गणपतीः गणेशोत्सवासाठी पुणे आणि ठाण्यातले नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार केली जात आहे.
विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून ऑनलाईन स्लॉट बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुण्यात मंडळांनी गणेश मूर्तीचे मंडपाच्या शेजारी कृत्रिम हौद तयार करुन त्यामध्ये विसर्जन करावे अशा सुचना पुणे पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात नियमावली तयार करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी आचारसंहिता देखील तयार करण्यात आली आहे.
ऑनलाईन स्लॉट बुकींग नेमकं आहे तरी काय ?
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणेश विसर्जनाच्या दिवशी घाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिककेकडून यंदाही ऑनलाईन स्लॉट बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालिकेकडून वेबसाईट तयार करण्यात आली आहे. ज्यात नागरिक गणेश विसर्जनासाठी त्यांना हवा असलेला दिवस आणि स्लॉट बुक करु शकणार आहेत. स्लॉट बुक केल्यामुळे विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळता येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या वर्षी ठाणे महानगरपालिकेकडून गणेश मूर्ती विसर्जनासाठी 33 ठिकाणं उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामध्ये 13 कृत्रिम हौद आणि तलावांचा समावेश आहे तर 20 मूर्ती स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे.
दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी करण्यात येणाऱ्या गणेश विसर्जनासाठी हे स्लॉट खुले करुन देण्यात आले आहेत. 1 सप्टेंबर पासून www.ganeshvisarjan.covidthane.org या वेबसाईटवर नागरिकांना आपल्या घराजवळील ठिकाणाचा स्लॉट बुक करता येणार आहे.
याविषयी बोलताना ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले, ''कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी ही योजना गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद आहे.''
कोकणात जाण्यासाठी काय आहेत नियम?
दरवर्षी मोठ्या संख्येने लोक कोकणात गणेशोत्सवासाठी जात आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणारे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक नसेल. पण डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले नसतील अशा प्रवाशांना मागील 72 तासातील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह अहवाल बंधनकारक आहे.
जे प्रवासी वरील दोन्ही गोष्टी स्वत:जवळ बाळगणार नाहीत त्यांची कोरोना चाचणी जिल्ह्याच्या प्रवेश थांबाजवळ केली जाईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या वेबसाईटवरुन नागरिकांना लशीचे प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. प्रवाशांनी हे प्रमाणपत्र स्वत:जवळ बाळगाव असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी करता यावी यासाठी रेल्वेस स्थानक आणि रस्ते मार्गावर आरोग्य पथक नेमण्यात येणार आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवासाठी आचारसंहिता नेमकी काय आहे ?
पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळं, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुणे शहरातील गणेशोत्सव साध्या स्वरुपात साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले.
गणेशोत्सव कशापद्धतीने साजरा करायचा यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
पुणे पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातील नियम पुढीलप्रमाणे आहेत.
- यावर्षी गणेश मूर्तींची खरेदी मंडळांनी तसेच नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन पद्धतीने करावी.
- पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर गणेश मुर्ती विक्रीकरीता परवानगी दिली जाणार आहे. मूर्ती विक्री स्टॉल रस्ता, पदपथांवर टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- श्रींची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
- ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंदिरे आहेत त्यांनी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अनन्य साधारण परिस्थितीत पालिकेचे नियम व अटींचे पालन करुन मंडळास छोट्या मंडपासाठी परवानगी दिली जाईल.
- राज्य सरकारच्या सुचनांप्रमाणे सार्वजनिक मंडळांकरीता गणेशाच्या मुर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मर्यादा असणार आहे.
- आरती व पुजेसाठी जास्तीत जास्त पाच व्यक्तीच हजर राहू शकतील. मुर्ती ठिकाणी गर्दी होईनल असे उपक्रम टाळावेत.
- दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क व फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याबाबत मंडळांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
- गणेश मंडळांनी दर्शनाकरीता ऑनलाईन टोकन, डिजिटल पास सुविधा वेळेची मर्यादा ठेवावी. सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपींना दर्शनाला निमंत्रित करण्यात येऊ नये.
- गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. उत्सवाच्या कालावधीत त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता, आरोग्य सेतू अॅप याबाबतची नोंद स्वतंत्र वहीत ठेवणे बंधनकारक आहे.
- सार्वजनिक घाट, नदी, नाल्यावर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई आहे. त्याकरीत पर्यायी सुविधा पालिकेकडून तयार करण्यात आली आहे.
- गणेश मूर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाच्या शेजारी कृत्रिम हौदाची निर्मिती करुन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे.
- अन्नदान, महाप्रसाद या कार्यक्रमांना पूर्णतः बंदी आहे.
- घरगुती गणपती आणि गौरीचे विसर्जन नागरिकांनी घरीच करावे.
- फिरते हौद व मूर्ती दान संकल्पना मनपाकडून राबविण्यात येणार आहे.
- अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत सोसायटीमध्ये बनवलेल्या कृत्रिम हौदात घरगुती गणपती आणि गौरीचे विसर्जन नागरिकांनी करावे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























