नाना पटोले : अमित शाह यांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ED त्यांची चौकशी करणार नाही

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. अमित शाहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ED त्यांची चौकशी करणार नाही - नाना पटोले
"ईडी, सीबीआय चौकशीची भिती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे.
निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय चौकशी लावली जाते. गृहमंत्री अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही", अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने गेल्या आठवड्यात छापे टाकले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
आरोप तर सगळ्यांवरच होतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंतप्रधान सहायता निधीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
पण ईडी आणि सीबीआय या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याशिवाय, राज्यपालांच्या अधिकारांचा दुरुपयोग करून भाजपा ज्या पद्धतीने अशांतता माजवत आहे, हे सगळे लोक बघत आहेत. हे लोकशाहीला धरून नाही, असंही पटोले म्हणाले. भाजपकडून याबाबत अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. डॉक्टरांनी योगाचा अभ्यास करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
"जेव्हा डॉक्टर योगाचा अभ्यास करतात, तेव्हा संपूर्ण जग त्याला गांभीर्यानं घेतं. त्यामुळे IMA च्या माध्यमातून योगाभ्यास एका मिशन मोडमध्ये पुढे जाऊ शकतं. आपला योगावरील अभ्यास आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केला जाऊ शकतो. योगाचा प्रचार करण्यासाठचा तो एक प्रयत्न असू शकेल", असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Pib
IMA तर्फे डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोव्हिड-19 संकटाच्या काळात अथक सेवा बजावल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.
काही दिवसांपूर्वी योग गुरू बाबा रामदेव आणि IMA यांच्यात उपचार पद्धतीवरून खडाजंगी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी IMA ला योगाभ्यास करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता मोदी यांच्या बोलण्याचं नेमकं कारण काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही बातमी आजतकने दिली.
3. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती करणार 6 किल्ल्यांचं संवर्धन
राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा तसेच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराची जैवविविधता जतन करणे, वनीकरण करणे या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, facebook
या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा किल्ला या सहा गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती अग्रक्रम ठरवेल. निवड करण्यात आलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे कामकाज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध सुविधा उपलब्ध करणे व परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. जैवविविधता जपत गडकिल्ले परिसराचे हरितीकरण करण्याची जबाबदारी वन विभागाला देण्यात आली आहे. शिवाय, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या परिसरात रस्ते बांधण्यात येतील. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. 'सरकारमध्ये कुणीच ऐकत नाहीत,' घटक पक्ष नाराज
राज्यात भाजपचं सरकार नको, म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. परंतु, या सरकारमध्ये आमचं कुणीच ऐकत नाही. फोन उचलत नाही. फक्त आमची गरज असेल तेव्हाच आम्हाला बोलवू नका, अशा शब्दांत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Getty Images
राज्य शासनाने बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. एक-दोन दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा, अशी सूचना आम्ही सरकारला केली आहे, असं आझमी म्हणाले.
आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असेल तरच आमची आठवण काढणार का? पुरोगामी विचारांना बांधील असल्यामुळेच आम्ही सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या, अशी विनंती आझमी यांनी केली आहे. ही बातमी लोकमतने दिली.
5. नीरव मोदींच्या बहिणीने भारत सरकारला पाठवले 17 कोटी रुपये
PNB घोटाळ्यात केंद्र सरकारची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या नीरव मोदींच्या बहिणीने भारत सरकारला 17 कोटी पाठवले आहेत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिली आहे.
चौकशीत सहकार्य केलं तर क्रिमिनल कारवाई होणार नाही, असं भारत सरकारने नीरव मोदींना म्हटलं होतं.
दरम्यान, 24 जून रोजी त्यांच्या लंडनमधील खात्याची माहिती ED ला मिळाली. पण ते पैसे आपले नसल्याचं सांगत कबूल केल्याप्रमाणे नीरव मोदींनी त्या खात्यातील 23 लाख 16 हजार 889 डॉलर (17.25 कोटी रुपये) भारत सरकारच्या खात्यात पाठवले आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























