पी. व्ही. सिंधू : 'हे कांस्य पदक मिळवताना खूप दबाव होता'

फोटो स्रोत, Reuters
- Author, अरविंद छाब्रा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, टोकियोहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पण, रियो ऑलम्पिकमधल्या रजत पदकाशी तुलना केल्यास हे कांस्य पदक अधिक दबाव आणि जबाबदारीनंतर आलं आहे, असं सिंधूचं म्हणणं आहे.
दोन्ही पदकांची तुलना केल्यास तू त्याच्याकडे कसं बघतेस, असं बीबीसीनं विचारल्यावर सिंधूनं म्हटलं, "रिओ ऑलिम्पिकच्या वेळी मी खूप तरुण होते आणि लोकांना माझ्याकडून जास्त अपेक्षा नव्हत्या. मी तेव्हा एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे होते आणि मला वाटतं तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता.
"या पदकांची तुलना करायची म्हटलं तर यावेळेस मोठी जबाबदारी होती. खूप चढ-उतार आले. मी चांगलं खेळले होते. मी माझ्या खेळाला अधिक चांगलं बनवलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं, ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे."
तिनं म्हटलं, "2016 आणि 2021 मध्ये सलग पदक मिळाल्यामुळे मला खूप आनंद झालाय. मी यासाठी खूप मेहनत केली आहे आणि जेव्हा तुम्ही खूप मेहनत करता, तेव्हा तुम्हाला पदक मिळतं."
रँकिंग
पी. व्ही. सिंधून सरळ सेटमध्ये बिंग जिआओचा पराभव करत ऑलिम्पिकच्या महिला एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. सिंधूनं हा सामना 21-13, 21-15 अशा फरकानं जिंकला.
सलग पदकं मिळवल्यानंतरचा अनुभव
ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं पटकावणारी पहिली भारतीय महिला बनल्याविषयी काय वाटतं, असं सिंधूला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, "काही वेळासाठी अशा कोणत्याही भावनेनं माझ्यावर परिणाम केलेला नव्हता. पण, सामना संपल्यानंतर नेमकं काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं. मी फक्त उभी होते आणि 5 ते 6 सेकंदांनतर मी आनंदाने ओरडले. त्यानंतर मी माझ्या प्रशिक्षकाला मिठी मारली."

फोटो स्रोत, Reuters
सिंधूनं तिचे प्रशिक्षक पार्क ताई-सेंग यांच्या भूमकेविषयी पत्रकारांना सांगितलं, "ते खूपच आनंदी आहेत. त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते संपूर्ण वेळ माझ्याबरोबर राहिले म्हणून मी त्यांची आभारी आहे. इतकंच काय तर लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे ते त्यांच्या घरीही जाऊ शकत नव्हते.
"त्यांना कुटुंबीयांची आठवण येत असेल. आपण नक्कीच जिंकू, असं ते दररोज म्हणायचे आणि ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीय करायला सांगायचे. शेवटी आम्ही हे सिद्ध केलं. याचं श्रेय पार्क यांनाही जातं."
सेमी फायनलमधील पराभव कसा पचवला?
सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर खूप दु:खी होते आणि यातून बाहेर येणं सोपं नव्हतं, असं सिंधू सांगते.
ती सांगते, "मी सकाळी लवकरच उठले होते. त्याच्या आदल्या दिवशी मी खूप नाराज होते. पण आपल्याकडे अजून एक संधी आहे आणि कांस्य पदक आणि चौथ्या क्रमांकात मोठं अंतर असतं, असं मला माझ्या प्रशिक्षकांनी सांगितलं. माझे नातेवाईकही नाराज होते, पण ते मला प्रोत्साहन देत होते."

फोटो स्रोत, Reuters
मी संपूर्ण दिवस सामना सुरू होण्याची वाट पाहत होते, कारण डोक्यात तेच सुरू होतं, असं सिंधू सांगते.
या सामन्यासाठी काही वेगळी रणनिती आखली होती का, असं विचारल्यावर ती सांगते, नाही काही विशेष अशी रणनिती आखली नव्हती.
टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?
सिंधू पुढे सांगते, "बिंग जिआओ खूप भारी खेळाडू आहे. ती खेळत असताना पुढच्याला अडचणीत आणते. शिवाय ती डाव्या हातानं खेळते. त्यामुळे रॅलीमध्ये राहणं माझ्यासाठी गरजेचं होतं, जेणेकरून मी काही चूक करता कामा नये. ती माझ्या प्रत्येक आक्रमक शॉटला परतावून लावत होती, त्यामुळे मग शांत राहून पुढचा शॉट खेळणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, जेणेकरुन मी सामन्यात टिकून राहिन.
पहिल्या गेममध्ये मी लीड घेतली आणि मग तिनं कव्हर करायला सुरुवात केली. मला वाटतं की, या सामन्यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता."

फोटो स्रोत, EPA
विजय साजरा करण्याविषयी तिनं म्हटलं, नक्कीच विजय साजरा करणार आहे. मी सध्या त्याच क्षणात जगात आहे आणि जितका शक्य तितका आनंद घेत आहे.
सामना संपल्यानंतर सिंधू कुणाशी बोलली, असं विचारल्यावर ती सांगते, "मी माझ्या भावंडांसोबत बोलले. ते खूप खुश होते. मीही त्यांना खूप मिस केलं. मी भारतात परतल्यानंतर त्यांच्यासोबत हे आनंदाचे क्षण घालवू इच्छित आहे. मी माझ्यासाठी प्रार्थना करणारे सामान्य माणसं, मित्र-मंडळी आणि कुटुंबातील सदस्यांनाही खूप मिस केलं."
कोरोना काळात पदक जिंकणं किती कठीण?
या प्रश्नावर सिंधू म्हणाली, "कोरोना साथीच्या काळात पदक जिंकणं कठीण काम नव्हतं. कारण जेव्हा तुम्ही सामना खेळायला जाता तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसता. तेव्हा तुम्ही केवळ सामन्यावर लक्ष केंद्रित करता आणि तुमचं सर्वोत्तम देत असता."

फोटो स्रोत, EPA
"कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन होतं आणि ट्रेनिंग करू शकत नव्हतो. मी माझ्या घरीच ट्रेनिंग करत होते. माझे वडील माझ्याकडून सराव करून घेत होते. पण, लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही ट्रेनिंग सुरू केली. सरकारनेही आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिला," असंही सिंधू सांगते.
आता सिंधूची पुढची योजना काय आहे, ती आता पदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठीची तयारी करणार का, असं विचारल्यावर ती सांगते, "मी सध्या हेच क्षण जगत आहे आणि थोडा वेळ मला हेच जगू द्या. हा खूप चांगला प्रश्न आहे, मी लवकरच यासाठी तयारी सुरू करेल. पण आता लगेच नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























