राज ठाकरे म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाला' #5मोठ्याबातम्या

शरद पवार, राज ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, जातीयवाद

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाला - राज ठाकरे

"जातीचा मुद्दा त्या त्या जातीतील नेत्यांना मोठं करण्यासाठी पुढे केला जातो. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

"महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला हे डाग लावणारं आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असला पाहिजे. पण त्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा वाढला," असं राज ठाकरे यांनी यांनी म्हटलं.

2. वरळी-वांद्रे सी लिंक दिल्ली-मुंबई हायवेला जोडणार - नितीन गडकरी

मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न असून त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Twitter/@nitin_gadkari

"मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, 55 उड्डाणपूल अशी अनेक काम केलं. त्या काळात बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

3. मुंबई, रायगडमध्ये डेल्टा प्लसमुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत 11 डेल्टा प्लसचे रुग्ण होते, त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे डेल्टाचा पहिला बळी गेला आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

याविषयी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, 55 वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रुग्ण फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

डेल्टा प्लस

फोटो स्रोत, GETTY IMAGES / EUGENE MYMRIN

या महिलेची 21 जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. 24 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

मात्र पालिकेकडे बुधवारी, 11 ऑगस्ट रोजी ती महिला रुग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोविड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा कोविड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह 00.10 असल्याचे निदान करण्यात आले आहे.

नागोठणे इथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाचा मृत्यू डेल्टा व्हायरसने झाल्याचं समोर आलं आहे.

4. जातनिहाय गणना सध्या नाहीच - केंद्र सरकार

इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना अधिकार देणारे 127वं घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झालं.

बुधवारी (11 ऑगस्ट) सहा तासांच्या चर्चेनंतर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 187 मतं पडली. आता विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, तूर्त जातीय जनगणनेचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

शिवाय, 2011च्या जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली जाणार नाही.

5. पार्किंगची जागा असेल तरच नवीन वाहन खरेदी करायला परवानगी द्या - हायकोर्ट

मुंबई आणि आसपासच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. पार्किंगची जागा असेल तरच नवं वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी, असं मत व्यक्त करत, लोकांना परवडंतय म्हणून एका कुटुंबाला 4 ते 5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? असा प्रश्न गुरूवारी मुंबई हायकोर्टाने विचारला. ही बातमी सकाळने दिली आहे.

पार्किंगसाठी जागा नसल्याने लोकं रस्ते आणि फुटपाथासारख्या सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करतात ज्याचा फटका ट्रॅफिकला बसतो. वारंवार तक्रार आणि निर्देश देऊनही नवी मुंबई महापालिकेनं यावर काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी या विषयावर हायकोर्टात याचिका दाखल केली.

नवी मुंबईतील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. यावर उपाय म्हणून आधी पार्किंगची योग्य व्यवस्था करा, असं याआधीच हायकोर्टाने म्हटलं आहे. बांधकामांना परवानगी देताना बिल्डरांना प्रत्येक फ्लॅटमागे किमान एक पार्किंग देण बंधनकारक करा, अन्यथा त्यांना बांधकामाची परवानगी देऊ नका असंही हायकोर्टानं बजावलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)