साहित्य संमेलन: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

मेदक... कसलाच विचार न करता आम्ही हैदराबादवरुन या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं ठरवलं होतं. एका लेखासाठी आम्हाला तेव्हा दक्षिण भारतामध्ये फिरायचं होतं. कमीतकमी दिवसांमध्ये जास्तीतजास्त प्रदेश पाहायला मिळावा आणि भरपूर लोकांना भेटायला मिळावं या एकमेव उद्देशानं आम्ही प्रवासाचं आडवंतिडवं प्लॅनिंग केलेलं.

याच प्रवासात आम्ही मेदक हे तेलंगणाचं जिल्ह्याचं केंद्र एका रात्रीसाठी ठेवलं होतं. हैदराबादेत दिवसभर काम करायचं आणि रात्री मेदकला जाऊन झोपायचं... सकाळी तिथं काही लोकांना भेटायचं असा विचार करुन आम्ही मावळतीच्या आधी हैदराबाद सोडलं होतं.

फक्त 80 किलोमीटरच्या या गावात हैदराबादसारखं नसेल पण जिल्ह्याचं ठिकाण म्हणून रात्री राहाण्यासाठी, जेवण्यासाठी नक्कीच सोय असेल असं वाटलं होतं.

मेदक

फोटो स्रोत, TWITTER/@serish

फोटो कॅप्शन, मेदकच्या किल्लयावरुन दिसणारं मेदक गाव

पण हा सगळा महाराष्ट्रात राहून सवय झालेल्या आमच्या मनाचा अंदाज त्या संध्याकाळी खोटा ठरणार होता. अंधार पडत चालल्यावर मेदकचा रस्ता अक्षरशः शोधायला लागत होता. अनेक लहान वाड्यांमधल्या लोकांनी वेगवेगळा रस्ता दाखवून जेरीस आणलं होतं.

एका जिल्ह्याच्या केंद्रापर्यंत पोहोचायला तेही राजधानीपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी त्रास होऊ शकतो हे पटणारं नव्हतंच. पण खरे धक्के पुढं बसणार होते.

मेदकमध्ये पोहोचल्यावर आम्हाला कळलंच नव्हतं की, आम्ही इथं येऊन पोहोचलोत. एका लहानशा गावात नव्हे मोठ्या खेड्यात आपण आलोय असं वाटायला लागलं. मेदक हे जिल्ह्याच्या ठिकाणाचं शहर किंवा गाव नव्हतं तर ते खेडंच वाटत होतं.

संध्याकाळी साडेसात वाजता सगळं मेदक झोपलं होतं किंवा इथं दिवसभर काही वर्दळ झालीच नसावी असं वाटत होतं. एक लहानसं बस स्टँड, त्याच्या जवळपास खानावळीसारखी हॉटेलं आणि आजूबाजूला चार-दोन गल्ल्या एवढाच त्या गावाचा पसारा नव्हे आवाका होता.

इथं राहाण्यासाठी हॉटेल मिळेल की नाही अशी शंका यायला लागली. बरोबरच्या महिला सहकाऱ्याची राहाण्याची सुरक्षित आणि किमान सोय व्हायला पाहिजे हे एकमेव काम उरलं होतं. मेदकच्या किल्ल्यात हेरिटेज हॉटेल आहे असं इंटरनेटवर कळल्यावर तिकडे जायचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे तिकडेही जाता येत नव्हतं.

शेवटी एका साधा लॉज दिसला. तिथं अक्षरशः सर्वांना जागं करुन, उठवून खोल्या मिळवाव्या लागल्या. मेदक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत एका पंतप्रधानांनी, एका अभिनेत्रीनं आणि नंतर मुख्यमंत्री झालेल्या एका व्यक्तीनं केलं होतं. इतकंच नाही तर तेलंगणच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात मोडतो.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

मेदकच्या रुपानं मला तेलगंणचा एक लिटमस सापडला होता. आदल्या दिवशी हैदराबाद-सायबराबादचा जो लखलखाट पाहिला होता, जो वेग पाहिला होता, मेट्रोचं काम पाहिलं होतं. दुसऱ्याच दिवशी हे मेदक गाव पाहायला मिळालं होतं.

कदाचित या स्थितीचा दोष आजच्या राजकारण्यांवर, लोकांवर टाकता येणारही नाही. पण त्या निमित्तानं एक सामूहिक अपयशाचं उदाहरण पाहायला मिळालं होतं. या अनुभवामुळे माझं मन मेदक किंवा तेलंगणपेक्षा महाराष्ट्रावर विचार करू लागलं. आपल्या राज्यात तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सेवा-सोयीसुद्धा अनेक पावलं पुढे गेलेल्या आहेत हे लक्षात यायला लागलं.

महाराष्ट्रात आपल्या राज्याच्या म्हणून काही समस्या आहेतच पण आपल्या राज्याबाहेर नव्हे जिल्ह्याबाहेरही आपण न डोकावल्यामुळे आपल्याकडे नक्की काय चांगलं आहे याची आपल्याला जाणीव होत नसावी. महाराष्ट्रात मराठवाडा वगळता बहुतांश भागाच्या पायाभूत सुविधांनी बऱ्याच आधीपासून वेग घेतलेला आहे.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

आपला महाराष्ट्र नक्की कसा आहे, तो भविष्यात कसा असावा, त्याची नक्की प्रतिमा कशी आहे, सध्याची आपण स्वीकारलेली प्रतिमा कोणी तयार केली आहे? अशा अनेक प्रश्नांना आपण मराठी माणूस किंवा महाराष्ट्रात राहाणारे कधीही हात लावलेला नसतो. त्यावर वेगळा असा विचार केलेला नसतो. जे सुरू आहे ते आपण स्वीकारून टाकलेलं असतं.

आपल्या राज्याची किंवा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात राष्ट्र (Nation) अशा अर्थाने कोणतीही नीट प्रतिमा तयार झालेली नसते. जी झालेली आहे ती आपण न विचार करता किंवा विचार करायला लागू नये यासाठी स्वीकारलेली असते.

असा विचार केला नसल्यामुळेच आपल्यावर तयार मतं लादली जातात. महाराष्ट्र एक पुणे-मुंबई-नाशिक त्रिकोणात राहाणाऱ्या माणसांसारखा समूह आहे सगळा महाराष्ट्र असाच आहे असा एक समज सर्वत्र करुन दिलेला असतो.

महाराष्ट्रात राहाणाऱ्या लोकांनाही ही प्रतिमा स्वीकारावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले सिनेमे प्रदीर्घकाळ पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि पुणे आणि मुंबईत तयार होत असत.

कोल्हापूरमध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये एकप्रकारची कथित ग्रामीण बोली वापरली जायची. त्यात होतीचं 'व्हती' आणि होयचं 'व्हय' केलेलं असे. पण नीट लक्ष दिलं तर अशी भाषा खुद्द कोल्हापुरातही बोलली जायची नाही.

महाराष्ट्रातल्या इतर ग्रामीण बोलींचा विचार केला तर त्यात भरपूर विविधता दिसून येते. एकेका जिल्ह्यामध्ये ग्रामीण बोलींमध्ये फरक पडलेला दिसतो. आपल्या कित्येक जिल्ह्यांच्या मुख्य शहरांचीही एक वेगळी बोली असल्याचं दिसून येतं.

ही सगळी विविधता हे महाराष्ट्राचं सौंदर्य आहे. काही सिनेमे आणि जाहिरातींमधून संपुर्ण महाराष्ट्रावर इस्त्री फिरवून ती सपाट करण्याचा फटका आपल्या प्रतिमेला बसलेला दिसतो.

जालना जिल्ह्यातलं एक शिल्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जालना जिल्ह्यातलं एक शिल्प

आपला प्रदेश विविधतेचा, अनेक बोलींचा, धर्मांचा, भाषांचा, जातींचा, समूहांचा, वैचारिक प्रवाहांचा प्रदेश आहे हे स्वीकारलं नाही तर राजकारणी लोक मतासांठी जी प्रतिमा आपल्यावर लादतील ती स्वीकारावी लागते. आपलं बहुतेक तसंच झालेलं आहे.

महाराष्ट्र हा नव्या परंपरा स्वीकारणारा, कालबाह्य परंपरा मोडणारा प्रांत आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. किंबहुना परंपरा मोडणं ही आपली परंपरा आहे हे लक्षात घ्यावं लागेल. तेच आपल्या प्रांताचं वैशिष्ट्य, गुण आणि सौंदर्य आहे.

प्रत्येक आधुनिक विचार, नवे प्रवाह महाराष्ट्रानं सर्वात आधी स्वीकारले आहेत. आधुनिकता, काळानुरुप बदलण्याची आपल्या प्रांताची आजवरची धडपड पाहिली की त्याचं खरं महत्त्व समजेल.

समाजसुधारणा, राजकीय सुधारणा, शिक्षण, साहित्य, संगीत, कला, क्रांतीकार्य या सर्वांमध्ये महाराष्ट्रानं अग्रेसर राहाण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित महाराष्ट्राबाहेर डोकावून पाहिलं की याचा अंदाज येतो. महाराष्ट्राबाहेर पाहिल्यावर आपल्याला या बदलाच्या संस्कृतीने काय दिलं ते समजतं.

आपली भाषा

मराठी अभिजात आहे, तिला अभिजाततेचा दर्जा द्या अशी मागणी राजकीय नेत्यांच्या घोषणांबरोबर करायला बरी वाटते पण प्रत्यक्षात आपण आपल्या भाषेला कितपत ओळखलं आहे, तिच्यावर कसं प्रेम करत आहोत याकडे लक्ष देत नाही. अगदी आजूबाजूला सहज पाहिलं तर मराठी आपल्याकडे वेगवेगळ्या ढंगाने बोलली जाते.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देशात तिच्यात मोठे बदल होतातच त्याहून लहान लहान प्रदेशात ती वेगळ्या ढंगात दिसून येते.

उत्तर महाराष्ट्रातील मराठीत हिंदी, गुजरातीचा प्रभाव, विदर्भाची वेगळी वैशिष्ट्यं असणारी बोली, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील भाषेत कन्नड शब्दांचा प्रभाव, कोकणातील वेगळी बोली हे आपलं सौंदर्य आहे. सर्वांनी सरधोपट एकाच बोलीत बोललं पाहिजे हा अट्टहास या सौंदर्याला मारक ठरणारा आहे.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याकडे केवळ प्रदेशानुसार नव्हे तर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य शहराचीही एक वेगळी बोली तयार झाल्याचं दिसतं.

ईस्ट इंडियन, कुपारी अशा समुहांच्याही स्वतःच्या बोली आहेत. आता हीच खरी वेळ आपल्या या सौंदर्याची ओळख करुन घेण्याची आहे. याच काळात आपण थोडे ग्रह बाजूला करुन महाराष्ट्र पाहायला घेतला तर त्याचं थोरपण लक्षात येईल.

सगळे इथेच का 'कडमडतात'?

तुम्ही महाराष्ट्राची लूट लावली आहे? इथं कशाला गर्दी करायला आले हे लोक?, हे लोक आले आणि आमचे प्रश्न वाढले असा एक साधारणतः तक्रारीचा सूर मराठी माणसात दिसून येतो. किंबहुना एखाद्या प्रश्नाचं खापर फोडण्यासाठी याचा वापर केला जातो. निवडणुकीच्या काळातही हा विषय डोकं वर काढेल अशी सोय केली जाते. पण खरंच महाराष्ट्रात लोक का येतात हे पाहिलं तर अनेक चांगल्या गोष्टी समजतील.

खरंतर मुंबई आणि उत्तर भारताचा संबंध गेली 2,000 वर्षं येत आहे.

मुंबईच्या साठे महाविद्यालयात एन्शंट इंडियन कल्चर आणि आर्किओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सूरज पंडित यांच्या मते "बंगाल आणि बिहारशी मुंबईचे प्राचीन संबंध आहेत. तेव्हापासून मुंबईत व्यापाऱ्यांनी येणं, काही वर्षं राहून जाणं, स्थायिक होणं सुरू आहे."

नालंदा विद्यापीठ आणि मुंबईचे संबंध असल्याचेही ते सांगतात.

आता मुंबई राजधानी असलेल्या राज्यावर आज भगवा फडकला, असं सांगितलं जात असलं तरीही मुंबईवर आणि पर्यायाने आजच्या महाराष्ट्राच्या भूभागावर अनेक शतके उत्तर भारतीय सत्तांचा ताबा होता.

उत्तर कोकणावर मौर्यांपासून अनेक राजवटी राज्य करत असल्याचं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील एन्शंट इंडियन कल्चर विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता कोठारे सांगतात.

त्या म्हणतात, "कोकणावर राज्य करणाऱ्या मौर्यांना 'कोकणचे मौर्य' असंही नाव होतं. मौर्यांनंतर सातवाहनांच्या काळात अग्निमित्र नागपूरला आला होता. त्याचा उल्लेख कालीदासानं त्याच्या महाकाव्यांमध्ये केलेला आहे. सातवाहनांनंतर क्षत्रप आले. त्यापाठोपाठ अनेक व्यापारी येऊ लागले.

"मुंबईच्या परिसरामध्ये कल्याण, ठाणे, नालासोपारा ही बंदरं असल्यामुळे व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यांच्यानंतर कलचुरींच्या माध्यमातून राष्ट्रकूट, यादव, शिलाहार अशा राजवटी बदलत गेल्या. नंतरच्या काळात अरबही आले. याचाच अर्थ मुंबईच्या जवळचा परिसर व्यापारामुळे आधीपासूनच कॉस्मोपॉलिटन होता, असा होतो."

असं म्हटलं जातं की, मुंबईत इंग्रजांनी पाय ठेवल्यापासून उत्तर भारतीय 'भय्ये' येत आहेत. 1857च्या उठावानंतर उत्तर भारतात बहुतांश मुस्लीम संस्थानं आणि दस्तुरखुद्द मुघल बादशहाच देशोधडीला लागल्यावर प्रजाही देशोधडीला लागली. कामकाज, व्यवसाय ठप्प झाल्यावर अनेक लोक दक्षिणेकडे सरकले. मध्यप्रांतात आणि उत्तर महाराष्ट्रात बर्हाणपूर, मालेगाव इथं स्थायिक झाले आणि शेवटी मुंबईकडे सरकले.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईकर आणि उत्तर भारतीय यांचा खराखुरा संबंध गेल्या दोन शतकांमध्ये जास्त आला आहे. कित्येक उत्तर भारतीयांच्या अनेक पिढ्या इथंच राहिल्या आहेत. त्यामुळे तेही मुंबईकरच होतात. तरीही अध्येमध्ये त्यांच्याविरोधात असंतोषाची लाट का येते, का प्रश्न उरतोच.

मुंबईत राहाणाऱ्या लोकांच्या मनात अचानक स्थलांतरितांच्या विरोधात का विचार येतात, याचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही विचार होण्याची गरज आहे. 'आपले रोजगार हे लोक घेऊन जात आहेत', ही भावना त्यांच्या मनात का येते याचा शोध घेण्याची गरज आहे.

नवे रोजगार स्वीकारणं किंवा उत्तर भारतीय करत असलेली कामं करण्याऐवजी त्यांच्याविरोधात घोषणा देऊन तात्पुरतं खापर फोडून मोकळं होणं का आवडत असावं, याचा विचार व्हायला हवा. किंबहुना तसाच विचार केला जावा, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात का हे तपासणं गरजेचं आहे.

उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांचं राहणीमान, त्यांची कौटुंबिक व्यवस्था मराठी माणसापेक्षा वेगळी असल्याने अनेकदा लोक या मुद्द्यांवरूनही विचार करून पाहातात. खाण्यापिण्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयींबद्दल दोन्ही समुदायांचे आचार-विचार वेगवेगळे आहेत.

मुंबईमध्ये कार्यरत असणारे मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी यावर अधिक माहिती दिली. स्थलांतरितांना नेहमीच त्रास होतो आणि संकटकालीन स्थितीत तो जास्तच होतो, असं ते म्हणतात.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले होते, "समाज बदलाच्या प्रक्रियेत कोणताही समाज नेहमी एखाद खलनायक शोधत असतो. एकेकाळी लोक इंग्रजांना व्हिलन मानायचे. तेच रूढ झालं. त्यामुळे कोणतंही सरकार आपल्याला खलनायक वाटत असतं.

"प्रत्येक जण प्रत्येक स्तरावर हा खलनायकाचा वापर करत असतो. याला 'प्रोजेक्शन मेकॅनिज्म' असंही म्हटलं जातं. स्वतःच्या प्रश्नांच्या मागचं कारण दुसरी व्यक्ती किंवा समाज आहे, असं सांगून त्यांच्याकडे बोट करायचंहा प्रायमरी डिफेन्स असतो. एकदा दुसऱ्याकडे बोट दाखवलं की आत्मपरीक्षणाची गरज लागत नाही. ही खदखद सुरूच असते. संकटकाळात तिला तोंड फुटतं."

युरोपियन वसाहतवाद्यांनी सुरुवातीच्या काळात भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती आपलं बस्तान बसवलं होतं. परंतु नंतर त्यांना आपल्या वसाहतींना स्थैर्य आणि व्यापाराला उर्जितावस्था हवी असेल तर पश्चिम भारतात विस्तार केला पाहिजे हे समजलं. एकदा पश्चिम भारतात त्यांनी पाय रोवले ते कायमचेच. मुंबई, गोवा, दमण, वसई अशा जागांचं महत्त्व त्यांना कळलं.

वसाहतवाद्यांप्रमाणे परदेशातून आलेल्या धर्मांनाही भारताचा हा पश्चिम किनारा आवडला. पारशांनी संजाणात पाय रोवले पण ते सरकले मात्र मुंबईच्या बाजूला. तसंच काहीसं ज्यू लोकांचंही झालं. जगभरात ज्यू लोक वाट फुटेल तिकडे पळून गेले होते.

अचानक आलेल्या या अनोळखी लोकांना जगभरातल्या त्या त्या देशातल्या लोकांनी कमी-अधिक प्रमाणात त्रासही दिला. पण भारतात त्यांच्यावर अत्याचार झाले नाहीत असं सांगतात. हे ज्यू सुद्धा महाराष्ट्रात बेने इस्रायली नावाने शेकडो वर्षं नांदले.

भारतात ज्यू लोकांवर अत्याचार झाले नाहीत असं मी एकदा माझ्या इस्रायलमधील मित्राला सांगितलं. तर तो म्हणाला, "तुझं म्हणणं काहीसं खरं आहे. पण पूर्ण खरं नाही. ज्यू लोकांवर महाराष्ट्रात अत्याचार झाले नाहीत पण गोव्यात झाले. गोव्यात पोर्तुगिजांनी जसा सर्व समुदायांना त्रास दिला तसा आम्हा ज्यू लोकांवरही झाला होता."

मुंबईतलं एक बेने इस्रायली कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतलं एक बेने इस्रायली कुटुंब

ज्यू लोकांवर भारतात पोर्तुगिजांकडून अत्याचार झाला याबद्दल दुःख वाटलंच पण महाराष्ट्रात मात्र त्यांना त्रास झाला नाही हे ऐकून समाधान वाटलंच.

भारतामध्ये ज्यू सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं. अलिबागजवळ नौगावमध्ये जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि स्थायिक झाले. या लोकांनी आपला पूर्वापारचा तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू ठेवला.

राजपूरकर (राजापूरकर नव्हे), तळकर, नौगावकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, झिराडकर, चेऊलकर, अष्टमकर, आपटेकर, आवासकर, चिंचोलकर, चांडगावकर अशी साधारण 350 आडनावं मराठी ज्यूंमध्ये आढळतात. या लोकांनी स्वतःला बेने इस्रायली म्हणजे 'इस्रायलची लेकरे' म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

बरीच वर्षं हे लोक कोण असावेत याचा अंदाज स्थानिक लोकांना नव्हता. एके दिवशी डेव्हिड रहाबी नावाचे गृहस्थ कोकणात आले. त्यांचा कोकणात येण्याचा काळ काही ठिकाणी इ.स. 1000, काही ठिकाणी 1400 तर काही ठिकाणी इ. स. 1600 असावा असं मानलं जातं.

'इवोल्युशन ऑफ द बेने इस्रायल्स अँड देअर सिनगॉग्स इन द कोकण' पुस्तकाच्या लेखिका डॉ. इरेन ज्युडा यांनी डेव्हिड रहाबी यांच्या कामाबद्दल लिहून ठेवलं आहे.

डेव्हिड रहाबी यांनी या लोकांचे वर्तन आणि चालीरिती ज्यू लोकांच्याच असल्याचं ओळखलं. त्यांनी शापूरकर, झिराडकर आणि राजपूरकर कुटुंबातल्या तीन लोकांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व समुदायाला ज्यू धर्माच्या शिकवणीची माहिती दिली. या तिघांना 'काझी' असा शब्द त्यांनी वापरला आहे. हळूहळू या कुटुंबांनी हिब्रू शिकून धर्मग्रंथांचं वाचन सुरू केलं.

'मुंबईचे वर्णन' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद नारायण माडगावकर यांच्या मते बेने इस्रायली लोक 1750 साली कोकणातून मुंबई बेटात आले. त्यानंतर त्यांनी कमांडंट, मेजर सुभेदार, नाईक, हवालदार अशी पदं पलटणीत मिळवली असं ते लिहितात.

मुंबईतलं काळाघोडा इथलं नेसेट इलियाहू सिनेगॉग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतलं काळाघोडा इथलं नेसेट इलियाहू सिनेगॉग

बेने इस्रायली लोक इंग्रजी शिकून ऑफिसात काम मिळवतात किंवा शिक्षकही होतात, असं ते या पुस्तकात सांगतात. या बेने इस्रायलींमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार होत असल्याचा उल्लेख ते आवर्जून करतात. त्यानंतर ते भारतभर पसरत गेले, काही परदेशात गेले. इस्रायलची स्थापना झाल्यावर बहुतांश बेने इस्रायली इस्रायलला निघून गेले.

तीनवर्षांपूर्वी यातल्या काही बेने इस्रायली आजी-आजोबांची भेट झाली. मुंबईतून अलिबागला आणि नौगावला त्यांच्याबरोबर जाता आलं होतं. बोलताना या लोकांनी एकदाही हिंदी, इंग्रजी शब्द तोंडातून काढला नाही. सतत शाळेच्या आणि लहानपणच्या आठवणी सांगत होते.

अलिबागला गेल्यावर या लोकांनी थेट ताडगोळ्यांवर झेप घेतली. एका आजोबांनी तर यजमानांच्या घरी मला उकडीचा मोदक करुन दाखवला. महाराष्ट्रातून चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ते इस्रायलला गेले होते पण त्यांच्यामधलं मराठीपण आणि महाराष्ट्र अधिकच घट्ट झालेला दिसला.

या बेने इस्रायली, मराठी मुसलमान, मराठी ख्रिश्चन, कुपारी, इस्ट इंडियन समुहांमध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खोलवर झिरपलेली आहे. लग्न किंवा इतर सण समारंभांवर त्यांची छाप दिसते, मंगळसूत्र घालणे, बांगड्या भरणे अशा चालिरीतीही उतरलेल्या आहेत. गावागावात राहाणारे सर्व धर्माचे लोक मराठीतच बोलतात, त्यांचे स्थानिक पातळीवरचे व्यवहार मराठीत होत असतात. ही अत्यंत आश्वासक बाब आहे.

असे स्थलांतरित आपल्या राज्याच्या अनेक कोपऱ्यांमध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण गेली अनेक शतके स्वागत केलं आहे. हे लोक जसे महाराष्ट्रात येऊन इथलेच झाले तसेच महाराष्ट्रातले लोकही बाहेर जाऊन स्थिरावलेले आहेत.

परंतु नर्मदेच्या पलिकडे टाचा उंचावून पाहाण्याचं काम आपण करत नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली इथं पिढ्यानपिढ्या राहाणाऱ्या मराठी लोकांच्या मनात यामुळेच तुटलेपणाची भावना येते.

मॉरिशस असो की मध्य-उत्तर भारत तिथल्या मराठी माणसाकडे पाहायला आपल्याला वेळच नाही. ती मंडळी मात्र गणपती-दिवाळीतून, चिवडा-लाडवातून, हळदीकुंकवातून जमेल तसं मराठीपण टिकवत राहिली आहेत. बाहेर हिंदी, इंग्रजी शाळांमध्ये जावं लागलं तरी घरात आवर्जून मराठी शिकवण्याची धडपड ते करतात. याची आपण नोंद तरी घ्यायला हवी.

बेळगाव आणि इतर गावं आपल्या राज्यात यावी यासाठी दरवर्षी आंदोलन होतं, लेख लिहिले जातात. सोशल मीडियावर तावातावानं बोललं जातं तो प्रदेश महाराष्ट्रात कधी येणार हा प्रश्न थोडावेळ बाजूला ठेवता येईल.

पण तोपर्यंत आपण मराठी माणूस म्हणून काय केलं आहे का? त्यांना महाराष्ट्रात यावंसं वाटेल यासाठी आपण काही नातं वाढवण्याचा प्रयत्न केलं का? हे स्वतःला विचारुन पाहिलं की आपल्या आत्मकेंद्रीत विचारांवर प्रकाश पडेल.

परप्रांतियांमुळे आपल्या राज्याचं नुकसान होतंय अशी तोंडी आणि सोशल मीडियावर हाकाटी देणं फारच सोपं आहे. त्यामुळे कदाचित आपल्या चुका तात्पुरत्या झाकल्या जातील पण त्यामुळे महाराष्ट्र म्हणून, एक राज्य म्हणून, मराठी माणूस म्हणून आपला फारसा विकास होणार नाही हे निश्चित.

पदार्थांना कधी मिळणार सन्मान?

मराठी पदार्थांच्याबाबतीतही आपण एक विनाकारण न्यूनगंड बाळगलेला दिसतो. हॉटेलात जाणं असो की कार्यक्रम यामध्ये इतर प्रांतांच्या किंवा परदेशातल्या पदार्थांना पसंती दिली जाते. असं करायलाही काही हरकत नाही पण त्यामागे आपले पदार्थ, आपली खाद्य संस्कृती कमीपणाची आहे अशी भावना असता कामा नये.

आपले परप्रांतातून आलेले मित्र-मैत्रिणी महाराष्ट्रात तयार होणाऱ्य़ा पदार्थांवर तुटून पडताना दिसतात. तुम्ही मराठी खाद्यसंस्कृतीची जाहिरात का करत नाही असंही विचारतात. पण त्यावर फारसं काही होत नाही.

'चलता है' असा एक मरगळलेला भाव आपल्या प्रतिक्रियांमधून डोकावतो. ही मरगळ झटकली तर आपले पदार्थही महाराष्ट्राची सीमा ओलांडतील, सर्वत्र आवडीने खाल्ले जातील यात शंका नाही.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

पातोळे, मोदक, पुरणपोळी, खिरीचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी पक्वान्नं, मांसाहारी पदार्थ खास मराठी घरात होणाऱ्या भाज्या, चिरोटे, चकल्या असे अनेक पदार्थ मराठमोळा शिक्का घेऊन चार भिंतीतच अडकले असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या पदार्थांची बाहेर फारशी जाहिरात किंवा त्याची माहिती नसते.

महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना फक्त मिसळ, साबुदाणा खिचडी, वडापाव आणि एकदोन माशाचे पदार्थ यापलिकडे माहिती नसतं.

मराठी पदार्थ मागे का राहिले असावेत याबद्दल पत्रकार योगेश पवार यांना विचारलं होतं. तेव्हा ते म्हणालेले याचा संबंध कदाचित आपल्या मानसिकतेत असावा.

दिवाळी 2021: महाराष्ट्राची खरी प्रतिमा कोणती? आपण महाराष्ट्राकडे कसे पाहातो?

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "थोडी बंदिस्त जगण्याची सवय, इतर समाजांमध्ये मिसळणं यामुळे आपण इतरांपासून दूर राहातो. तसेच इतर भारतीय समाजही मराठी समाजाबद्दल द्वेषभावना ठेवून जगू लागतात. त्यामुळे हे आदानप्रदान फार कमी होते."

योगेश पवार यांनी महाराष्ट्रातले जे पदार्थ बाहेर गेले त्याबद्दल सांगताना आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सपाटीकरण झाल्याचं मत व्यक्त करतात.

वार यांच्यामते, "जे पदार्थ बाहेर सांगितले किंवा प्रसार करण्यात आळे ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतीलच असे नाही. ते काही वर्गांमध्ये, उच्च जातींमध्ये केले जाणारे पदार्थ आहेत. महाराष्ट्र इतका सरळसपाट नाही. प्रदेशानुसार त्यातही पदार्थ बदलत जातात. पुरणपोळी ऐवजी काही प्रदेशात मांडे खाल्ले जातात. पुरणाचेही अनेक प्रकार आहेत. या सगळ्याला प्रतिनिधित्व मिळत नाही."

ड्यूक विद्यापीठामध्ये 'कल्चरल अँथ्रोपोलॉजी' शिकवणाऱ्या हॅरिस सोलोमन यांचं उदाहरण योगेश पवार देतात.

पवार म्हणाले, "अनेक लोक महाराष्ट्राच्या पदार्थांचा अभ्यास करतात हे आपल्याला माहिती नसतं. सोलोमन यांनी 'पॉलिटिक्स ऑफ फूड'वरती अभ्यास करताना वडा-पाववर पी.एचडी केली आहे. ज्यांना मराठी पदार्थांबद्दल कुतूहल आहे त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

महाराष्ट्राचं हे कॉस्मोपॉलिटन रुप जपण्याची, ते समजून घेण्याची, तिचा प्रसार करण्याची हीच खरी वेळ आहे, असं वाटतं. दिवाळी, गणपती, महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन हे त्यासाठी साजरे झाले तर खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती जगल्याचं समाधान आपल्या सर्वांना मिळेल.

जाता जाता...

काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गात चिपीला विमानतळ झालं. तिथं एक मित्र विमानाने गावाला जाऊन आला. परतल्यावर त्याने एका गावच्या किनाऱ्याचा फोटो त्याने दाखवला. मला आधी वाटलं तो त्याच्या शेजारच्या गावचाच वाटला... त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यानं ते गाव इतकं सुंदर नाहीये असं उत्तर दिलं.

आता पाहायला गेलं तर या दोन ठिकाणांमधलं अंतर बोटीनं गेलं तर अगदी काही मिनिटांचं आहे. पण आपण शेजारच्या गावालाही चांगलं म्हणायची इच्छा बाळगायला हवी. पर्यटक शेजारच्या गावात आले काय किंवा आपल्या गावात आले काय एकच... ते येत आहेत हे महत्त्वाचं, उद्या आपल्याकडे येतील. असा विचार आपण करत नाही.

आता मराठी मनाला खरंच थोड्या खुलेपणाची, मोकळेपणाची आपल्याला गरज आहे. काही विचार सोडून द्यावे लागणार, नवे विचार स्विकारावे लागणार, त्यासाठी दुसरं कोणीही मदत करणार नाही. आपली प्रतिमा आपणच सशक्त करू शकू.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)