समीर वानखेडे यांचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर, आरोप खोटे असल्याचा केला दावा

नवाब मलिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवाब मलिक
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचे काशिफ खान नावाच्या व्यक्तीशी चांगले संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

समीर वानखेडे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

काशिफ खान यांना तुम्ही ओळखता का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना समीर वानखेडे यांनी म्हटलं, "हे अगदी खोटं आहे."

क्रूझवरील पार्टीत काशिफ खान सहभागी होता आणि तुम्ही त्याला सोडलं, असाही आरोप करण्यात आला, असं विचारल्यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, "कायद्यानुसार न्यायनिवाडा होईल."

दरम्यान, नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत काशिफ खान या व्यक्तीविषयी माहिती दिली.

त्यानी म्हटलं, "काशिफ खान हा त्या रात्रीच्या पार्टीत त्याच्या प्रेयसीसोबत नाचत होता. काशिफ खान देशभरात फॅशन शोचं आयोजन करतो. पार्ट्यांचं आयोजन करतो. ड्रग्ज्स पुरवतो, सेक्स रॅकेट चालवतो. समीर वानखेडे यांच्याशी त्याचे चांगले संबंध आहेत. त्याला सोडून देण्यात आलं."

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याप्रकरणात मदत करण्याची विनंती केली आहे.

याविषयावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करा, असं वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिलं आहे. आम्ही 70 वर्षांपासून मुंबईत आहोत. आम्हीही याच राज्याचे नागरिक आहोत.

"वानखेडे यांचे कुटुंबीय किरीट सोमय्या यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. भाजप आता घाबरायला लागलं आहे. पोपट पिंजऱ्यात अडकला तर सगळे गुपित बाहेर येतील का, अशी भीती त्यांना वाटतेय."

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे -

  • भाजप नेते आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांचे राईट हँड एनसीबीच्या कार्यालयात जात आहे. त्यांच्या चकरा वाढल्या आहेत.
  • दाढीवाला कौन हे, असा प्रश्न मी मागे विचारला होता. त्याचं नाव आहे काशिफ खान. तो फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. फॅशनच्या नावाखाली तो जगभरात पोर्नोग्राफी आणि सेक्स रॅकेट चालवतो. त्या रात्रीच्या तो पार्टीत त्याच्या प्रेयसीसोबत नाचत होता.
  • काशिफ खान देशभरात फॅशन शोचं आयोजन करतो. पार्ट्यांचं आयोजन करतो. ड्रग्ज्स पुरवतो, सेक्स रॅकेट चालवतो.
  • समीर वानखेडे यांच्याशी त्याचे चांगले संबंध आहेत. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, अनेकदा काशिफ खानवर कारवाई का करत नाही, असं आम्ही विचारलं, तर त्यावर पुढे काही करण्यात आलं नाही.
  • काशिफ खानवर कारवाई केल्यास मोठमोठ्या लोकांची नावं यात समोर येतील.
  • मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करा, असं वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिलं आहे. आम्ही 70 वर्षांपासून मुंबईत आहोत. आम्हीही याच राज्याचे नागरिक आहोत. वानखेडे यांचे कुटुंबीय किरीट सोमय्या यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. भाजप आता घाबरायला लागलं आहे. पोपट पिंजऱ्यात अडकला, तर सगळे गुपित बाहेर येतील का, अशी भीती त्यांना वाटते.
  • बॉलीवूडला बदनाम करून ते मुंबईबाहेर जाईल, असं योगी आदित्यनाथ आणि इतरांना वाटतं. पण, हा त्यांचा गैरसमज आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या लोकांना या बॉलीवूडनं ओळख दिलीय.
  • रेडकर ताई तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करू पाहणाऱ्या लोकांचा हिस्सा आहात. महाराष्ट्र आणि स्थानिक अस्मितेच्या नावाखाली तुम्ही या प्रकरणावर चादर ओढू पाहत आहात, त्यात तुम्हाला यश येणार नाही.

तुमच्या विरोधात मोहित कंबोज यांनी 100 कोटींचा दावा दाखल केला आहे, याविषयी विचारल्यावर मलिक म्हणाले, "माझी एवढी औकात नाहीच. सगळं विकलं तरी माझ्याकडे 100 कोटी नाही. मला भंगारवाला म्हणतात, होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय केला. मीही आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसाय केला. माझे कुटुंबीय आजही करतात. मला त्याचा अभिमान आहे.

"माझ्या बापानं बनारसमध्ये चोरांकडून सोनं खरेदी केलं नाही, मी फ्रॉड करून बँकांचे पैसे खाल्ले नाही, बँकांचे पैसे बुडवलेले नाही, माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडलेली नाही, टीव्ही जर्नालिस्ट असोशिएसनला ब्लँक चेक दिला नाही, मुख्यमंत्री निधीतले पैसे बाऊन्स केले नाहीत. होय, मला अभिमान आहे मी भंगारवाला असल्याचा."

ते पुढे म्हणाले, "होय मी भंगारवाला आहे. पण, भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, ते या लोकांना माहिती नाही. जी वस्तू उपयोगी नसते, तो ती उचलून आणतो. त्याचे एकएक तुकडे करतो आणि शेवटी भट्टीत टाकतो आणि पाणीपाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जिकते भंगार आहेत, त्या सगळ्यांचे एकएक नटबोल्ट खोलून भट्टी टाकणार आहे. यांचं पाणीपाणी केल्याशिवाय नवाब मलिक भंगारवाला थांबणार नाही."

क्रांती रेडकर यांच्यावर अन्याय होणार नाही - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "ही लढाई एनसीबी विरुद्ध इतर अशी सुरू आहे. याच्याशी क्रांती रेडकरचा काय संबंध आहे? मला वाटत नाही त्यांच्यावर व्यक्तीश: कोणी बोललं आहे. ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरुन येऊन इथे मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?

"सतत दिल्लीतून आक्रमण होत आहे. केंद्रीय तपास होतोय, धाडी टाकल्या जातायत, खोटे गुन्हे दाखल होतायत. काल देगलूर इथे धाडी पडल्या, अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत? इथे सगळे मराठी आहेत."

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ते म्हणाले, "क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. सरकार ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. कोणावरही इथे अन्याय होत नाही."

"समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी करणार की मुंबई पोलीस? ते कसं काय ठरवणार? गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. मी फार बोलणार नाही, राज्य सरकारचा हा विषय आहे," असंही राऊत म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)