MPSC: परीक्षेत ऑप्टिंग आऊटमुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 च्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल मंगळवारी रात्री जाहीर केला. यात सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला तर रोहन कुवर मागासवर्गीय प्रवर्गातून पहिला आला. मानसी पाटील हिचा मुलींमधून पहिला क्रमांक आला.
एसईबीसी आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत एमपीएससीने घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करु नये तसेच पदभरती करु नये, अशी मागणी करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने भरती प्रक्रियेचा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यानुसार एसईबीसीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरित करुन 420 पदांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.
हा निकाल जाहीर करत असताना आयोगाने 'ऑप्टिंग आऊटचा' पर्याय पहिल्यांदाच दिला होता. या पर्यायाचा वापर करत काही उमेदवारांनी आपला समावेश या निकालामध्ये करु नये असे आयोगाला कळवले होते. त्यामुळे या उमेदवारांना वगळून एमपीएससीने सुधारित निकाल जाहीर केला आहे.
ऑप्टिंग आऊट नेमकं आहे तरी काय ?
सर्वोच्च न्यायालयाने एसबीसीच्या बाबतीत निकाल दिल्याने एमपीएससीतील एसईबीसीच्या जागा खुल्या पदांमध्ये रुपांतरीत झाल्या.
काही उमेदवारांनी 2019 च्या परीक्षेच्या आधी देखील एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांना नियुक्तीदेखील मिळाली होती. 2019 च्या निकालानंतर अशा उमेदवारांना तीच पोस्ट किंवा त्या पोस्टपेक्षा खालची पोस्ट मिळण्याची शक्यता होती.
त्यामुळे काही उमेदवारांनी ज्यांना पोस्ट मिळाली आहे अशा उमेदवारांची नावे या 2019 च्या निकालातून वगळण्याची मागणी केली होती. जेणेकरुन इतर उमेदवारांना पोस्ट मिळण्यासाठी मदत होईल.
लोकसेवा आयोगाने ज्यांना 'ऑप्टिंग आऊटचा' पर्याय निवडायचा आहे अशांना प्रस्ताव मागितला होता. ज्या उमेदवारांनी असा प्रस्ताव दिला त्या उमेदवारांची नावे वगळून लिस्टमधील इतर विद्यार्थ्यांना पोस्ट देण्यात आल्या.
महेश पांढरे हे ऑप्टिंग आऊटचा पर्याय आयोगाने सुरु करावा अशी मागणी करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहेत. पांढरे म्हणाले, ''19 जून 2020 ला एमपीएससीचा जो निकाल लागला होता त्यामध्ये आधी ज्यांना पोस्ट मिळाल्या होत्या त्या उमेदवारांनी त्याच पोस्ट पुन्हा घेतल्या होत्या.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्यामुळे इतर उमेदवारांच्या पोस्ट अडून राहत होत्या. त्याचबरोबर सारखीच पोस्ट आधी पास झालेले उमेदवार घेणार नव्हते. त्यामुळे आम्ही 'ऑप्टिंग आऊटचा' पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती.
ज्या उमेदवारांना पोस्ट नको आहे ते उमेदवार स्वतःहून या स्पर्धेतून बाहेर पडतील. यामुळे नवीन उमेदवार जे मेरिट लिस्टमध्ये खाली होते त्यांना याचा फायदा झाला. अशा 20 ते 25 विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. ''
या 2 वर्षाच्या काळात काही उमेदवारांना क्लास वनचे प्रमोशन देखील मिळाले होते. त्यामुळे अशा उमेदवारांनी देखील ऑप्टिंग आऊटचा पर्याय निवडला.
असिस्टंट आरटीओ पदासाठी निवड झालेला सचिन सावडेकर म्हणाला, ''ऑप्टिंग आऊटचा फायदा काही उमेदवारांना झाला. परीक्षा होऊन दोन वर्ष झाले. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना दुसरीकडे नोकरी लागली. त्या नोकऱ्या इथे जी पोस्ट मिळणार होती, त्यापेक्षा चांगल्या होत्या. त्यामुळे असे विद्यार्थी पद घेणार नव्हते. त्यांनी ऑप्टिंग आऊटचा पर्याय स्विकारला.

फोटो स्रोत, Getty Images
ऑप्टिंग आऊट ही चांगली पद्धत आहे. आधी एकच विद्यार्थी दोन ते तीन पोस्ट होल्ड करुन ठेवायचा. त्यात एमपीएससीमध्ये वेटिंग लिस्टचा देखील प्रकार नव्हता. त्यामुळे या वेटिंग लिस्टच्या पर्यायावर देखील आयोग आता विचार करत आहे. जे विद्यार्थी पोस्ट घेणार नाही त्या पोस्टसाठी वेटींग लिस्ट लावली तर इतरांना फायदा होणार आहे.''
यातील काही विद्यार्थी सेवेत होते, त्यांना त्यापेक्षा चांगली पोस्ट मिळणार नव्हती अशांना आयोगाने हा 'ऑप्टिंग आऊटचा' पर्याय दिला. त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये खाली असलेल्या विद्यार्थ्यांना मदत झाली. असं देखील सावडेकर म्हणतो.
2017 मध्ये पर्वणी पाटील यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी पुन्हा परीक्षा देत 2019 च्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
2019 च्या निकालामध्ये पर्वणी पाटील यांनी 'ऑप्टिंग आऊट' केल्याने मानसी पाटील या आता मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























