IPL 2021: चेन्नईच सुपर किंग्स; कोलकाताला नमवत जेतेपदावर कब्जा

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, फॅफ डू प्लेसिस
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

दमदार सलामीनंतर कोलकाताच्या फलंदाजीला खिंडार पाडत चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या जेतेपदावर कब्जा केला. चेन्नईने 192 धावांचा डोंगर उभारला. कोलकाताला 165 धावाच करता आल्या. चेन्नईने 27 धावांनी विजय मिळवला.

चेन्नईचं हे चौथं जेतेपद आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018 मध्ये जेतेपद पटकावलं होतं.

गेल्यावर्षी चेन्नईला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्लेऑफ्समध्ये स्थान पटकावता आलं नाही. त्यावेळी आम्ही पुनरागमन करू असा विश्वास धोनी आणि चेन्नईने चाहत्यांना दिला होता. चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवत चेन्नईने जेतेपदावर नाव कोरलं.

दमदार सलामी आणि घसरण

वेंकटेश अय्यर आणि शुभमन गिल या युवा जोडीने कोलकातासाठी 91 धावांची जोरदार सलामी दिली.

यंदाच्या हंगामाच्या उत्तरार्धात कोलकाताने शुभमन गिलच्या बरोबरीने वेंकटेश अय्यरला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोलकाताचं नशीब पालटवणारा ठरला.

अय्यर शून्यावर असताना त्याला धोनीकडून जीवनदान मिळालं. याचा फायदा उठवत अय्यरने 32 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या खेळीदरम्यान अय्यरने हंगामातलं चौथं अर्धशतक पूर्ण केलं.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, IPL

फोटो कॅप्शन, चेन्नईचे खेळाडू

गिल 27 धावांवर असताना जडेजाच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने त्याचा सुरेख झेल टिपला. मात्र चेंडू आकाशात असताना कॅमेऱ्याला धडकल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं. पंचांनी डेड बॉल घोषित केला आणि गिलला जीवनदान मिळालं.

शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रयत्न रवींद्र जडेजाच्या हातात जाऊन विसावला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नितीश राणा भोपळाही फोडू शकला नाही.

फटकेबाजीसाठी बढती देण्याता आलेला सुनील नरिन 2 धावा करून तंबूत परतला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने त्याचा सुरेख झेल घेतला.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी

जीवनदानाचा फायदा उठवत गिलने चौकार वसूल करत धावफलक हलता ठेवला. जडेजाच्या गोलंदाजीवर चौकार खेचत गिलने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पुढच्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न फसला. गिलने 43 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावांची खेळी केली.

धावगतीचं दडपण वाढत असताना अनुभवी दिनेश कार्तिकही बाद झाला. जडेजाच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने त्याचा झेल घेतला. कार्तिकने 7 चेंडूत 9 धावा केल्या. त्याच षटकात शकीब उल हसन भोपळाही न फोडता तंबूत परतला.

दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीला आलेला राहुल त्रिपाठी फार काळ खेळू शकला नाही. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर मोईन अलीने त्याचा झेल घेतला. त्याने दोन धावा केल्या.

कोलकाताचा कर्णधार आयोन मॉर्गन 4 धावा करून माघारी परतला आणि कोलकाताच्या विजयाच्या आशा मावळल्या.

ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या 18व्या षटकात कोलकाताने 18 धावा वसूल केल्या. 19व्या षटकात शार्दूलच्या स्वैर गोलंदाजीमुळे कोलकाताने 17 धावा काढल्या. कोलकाताला शेवटच्या षटकात 31 धावांची आवश्यकता होती. मात्र तळाचे फलंदाज कोणताही चमत्कार दाखवू शकले नाहीत.

चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने 3 तर जोश हेझलवूड आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

चेन्नईचा धावांचा डोंगर

आयपीएल स्पर्धेच्या 14व्या हंगामाच्या अंतिम लढतीत चेन्नईने कोलकाताविरुद्ध 192 धावांची मजल मारली. फॅफ डू प्लेसिसने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 86 धावांची खेळी केली.

फॅफ डू प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड या चौघांनी केलेल्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने कोलकाताला आव्हानात्मक लक्ष्य दिलं.

ऋतुराजने 635 धावांसह सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपचा मान पटकावला. डू प्लेसिसने दिमाखदार खेळी करत ऋतुराजला पिछाडीवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या चेंडूवर बाद झाल्याने ऑरेंज कॅप ऋतुराजलाच मिळणार हे स्पष्ट झालं. डू प्लेसिसने 633 धावा केल्या.

कोलकाताचा कर्णधार आयोन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुबईतल्या खेळपट्टीवर धावसंख्येचा पाठलाग करता येतो हा इतिहास लक्षात घेऊन मॉर्गनने हा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आधीच्या सामन्यातील संघ कायम राखला.

यंदाच्या हंगामात चेन्नईने केलेल्या एकूण धावांपैकी 50 टक्के धावा करणाऱ्या फॅफ डू प्लेसिस-ऋतुराज गायकवाड जोडीने अंतिम सामन्याचं दडपण न घेता 61 धावांची सलामी दिली. कोलकाताने एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2चे सामने शारजात खेळले होते.

दुबईची खेळपट्टी वेगळी आहे आणि मैदानाचा आकारही वेगळा आहे. डू प्लेसिस आणि ऋतुराज यांनी चौकार, षटकार आणि एकेरी-दुहेरी धावांचा मिलाफ साधत आक्रमण केलं. त्यांनी कोलकाताच्या एकाही गोलंदाजाला स्थिरावू दिलं नाही. पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये चेन्नईने 50 धावा पूर्ण केल्या.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड

हंगामात 600 धावांचा टप्पा पूर्ण केलेल्या ऋतुराजचा नरिनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शिवम मावीच्या हातात जाऊन विसावला. नरिनने त्याला बाद केलं. ऋतुराजने 3 चौकार आणि एका षटकारासह 27 चेंडूत 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

ऋतुराज बाद झाल्यानंतर डू प्लेसिसने सूत्रं हाती घेतली. लॉकी फर्ग्युसनच्या एका षटकात 17 धावा वसूल करत फॅफने इरादे स्पष्ट केले. याच षटकात फॅफने 35 चेंडूत अर्धशतक गाठलं. सुरेश रैनाऐवजी संधी मिळालेल्या रॉबिन उथप्पाने फटकेबाजीवर भर देत धावफलक हलता ठेवला.

शकीब उल हसन तसंच वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उथप्पाने चौकार-षटकार वसूल केले. नरिनच्या गोलंदाजीवर षटकार खेचल्यानंतर पुढच्याच चेंडूवर उथप्पा पायचीत झाला. त्याने 15 चेंडूत 31 धावांची आक्रमक खेळी केली.

उथप्पा बाद झाल्यावर फॅफने आक्रमणाची जबाबदारी घेतली. त्याला मोईन अलीने उत्तम साथ दिली. मोईनने शिवम मावीच्या षटकात दोन षटकार खेचले आणि चेन्नईने दीडशेचा टप्पा ओलांडला.

चेन्नईच्या योजनांचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मोईन अलीने धुवाधार फटकेबाजी केली. मोईनने 2 चौकार आणि 3 षटकारांसह 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली.

डू प्लेसिस-मोईन जोडीने 39 चेंडूत 68 धावांची वेगवान भागीदारी केली. ऋतुराज-डू प्लेसिस जोडीने 50 चेंडूत 61 तर डू प्लेसिस-उथप्पा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 32 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली.

कोलकातातर्फे सुनील नरिनने 2 तर शिवम मावीने एक विकेट घेतली. राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा दुखापतग्रस्त झाल्याने कोलकाताच्या चिंतेत भर पडली आहे.

चेन्नईने याआधी 2010, 2011, 2018 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाताने 2012 आणि 2014 मध्ये जेतेपदाची कमाई केली होती.

चेन्नईच्याच ऋतुराज गायकवाडने 635 धावा करत ऑरेंज कॅपवर नाव कोरलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या हर्षल पटेलने 32 विकेट्स पटकावत परपल कॅपचा मान पटकावला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)