Endemic: कोरोना विषाणू भारतात 'एंडेमिक' बनत आहे का? एंडेमिक म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कोव्हिड-19नं आता 'एंडेमिक स्टेज' म्हणजे स्थानिक आजाराचं रूप घेतलं असावं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOच्या एका वरिष्ठ संशोधकानं म्हटलं आहे.
डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी मंगळवारी (31 ऑगस्ट) विधान केलं होतं की, भारतात कोव्हिड-19ला 'काही प्रमाणात स्थानिकता' प्राप्त होत असल्याचं दिसत आहे. म्हणजेच हा आजार 'एंडेमिक' बनण्याच्या स्थितीत पोहोचताना दिसत आहे.
पण भारतात खरंच असं होत आहे का? पण एखादा आजार एंडेमिक होणं म्हणजे काय? त्यानं साथीवर कसा परिणाम होऊ शकतो?
एंडेमिक स्टेज म्हणजे काय?
एखादा आजार जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात अस्तित्वात असतो, पण त्याचा प्रभाव नियंत्रित करता येतो, तेव्हा तो आजार एंडेमिक म्हणजे स्थानिक स्वरुपाचा आजार बनला असं म्हणता येतं.
म्हणजेच त्या आजाराच्या विषाणूसोबत आपलं शरीर जुळवून घेतं, आणि आजारासोबत जगण्याची लोकांना सवय होते.
अशा प्रदेशातील अधिकाधिक लोकांमध्ये एकतर लसीकरणामुळे किंवा आधी झालेल्या संसर्गातून निर्माण झालेल्या अँटीबॉडीजमुळे त्या रोगाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असते. त्यामुळे आजाराच्या प्रसाराचा वेग मंदावतो, असं संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. ललित कांत सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
सौम्या स्वामिनाथन यांचं हे विधान अशा वेळेला आलं आहे जेव्हा भारतात दैनंदिन रुग्णसंख्या 400,000 वरून 25,000 वर आली आहे. साथीचा जोर कमी झालेला असल्यानं अनेक निर्बंध उठवले जात आहेत.
पण तरीही तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेचा धोका अजून संपलेला नाही. तसंच भारतासारख्या महाकाय लोकसंख्येच्या देशात विषाणूंच्या नव्या प्रकारांचा धोका पाहता कोव्हिड 19 एंडेमिक स्टेजला कधी पोहोचेल हा प्रश्न कायम आहे.
विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील सांगतात, की "आजार एंडेमिक झाला म्हणजे संसर्ग होत नाही असं नाही. तर तो आजार मोठ्या प्रमाणात वेगानं पसरत नाही."
तिसऱ्या लाटेचा धोका कायम?
कोव्हिड-19 एंडेमिक स्टेजला पोहोचल्याचं भारतातर्फे अधिकृतरित्या कधी जाहीर केलं जातंय, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
वायर न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्वामिनाथन म्हणाल्या आहेत की इतर अनेक देशांप्रमाणे भारतही साथीच्या अशा टप्प्यात पोहोचत आहे जिथे संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही महिन्यांत रुग्णसंख्येत झपाट्यानं होणारी वाढ आणि चढते आलेख यांपेक्षा हे दृष्य वेगळं दिसतंय.

फोटो स्रोत, Getty Images
स्वामिनाथन यांनी सुचवलं आहे, की भारतात स्थानिक पातळीवर आजाराच्या प्रमाणात चढ-उतार दिसत राहतील. पण दुसऱ्या लाटेदरम्यान दिसला तसा कोव्हिडचा विस्फोट, लोकांना झालेला त्रास, हॉस्पिटल बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनची टंचाई दिसण्याची शक्यता कमी आहे असंही त्यांना वाटतं.
त्या पुढे सांगतात की, भारतीय लोकसंख्येतली विषमता पाहता, "स्थानिक स्वरुपात अशा समुदायांमध्ये कोरोन विषाणूचा उद्रेक दिसून येऊ शकतो जिथे पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेदरम्यान फारसा संसर्ग बळावला नव्हता किंवा जिथे लसीकरण कमी प्रमाणात झालं आहे."
पण तिसरी लाट कुठे आणि कधी येईल आणि ती किती घातक असेल याविषयी निश्चित भाकित वर्तवता येणार नाही, तर केवळ अंदाज लावता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
सरकारचं म्हणणं काय आहे?
सरकारनं लोकांना काळजी घेत राहायला सांगितलं आहे.
गेल्या वर्षीच्या मार्चपासून भारतात 3.28 कोटींहून अधिक कोव्हिड रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 4,35,000 हून अधिक जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे, पण तज्ज्ञांच्या मते हा आकडा बराच मोठा असण्याची शक्यता आहे.
सध्या भारतातली रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात घटली आहे, यात शंका नाही.
पण सरकारी तज्ज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की अधिकारी आणि लोकांनी काळजी घेणं सोडलं, तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. एका सरकारी समितीच्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्येच तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या लाटेविषयी अंदाज चुकल्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि म्हणूनच तिसऱ्या लाटेविषयीचा इशारा वारंवार दिला जात असावा.
यंदा मार्चमध्ये सरकारनं जाहीर केलं होतं की भारतानं कोव्हिडविरोधातली लढाई जिंकली आहे, पण काही आठवड्यांतच देशभरात दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला.
विषाणूचं उच्चाटन शक्य आहे का?
कोव्हिड-19 चं भविष्यातलं रूप कसं असेल याविषयी भाकित करता येणं कठीण आहे. पण हा विषाणू इतक्यात निघून जाईल अशी चिन्हं नाहीत, असं शास्त्रज्ञांना वाटतं.
पण हळूहळू संसर्गाचा वेग स्थिर होण्याची शक्यता ते वर्तवतात. म्हणजे आजार नष्ट होणार नाही, पण त्याचं प्रमाण कमी असेल, कमीत कमी लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज पडेल आणि तीव्र संसर्गाच्या घटनांचं प्रमाण कमी होईल.
विषाणूतज्ज्ञ जेकब जॉन सांगतात, "आजाराचा प्रसार होत राहतो आणि लोकांना संसर्ग होत राहतो. पण त्यामुळे सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण व्हावी अशी वेळ येत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
एंडेमिक स्टेजमध्ये या आजाराची तीव्रता साधी सर्दी किंवा मलेरियाएवढी होऊ शकते.
"अधूनमधून लोकांमध्ये त्याचा प्रसार वाढू शकतो, पण त्यामुळे आयुष्यांची उलथापालथ होत नाही."
सौम्या स्वामिनाथन यांनाही असंच वाटतं.
"आपण या विषाणूचं उच्चाटन होईल आशा ठेवू शकत नाही, पण तो एंडेमिक झाला की त्यासोबत आपण जगायला शिकू शकतो"
भारत कोव्हिडची एंडेमिक पातळी कधी गाठेल?
तज्ज्ञांच्या मते आताच काहीही भाकित करणं घाईचं ठरेल.
शाहीद जमील सांगतात की इतर विषाणूंसारखाच कोरोना विषाणूही एंडेमिक होईल. "अधिकाधिक लोकांना संसर्ग होईल किंवा लसीकरण वाढेल तसं संसर्ग होत राहील, पण आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालेलं दिसेल."
"युकेमध्ये हेच दिसून आलं आहे. तिथे 60% पेक्षा जास्त लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आता तिथे गंभीर संसर्ग आणि मृत्यूचं प्रमाण घटलं आहे- संसर्गाचं प्रमाण अजूनही जास्त असलं, तरीही."
पण तज्ज्ञांच्या मते भारतासारख्या मोठ्या देशात जिथे लोकसंख्या एक अब्जाहून जास्त आहे आणि केवळ 15 टक्के प्रौढांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तिथे पुढच्या सहा महिन्यांत किंवा एका वर्षात कोव्हिड एंडेमिक बनेल असं सांगता येणं कठीण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ललित कांत सांगतात, की "आपण एंडेमिक पातळीपर्यंत तोवर पोहोचू शकणार नाही जोवर लोकांना संसर्गाचा धोका कायम आहे, कारण त्यानं आजाराचा उद्रेक होत राहील."
भारतानं विषाणूच्या नव्या प्रकारांवर लक्ष ठेवायला हवं असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे
डेल्टा व्हेरियंटपेक्षा संसर्गजन्य असलेला एखादा स्ट्रेन आला तर तो लसीकरण झालेल्या लोकांमध्येही वेगानं पसरू शकतो असं जमील सांगतात.,
तर ललित कांत यांच्या मते " विषाणूचे नवे प्रकार प्रतिकारशक्तीला चकवा देत राहतील, तोवर त्या विषाणूनं एंडेमिक पातळी गाठली असं म्हणता येणारन नाही."
भारतासाठी हीच चिंतेची बाब आहे, कारण लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही संसर्गाला बळी पडू शकतो.
जेकब जॉन यांच्या मते भारतात कोव्हिड एंडेमिक झाल्याचं आताच म्हणता येणार नाही. पण स्वामिनाथन यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र नक्की घेण्यासारखी असल्याचंही जॉन सांगतात.
"आपण विषाणूसोबत जगायला शिकलं पाहजे, आणि दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आपलं वर्तन बदललं किंवा विषाणूत बदल झाले, तर एंडेमिक आजाराचं एपिडेमिकमध्ये म्हणजे साथीत रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. आपल्याला 2019 चा काळ परत अनुभवता येणार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























