Pune International Airport : पुणे विमानतळ ऐन सणासुदीच्या काळात बंद का राहणार आहे?

फोटो स्रोत, Getty Images
पुण्यातील लोहगाव विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद असणार आहे. हवाई दलाने विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
या आधी देखील धावपट्टीच्या कामामुळे रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत विमान उड्डानं बंद ठेवण्यात आली होती.
केवळ 10 दिवस आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याने 16 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या चौदा दिवसांमध्ये पुण्यातील प्रवाशांना मुंबई विमानतळाचा वापर करावा लागणार आहे.
याबाबत माहिती देताना पुणे विमातळाचे संचालक संतोष ढोके बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, ''धावपट्टीचे काम करायचं असल्याने हवाई दलाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरी उड्डाने पूर्णपणे बंद असणार आहेत. या निर्णयाबाबतची माहिती विमान कंपन्यांना या आधीच देण्यात आली आहे.''
याआधी लॉकडाऊन काळात विमान उड्डाणं बंद असल्याने नागरिकांना तिकीटं रद्द करावी लागली होती. अनलॉकनंतर विमानसेवा पुन्हा पूर्वपदावर येत होती. हवाई दलाने यापूर्वी 26 एप्रिल ते 9 मे दरम्यान धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हे काम पुढे ढकलेलं असल्याचं सांगण्यात आलं होतं.
रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत धावपट्टीचं काम करण्यात येत असल्याने या काळात उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. आता संपूर्ण विमानतळ 14 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे विमानतळावरुन दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, नागपूर या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन पूर्वी देशातील सर्वांत बिझी एअरपोर्टमध्ये पुण्याच्या विमानतळाची गणना केली जात होती.
सध्या 58 ते 60 विमानांचे उड्डाण पुण्यातून होतं तर तितकीच विमानं लँडही करतात.
"16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान ज्या प्रवाश्यांनी तिकीट बुक केलं होतं ते प्रवासी आमच्या वेबसाईटवर जाऊन प्लॅन बी वर क्लिक करुन रिफंड क्लेम करू शकतात. तसेच प्रवाशांना याबाबतचा एसएमएस आम्ही लवकरच पाठवणार आहोत," अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सकडून मिळाली.
पुण्याच्या नव्या विमानतळाचं काय झालं?
पुण्यातील सध्याचं लोहगाव येथील विमानतळ हे हवाई दलाचं विमानतळ असल्याने पुण्याला स्वतंत्र विमानळ असावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. सुरुवातीला खेड येथे विमातळासाठी जागा निश्चित करण्यात आली होती, परंतु स्थानिक नागरिकांनी विमानतळाला विरोध केल्याने पुरंदर तालुक्यात विमानतळ करण्याबाबत चाचपणी करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
पुरंदर येथे निवडण्यात आलेल्या जागेलादेखील विरोध झाल्याने पुन्हा नवीन जागा निश्चित करण्यात येत आहे. परंतु अद्याप जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
19 जुलै रोजी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पुरंदर येथील विमानतळाची जागा अद्याप निश्चित झाली नसल्याची' माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. जेव्हा विमानतळाची जागा निश्चित होईल, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन कळविण्यात येईल असे देखील पवार म्हणाले होते.
त्या आधी फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्र सरकारला पुरंदरच्या जागेबाबतचा अहवाल दिला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























