नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुढील दोन दिवस प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुढील दोन दिवस प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पुढील घटनाक्रम पाहता राज्यातील वातावरण अद्याप तापलेलंच आहे.
नारायण राणे यांना याप्रकरणी अटक होऊन जामीन मिळाल्यानंतर ते सध्या विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
या परिस्थितीत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण भारतीय जनता पक्षाने ही यात्रा न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील दोन दिवस कोकणमधील जनआशीर्वाद यात्रा ही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होईल, असं भाजपने जाहीर केलं आहे.
दोन दिवसांनी म्हणजेच 27 ऑगस्टनंतर कदाचित नारायण राणे पुन्हा यात्रेची सूत्रे आपल्या हाती घेतील, असं पक्षाने कळवलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
2. बैलगाडी शर्यत प्रकरणी महिनाभरात तोडगा काढणार
"राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते.
बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. यासाठी बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार आहे," अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मंत्रालयात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत सुनील केदार बोलत होते.
संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार आहे, असं केदार म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. 70 वर्षात उभारलेली संपत्ती विकली जातेय- राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपल्या 'मित्रांना' मदत करत आहेत. कोरोना संकटातही सरकारने लोकांना मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेसंदर्भात (NMP) बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

फोटो स्रोत, Ani
केंद्र सरकारने देशातील सर्वकाही विकलं. तरुणांच्या हातातून रोजगार हिसकावले. रस्ते मार्ग, रेल्वे, वीज क्षेत्र, पेट्रोलियम पाईपलाइन, दूरसंचार, गोदाम, खाणकाम, विमानतळ, पोर्ट, स्टेडियम हे सर्व कुणाकडे जात आहे, असा सवाल गांधी यांनी विचारला.
हे सर्व उभारण्यासाठी 70 वर्षे लागली होती. मात्र, आता हे तीन किंवा चार लोकांच्या हातात दिलं जात आहे, तुमचं भविष्य विकलं जात आहे. तीन-चार लोकांना भेट म्हणून ही देशाची संपत्ती दिली जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
4. राणे विरुद्ध शिवसेना वाद प्रकरणी मनसेची टोमणेबाजी
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या वादाने आक्रमक स्वरुप धारण केलं आहे. या प्रकरणावरून वाद-प्रतिवाद होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यामध्ये उडी घेत दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे.
मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ट्वीट करत जंगी 'सामना' तंगी 'प्रहार' असं म्हणत या प्रकरणी प्रतिक्रिया दिली.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
राणे विरुद्ध शिवसेना हा वाद म्हणजे चिखलफेक विरुद्ध दगडफेक असल्याचं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं.
तसंच या संपूर्ण वादाचा प्रेक्षक हा लॉकडाऊनमध्ये भरडला गेलेला सामान्य माणूस असल्याचंही राजू पाटील म्हणाले. ही बातमी ई-टीव्ही भारतने दिली.
5. येत्या काळात मुख्यमंत्री आमचाच - काँग्रेस
महाराष्ट्र राज्य हे काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे पक्षातर्फे संघटना बांधणीचं काम सुरू आहे. राज्यात आगामी काळात काँग्रेस पक्षच क्रमांक एकचा पक्ष असेल.
त्यामुळे येत्या काळात काँग्रेसचाच मुख्यमंत्री बनेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

फोटो स्रोत, facebook
काँग्रेसतर्फे आयोजित व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.
देशाचा विकासदर आणि जीडीपी बिघडत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.
तिरंगा ध्वजाचा अपमान होतो. हा देशद्रोहच आहे, अशी टीका पटोले यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























