मुंबईत लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे यांच्याकडून अपघाताची पाहणी #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Artur Borzecki Photography/getty images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटमध्ये प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. मुंबईत लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे यांच्याकडून अपघाताची पाहणी
मुंबईच्या वरळी भागात एका इमारतीतील लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वरळीतील हनुमान गल्लीतील ललित अंबिका या इमारतीत ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
या इमारतीत कार पार्किंगसाठी वापरण्यात येणाऱ्या लिफ्ट शाफ्टमध्ये हा अपघात झाला. त्याठिकाणी काही काम सुरू होतं. पण त्याच दरम्यान अचानक नवव्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचावपथक याठिकाणी दाखल झालं.
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली तसंच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. निसर्ग आणि भोंगळ कारभाराचे फटके गेल्या काही वर्षांत जास्तच बसू लागले - उदयनराजे
"सरकारने मारले आणि आभाळ फाटले, तर दाद कुठे मागायची, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या दीड वर्षांत कोरोनाने जनता त्रासून गेली आहे.
"निसर्ग आणि भोंगळ कारभार यांचा फटका गेल्या काही वर्षांत जास्तच बसू लागला आहे," असं मत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना उदयनराजे ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं.
ते म्हणाले, सद्यस्थितीत आपण आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊन पूरग्रस्त भागातील मदतकार्यात सहभाग घ्यायला हवा.
मदतकार्य करत असताना जनतेला कमीत-कमी त्रास होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त मी दिल्लीत असलो, तरी माझं लक्ष कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर आहे. या भागातील पूरस्थितीची माहिती केंद्र सरकारला दिली असून त्यांच्याकडून मदत मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे.
ही बातमी लोकमतने दिली आहे.
3. अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ, भारताने प्राधान्यक्रम ठरवावा - मनमोहन सिंग
गेल्या तीन दशकात आपल्या देशाने जबरदस्त आर्थिक प्रगती केली, पण कोव्हिडमुळे आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्रे मागे पडली आहेत.
ही आनंदी आणि मग्न होण्याची वेळ नाही तर आत्मनिरीक्षण आणि चिंतन करण्याची वेळ आहे. 1991 च्या संकटाच्या तुलनेत आताचा पुढचा रस्ता अधिक आव्हानात्मक आहे.
त्यामुळे एक देश म्हणून आपल्याला आपला प्राधान्यक्रम पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी केलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/SEAN GALLUP
24 जुलै 1991 रोजी मनमोहन सिंग पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी त्यावेळी मांडलेला अर्थसंकल्प हा देशातील आर्थिक उदारीकरणाचा पाया मानला जातो. या अर्थसंकल्पाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केलं आहे.
1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाची सुरुवात आपल्या देशाला व्यापलेल्या आर्थिक संकटामुळेच झाली होती. हे संकट व्यवस्थापनापुरते मर्यादित नव्हते.
समृद्धीची इच्छा, स्वतःच्या क्षमतेवरील आत्मविश्वास आणि अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण सोडण्यामुळेच भारताच्या आर्थिक सुधारणेचा पाया रचला गेला, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं.
ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. तळीये गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडा घेणार - जितेंद्र आव्हाड
रायगडमध्ये तळीये गावात दरड कोसळून कित्येक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. येथील अनेक घरं दरडीखाली गाडली गेल्याने हे गाव उद्ध्वस्त झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या विषयी माहिती देताना ट्विट करत आव्हाड म्हणाले, "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे.
"मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती," असं आव्हाड म्हणाले.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
5. उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये
कोकणातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी (25 जुलै) चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही कोकण दौरा याच दिवशी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूण परिसरात पाहणी करताना दिसतील.
मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी 11.30 वाजता चिपळूणमध्ये दाखल होती. तिथं चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील. त्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.
तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने तळई गावची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. दुपारी 12 वाजता रायगडवरुन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नुकसानाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता ते खेडवरुन चिपळूणला पोहोचतील आणि पुढे रत्नागिरीकडे रवाना होतील. यावेळी राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही असणार आहेत.
ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























