लिबेरो ग्रासी : विसाव्या शतकातल्या सर्वांत धोकादायक माफियांशी एकटा लढणारा व्यापारी

ऑगस्ट 1991, सिसिलीच्या एका शक्तिशाली माफिया कुटुंबाने ग्रासी यांचा पाठलाग करण्यासाठी एक गाडी पाठवली.
ड्रायव्हर मारको फेवेलोरो यांच्या मते, "मी हे पाहायला गेलो होतो की ते एकटे आहेत की त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक आहेत. जेव्हा हे पक्कं कळलं की ते घरातून एकटेच बाहेर पडलेत तेव्हा सॅल्विनो मेडोनिआनी त्यांचा खून करायचं ठरवलं."
फेवलोरो नंतर सरकारी साक्षीदार बनले. त्यांनी म्हटलं, "मला मेडोनिओ यांनी एका पेपरस्टॉलवर भेटायला सांगितलं. हा स्टॉल शहराच्या मधोमध होता. मग त्यांनी गाडी चालवायला सांगितलं आणि ग्रासी यांच्या गाडीपाशी आम्ही थांबलो."
"त्यांनी गाडी सुरू ठेवून डावीकडचा दरवाजा उघडाच ठेवायला सांगितला. जेव्हा टार्गेट बिल्डिंगच्या बाहेर निघाले तेव्हा मेडोनिआ गाडीतून उतरले, त्यांनी वर्तमानपत्राच्या आत बंदूक लपवून ठेवली होती. ते ग्रासींच्या दिशेने गेले आणि त्यांनी अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर ते गाडीत बसून पळून गेले."
ग्रासींचा खून झालाय ही बातमी इटली आणि जगभरातल्या इतर देशांच्या पहिल्या पानावर छापली गेली. त्यांचा खून झाला कारण त्यांनी इटलीत माफियाच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी सार्वजनिकरित्या माफियांना पैसै द्यायला नकार दिला होता. या खंडणीला तिथे 'पिज्जो' किंवा 'प्रोटेक्शन मनी' असं म्हटलं जायचं.
ग्रासी यांची मुलगी एलिस यांनी बीबीसी विटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात म्हटलं होतं की, "माझे वडील शब्दाला पक्के होते. पण ते खूप लोकांशी बोलायचे नाहीत."
"आमचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि तेव्हा 100 लोक माझ्या वडिलांच्या फॅक्ट्रीत काम करायचे. 1980 साली आमचा व्यवसाय मेडोनिआच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या पालेरमात शिफ्ट झाल्या. तेव्हा ते वडिलांकडे खंडणी मागायला आले."
जेव्हा ग्रासींनी खंडणी द्यायला नकार दिला त्यानंतर तणाव सुरू झाला.
प्रिय खंडणीखोरांनो…
"त्यांनी फॅक्ट्रीवर हल्ला केला, पैसे चोरले, स्टाफ आणि रखवाली करणाऱ्या कुत्र्याचं अपहरण केलं. आम्हाला धमकीचे फोन यायला लागले. दुसऱ्या एका फॅक्ट्रीत काम करणाऱ्या माझ्या आईला त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनाही धमकी द्यायला लागले," एलिस सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
हा त्रास अनेक वर्षं चालला. ग्रासींच्या फॅक्ट्रीवर बॉम्ब टाकण्याचाही निष्फळ प्रयत्न झाला. तेव्हा ग्रासींना वाटलं की आता खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलंय.
त्यांनी एका स्थानिक वर्तमानपत्रात 1991 साली लिहिलं :
"प्रिय खंडणीखोरांनो,
मी त्या अज्ञात खंडणीखोरांना सांगू इच्छितो की त्यांनी धमकीचे फोन करण्यावर, फ्युज, बॉम्ब आणि प्रोजेक्टाईल विकत घेण्यावर होणारा खर्च बंद करून टाकावा कारण आम्ही पैसे देणार नाही.
मी ही फॅक्ट्री माझ्या कष्टाने उभारली आहे. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे आणि ही बंद करण्याचा माझा अजिबात इरादा नाही.
आज आम्ही पाच कोटी देऊ तर उद्या ते आणखी पैसे मागतील. परवा आणखी. दर महिन्याला पैसै मागतली. अशाने आमची फॅक्ट्री बंद करण्याशिवाय आम्हाला कोणताही पर्याय राहाणार नाही. म्हणूनच आम्ही 'सर्वेयर एंजलोन' (माफिया)ला नाही म्हणालो आणि त्याच्यासारख्या सगळ्यांना नाहीच म्हणणार."
कोणीही साथ दिली नाही
त्यांची मुलगी एलिस म्हणतात की जेव्हा हे खुलं पत्र वर्तमानपत्रात छापून आलं तेव्हा संपूर्ण कुटुंब काळजीत पडलं. पण सगळ्यांनी ग्रासींना समर्थन दिलं.
एलिस म्हणतात, "वडिलांना आशा होती इतर व्यापारीही त्यांची साथ देतील पण असं झालं नाही. पालेरमो आंत्रप्रिनर असोसिएशनच्या अध्यक्षांनी म्हटलं की त्यांना खंडणीखोरांबद्दल काहीही माहिती नाही. खरंतर ते स्वतःच खंडणी द्यायचे."
पण ग्रासींनी माध्यमांचं लक्ष वेधलं. त्यांना टीव्ही कार्यक्रमांमध्ये बोलावलं जाऊ लागलं.
त्यांनी एका समारंभात म्हटलं, "जर मी हरलो तर मला माझ्या कंपनीतली स्वायतत्ता गमवावी लागेल आणि माफिया म्हणतील तसे निर्णय घ्यावे लागतील. पण सगळ्यांनी माझ्यासारखं वागायचं ठरवलं तर कोणालाच पैसे द्यावे लागणार नाहीत."
हीरो?
मेडोनिआच्या ड्रायव्हरने जेव्हा ग्रासींचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्याला दिसलं की त्यांनी अगदी साधे कपडे घातलेत आणि ते कोणत्याही सुरक्षारक्षकांशिवाय फिरायचे.
ड्रायव्हरच्या मते, "त्यांनी फक्त आपली फॅक्ट्री आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांची एक गाडी तिथे पेट्रोलिंग करत असायची."
ते स्वतःला एक नायक समजायचे का?
एलिस याचं उत्तर देताना म्हणतात, "अजिबात नाही. ते स्वतःला एक सामान्य माणूस समजायचे. त्यांना वाटायचं की धमक्याशिवाय आपला व्यवसाय चालवणं एक सर्वसामान्य गोष्ट आहे आणि इतर देशांमध्ये असंच होतं."

फोटो स्रोत, Getty Images
मेडोनिया माफिया गटाचे प्रमुख होते फ्रेंचेस्को मेडोनिया. त्यांचा मुलगा सॅल्विनो स्वतः ग्रासींचा खून करायला गेला यावरून ग्रासींचं महत्त्व समजू शकतं.
एलिस म्हणतात, "मी माझ्या नवऱ्याबरोबर बार्सिलोनाला होते. मी माझ्या घरी फोन केला तर मला भावाने सांगितलं की त्यांच्यावर हल्ला झालाय आणि त्यांचा मृत्यू झालाय. मला विश्वास बसत नव्हता."
"आम्हाला आमच्या व्यवसायावर हल्ला होईल ही अशा होती पण वडिलांवर हल्ला होईल हे वाटलं नव्हतं. कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांवरून कळलं की मेडोनिआच्या मुलाने स्वतः माझ्या वडिलांना मारलं होतं कारण त्यांना एक उदाहरण घालून द्यायचं होतं."
"माझ्या वडिलांना सॅल्विनो मेडोनियाच्या हाताने मरण्याचा 'सन्मान' मिळाला."
नंतर काय घडलं?
2006 साली मेडोनिया पितापुत्रांना लिबेरो ग्रासींच्या खूनाच्या आरोपात शिक्षा झाली.

एलिस सांगतात, "पुराव्यांवरून स्पष्ट झालं होतं की इतर माफिया कुटुंब या घटनेने खूश नव्हते. त्यांना वाटलं की इतर व्यापारी आता पैसै देणं बंद करतील आणि असंच झालं. माझ्या वडिलांच्या हत्येनंतर व्यापाऱ्यांना ठरवावं लागलं की ते कोणत्या बाजूचे आहेत."
हळूहळू अनेक कंपन्यांनी ग्रासींसारखंच माफियांना पैसै देण्यास नकार दिला. 2004 साली अदिदियोपिज्जो (पिज्जोला निरोप द्या) नावाची एक चळवळ उभी राहिली. लिबेरो ग्रासींना हेच करायचं होतं.
"माझे वडील पालेरमोतल्या माफियांविरोधी आंदोलनात अग्रभागी होते. आता इथे एक हजार कंपन्या रजिस्टर्ड आहेत आणि 1991 च्या तुलनेत परिस्थिती बरीच सुधरली आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























