कोरोना : कोल्हापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी का होत नाहीये?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी कोल्हापूर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात सुरू असलेले सर्व निर्बंध कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू आहेत तरी देखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. यामागे नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊया.
राज्यात मार्च ते एप्रिल दरम्यान कोरोना रुग्णसंख्या झापाट्याने वाढत असताना कोल्हापूरमध्ये मात्र 200 ते 300 इतकी रुग्णसंख्या होती. त्यानंतर मात्र ही रुग्णसंख्या दररोज दीड ते 2 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली.
सध्या राज्यात काही जिल्हे सोडले तर रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात ही स्थिती नियंत्रणात नसल्याचं चित्र आहे. यामागे चाचण्या वाढल्याचं मुख्य कारण आहे.
जिल्ह्यात चाचणी करण्याचं प्रमाण वाढल्याने सुपर स्प्रेडर सापडण्याचं प्रमाण वाढलं, परिणामी रुग्ण संख्या वाढली. महापालिकेकडून संजीवन अभियान राबवले गेले त्याचाही कोरोना रुग्ण शोधण्यात फायदा झाला, असं दैनिक सकाळचे निवास चौगले सांगतात.
कोरोना संसर्ग वाढतोय कारण....
"13 मे रोजी राज्याच्या टास्क फोर्सने कोल्हापूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी काही उपाय सुचवले होते. त्यानुसार रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेममेन्ट झोन करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, मास्क सॅनिटायझर यांचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, रस्त्यावरील अनावश्यक गर्दी टाळणे हे करणं गरजेचं होतं पण या गोष्टींचं पालन होताना दिसत नाही," असं चौगले सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर व्यापार, दुकानं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी यासाठी वेळेचे बंधन आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात अनेक लोक एकाच वेळी रस्त्यावर पाहायला मिळतात.
या दरम्यान बाहेर आलेल्या बाधित व्यक्तीमुळे घरात असलेल्यांनाही या आजाराची लागण होते. त्यामुळे कॉन्टक्ट ट्रेसिंग गरजेचं आहे.

फोटो स्रोत, @KOLHAPUR_POLICE
तर प्रशासकीय पातळीवर धरसोडपणा, राजकीय पातळीवर निर्णयांना विलंब यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर झाल्याचं दैनिक लोकमतचे समीर देशपांडे यांना वाटतं.
ते सांगतात, "10 एप्रिल रोजी जिल्हाबंदीचा दिलेला आदेश 24 तासांच्या आत मागे घेण्यात आला. गेल्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका झाल्या, राजकीय मेळावे कार्यक्रम बैठका सुरू होत्या तर दुसरीकडे नागरिकांवर बंधनं घालण्यात आली होती.
"याचा उलट परिणाम असा झाला की नागरिकांमध्ये बेफिकीरिचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे आरोग्य विभागाने सांगितलेली मार्गदर्शक तत्व पाळली गेली नाही," असं देशपांडे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रामीण भागात आजारी व्यक्तींवर घरीच उपचार केले जात आहेत. त्यामागे खाजगी रुग्णालयात होत असलेली अव्वाच्या सव्वा बिल आकारणी हेही महत्वाचं कारण आहे. अशा वेळी रुग्णांची तब्येत अधिक खालावते.
अत्यवस्थ रुग्णाला शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे उपचार करणे कठीण जाते त्याचा परिणाम असा होतो की, अशा रुग्णांना प्राणाला मुकावं लागतं आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी प्रयत्न झाले. मात्र गेल्या काही दिवसांत लस पुरवठा उपलब्ध नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे.
"गेले काही महिने जिल्ह्यात कडक निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे व्यापार बंद असल्याने अनेक छोटे-मोठे व्यापारी नियम शिथिल करण्याची जोरदार मागणी करत आहेत. नागरिकांमधून याला पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यामुळे एकीकडे कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि दुसरीकडे लॉकडाऊनला विरोध करणारा वर्ग यात प्रशासनाची कोंडी झाली आहे," असं देशपांडे यांना वाटतं.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्यानं येत्या सोमवार पासून शहरातील सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देऊ, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टास्क फोर्सच्या सुचनेनुसार चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. मुंबईनंतर सर्वाधिक चाचण्या या कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येत आहेत. त्यामुळे दरदिवशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे अलाक्षणिक बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत.
त्यामुळे या नागरिकांमुळे होणारा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश येत असल्याचं चित्र आहे. येत्या काही महिन्यात ही साथ आटोक्यात येण्यासाठी हे चित्र आशादायी असल्याचं जाणकारांना वाटतं.
'लसीकरण वेगानं करा'
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नसल्याने केंद्रीय समितीने कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत केंद्रीय पथकाची बैठक झाली. या बैठकीत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय करयाला हवे याबाबत चर्चा झाली.
या बैठकीनंतर राज्य साथरोग समितीचे नियंत्रक डॉ. प्रदीप आवटे यांनी कोल्हापूरमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही असं सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साथ उशिराने सुरू झाली. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होण्यासाठीचा कालावधी इतरांपेक्षा उशिराने सुरू आहे."

फोटो स्रोत, Getty Images
नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्यात 60 वर्षांच्या वर असलेल्या 78 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाले ही चांगली बाब आहे. गेल्या 4 आठवड्याची तुलना केली, तर पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आल्याचं आवटे यांनी सांगितलं. तर म़ृत्यू प्रमाणात घट झाल्याचं चित्र आहे.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत का? असं विचारलं असता डॉ. आवटे यांनी सांगितलं की, लसीकरण वेगाने करणे, पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचं आहे.
जिल्हा पातळीवर प्रशासनाने प्रयत्न केले असले तरी आणखी प्रयत्न सूरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
लशींचा पुरवठा वाढवण्याची मागणी करण्यात आली असून येत्या काळात त्याचा चांगला परिणाम दिसून येईल, असंही आवटे यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























