आर्यन खानः नवाब मलिकांनी केलेले 5 आरोप आणि समीर वानखेडेंनी त्यांना कसं उत्तर दिलंय?

फोटो स्रोत, Getty Images
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाल्यानंतर नवाब मालिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना सुरू झालाय.
या वादनाट्याचा दररोज एक नवा अंक आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यामातून जनतेसमोर येतोय.
समीर वानखेडे खंडणी वसूल करण्यासाठी दुबईला गेले होते असा आरोप मलिकांनी केला. त्याला समीर वानखेडे यांनी मुलांसोबत कोणी खंडणी वसूल करण्यासाठी जात नाही असं प्रत्युत्तर दिलंय.
मलिक विरुद्ध वानखेडे या वादात आत्तापर्यंत काय झालं? यावर एक नजर टाकूया…
आरोप नंबर 1
भाजप कार्यकर्ते NCB च्या कारवाईत काय करत होते मलिकांचा सवाल.
2 ऑक्टोबरला आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर NCB कार्यालयात आणण्यात आलं. त्यावेळेस आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या हाताला पकडून घेऊन जाणारा भाजप कार्यकर्ता मनिष भानुशाली असल्याचा आरोप मलिकांनी 6 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत केला.

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि इतर भाजप नेत्यांसोबतचे भानुशालीचे फोटो प्रसिद्ध केले. मनिष भानुशाली यांनी ते भाजप कार्यकर्ते असल्याचं मान्य केलं.
त्यावर समीर वानखेडे यांनी एनसीबी च्या कारवाईत स्वतंत्र साक्षीदार घेण्यात येतात. भानुशाली त्यापैकी एक आहेत. भानुशालीचा एनीसीबीशी संबंध नाही असा दावा केला.
आरोप नंबर 2
किरण गोसावीने एनसीबीच्या कारवाईत सहभाग कसा घेतला? त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत मग तो पंच-साक्षीदार कसा?
आर्यन खानला एनसीबी कार्यालयात नेताना किरण गोसावीचा व्हीडिओ प्रसारमाध्यमांकडे होता. किरण गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला.
एनसीबीने हा आमचा अधिकारी नाही असं स्पष्ट केलं. मलिकांनी यावर एनसीबीवर प्रश्न उपस्थित केले. एनसीबीचा अधिकारी नाही मग आरोपीसोबत कसा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. गुन्हे दाखल असलेला व्यक्ती साक्षीदार कसा असू शकतो हा सवालही उपस्थित करण्यात आला.
यावर उत्तर देण्यासाठी समीर वानखेडेंना पुढे यावं लागलं.

फोटो स्रोत, facebook
ते म्हणाले, "एनसीबीची कारवाई कायदेशीर आहे. याबाबत मुख्यालयाकडून स्टेटमेंट देण्यात आलंय मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एकच सांगतो की त्यावेळी दोन नाही तर नऊ पंच होते. सर्वकाही कायद्याला धरून आणि कायद्यानुसार करण्यात आलंय. काही अवैध करण्यात आलेलं नाही.
आरोप नंबर 3
8 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी एनसीबी ने भाजपच्या दिल्ली आणि राज्यातील नेत्यांच्या दबावामुळे भाजप नेत्याच्या नातेवाईकाला सोडलं असा आरोप केला.
यावर आपली बाजू स्पष्ट करताना समीर वानखेडे म्हणाले, "आम्ही 13 लोकांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर इतरांना सोडून देण्यात आलं. त्यांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आढळून आला नाही. त्यामुळे कोणाच्या दबावापोटी लोकांना सोडण्यात आल्याचा आरोप निराधार आहे. माझ्यावर कारवाईसाठी कोणाचाही दबाव नाही."
आरोप नंबर 4
बॉलीवूडमधील सेलिब्रिटी लॉकडाऊनदरम्यान मालदीवला असताना समीर वानखेडे यांचे कुटुंब सुद्धा तिथे होते. वानखेडे दुबईत काय करत होते? दुबई आणि मालदीवमधून वसुली केल्याचा मलिक यांनी आरोप केला. लवकरच यासंबंधी फोटो समोर आणणार आहे असं ते म्हणाले.
"माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे. मी दुबईला गेलो नाही. डिसेंबरमध्ये मी मुंबईत कार्यालयात होतो", असं म्हणत समीर वानखेडेंनी नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Twitter
"मालदिवला सरकारची परवानगी घेऊन कुटुंबासोबत गेलो होतो. मुलांसोबत जाऊन कोणी खंडणी वसूल करणार नाही. हे आरोप खोटे आहेत. मी कोणालाही भेटलो नव्हतो. मी फार छोटा अधिकारी आहे. ते वरिष्ठ मंत्री आहेत. इमानदारीने काम करण्यासाठी त्यांना मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मी त्यांना शुभेच्छा देतो", असंही वानखेडेंनी म्हटलं.
आरोप नंबर 5
समीर वानखेडे आणि एनसीबी खोट्या गुन्ह्यांत लोकांना अटक करतात असा आरोप मलिक यांनी केला. मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीने अटक केली होती. केमिकल अनालेसिस रिपोर्टमध्ये तो गांजा नाही हर्बल टोबॅको असल्याचं स्पष्ट झालंय असं नवाब मलिक म्हणाले. NCB ने आत्तापर्यंत केलेली कारवाई खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं.
समीर वानखेडे यांनी याचं उत्तर देताना सर्व कारवाया कायदेशीर झाल्याचा दावा केला. समीर खान प्रकरणी हायकोर्टात एनसीबीने याचिका दाखल केलीये.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप संपला नसला तरी याची सुरुवात तेव्हाच झाली. रिया चक्रवर्तीलाही यात फसवण्याचा प्रयत्न झाला. अनेक कलाकरांची चौकशी करण्यात आली असं मलिक म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























