोर्टाच्या अंतिम आदेशाची प्रत मिळाली नाही, ते मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल", असं परब यांनी सांगितलं.

"राज्य सरकारने प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आम्ही पालन केले जर कोणी कोर्टाचा अपमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावर विचार करू. विलगिकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत, हे काम 1-2 दिवसात होत नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे", असंही परब यांनी स्पष्ट केलं.

3. महाराष्ट्राला पर्यावरण संवर्धनासाठी पुरस्कार

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली असून महाराष्ट्राला 'इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप साठी पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये भाषण केलं होतं. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

महाराष्ट्राला अंडर-2 कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर-2 कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

"हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच 'माय प्लॅनेट' ही चळवळ सुरू केली आहे," अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

4. सीआरपीएफ जवानाने केला सहकाऱ्यांवर गोळीबार

छत्तीसगडमधील सुकमा येथे एका CRPF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

तीन जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवान सीआरपीएफ 50 बटालियनचे आहेत. धनजी, राजीव मंडल आणि राजमणी कुमार यादव अशी मृत झालेल्या जवानांची नावे आहेत.

आरोपी कर्मचारी नाईट ड्युटीवर होता. आरोपीने हे भयंकर पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या घटनेचे शोक व्यक्त करताना सीआरपीएफने सांगितले की, "जवान रितेश रंजनने मरीगुडा पोलिस स्टेशन अंतर्गत लिंगापल्ली येथे तैनात असलेल्या आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला ज्यामध्ये 7 जखमी जवानांना तातडीने भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पोहोचल्यावर तिघांना मृत घोषित करण्यात आले.

5. अक्षय कर्णेवारचा अनोखा विक्रम

विदर्भचा क्रिकेटपटू अक्षय कर्णेवारने ट्वेन्टी20 सामन्यात चारही षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम केला आहे. असं करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी20 स्पर्धेत अक्षयने मणिपूरविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. एकही धाव न देता अक्षयने 2 विकेट्सही पटकावल्या. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

याआधी तीन षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम गौरव गंभीरच्या नावावर होता. अक्षयने हा विक्रम मोडला आहे. विदर्भने 222 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मणिपूरचा डाव 55 धावात आटोपला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)