शरद पवारांच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'येणार तर मोदीच' #5मोठ्या बातम्या

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, शरद पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.'कुणी कितीही मोट बांधली तरी येणार तर मोदीच'

"कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कितीही मोट बांधली तरी लोकांच्या मनात मोदीच आहेत. 2024 मध्येही मोदीच येणार आहेत.

2019 मध्येही असाच मोट बांधण्याचा प्रयत्न झाला होता. आता पेक्षा जास्त पक्ष एकत्रं आले होते. पश्चिम बंगालमध्ये या नेत्यांनी हातात हात घालून फोटोही काढले होते. त्याचा काहीही परिणाम झाला नाही," असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीवर टीका केली. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

"जनता सरकारवर नाराज आहे. ही तीन पक्षांची नौटंकी आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर काँग्रेसने तलवारी उपसल्या होत्या. त्याचा जीआरही निघाला, सर्व काही झालं. काँग्रेसने तलवारी म्यान केल्या असून, गप्प बसले आहेत. केवळ दाखवण्यासाठी काँग्रेस भांडत असते. सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच आघाडीतील नेते भांडणाचा दिखावा करून दिशाभूल करत आहेत," असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "हे सरकार आपल्याच ओझ्यानं पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. देशाच्या 70-72 वर्षांच्या इतिहासात असली सरकारे चालताना दिसली नाही. पण आम्ही सरकार पाडणार नाही. जोपर्यंत विरोधी पक्षात आहोत, तोपर्यंत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू".

2. लसीकरण कॅम्पवर विश्वास कसा ठेवायचा?-उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

कांदिवली बोगस लसीकरण घोटाळा प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. लसीकरण कॅम्पवर भरवसा कसा ठेवायचा? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुंबईत कांदिवली परिसरात बोगस लसीकरणाचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

कोरोना, लस, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लसीकरण

"लसीकरण कँपवर लोकांनी कसा भरवसा ठेवायचा? कोरोना काळात हा थेट लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. जर अशा बोगस लसीकरणात लोकांना लसीऐवजी केवळ पाणी टोचण्यात आले असेल तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार?

"लसीऐवजी पाणी टोचलेल्या नागरिकांना फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. कोरोनाच्या कठीण काळात लसींबाबत इतकी खालची पातळी गाठणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यांखालील अत्यंत कठोर कलमे लावून धडा शिकवायला हवा," अशा शब्दात खंडपीठाने निरीक्षण नोंदवलं.

खासगी लसीकरणांवर राज्य आणि पालिका प्रशासनाने नियंत्रण असणे आवश्यक आहे असेही खंडपीठाने नमूद केले. त्यासाठी ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

"हाऊसिंग सोसायटींमध्ये खासगी लसीकरण होत असल्यास त्याची माहिती पालिका प्रशासनाला देणे बंधनकारक करा, वॉर्डनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना तेथे जाऊन अधिकृत लसीकरण सुरू आहे की नाही त्याची तपासणी करण्यास सांगा जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत," अशा शब्दात हायकोर्टानं पालिका प्रशासनाला सुनावले.

3. हा तर ओबीसींवर अन्याय- पंकजा मुंडे

"राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे," असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.

पंकजा मुंडे, ओबीसी आरक्षण

फोटो स्रोत, TWITTER@PANKAJAMUNDE

फोटो कॅप्शन, पंकजा मुंडे

राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने येथे आचार संहितेसोबत निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली.

यात राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या 70 जागांबरोबर 33 पंचायत समितीच्या 130 निर्वाचक गणांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गासह पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे.

4. मोदींच्या आभाराचे बोर्ड लावा; युजीसीचे शिक्षणसंस्थांना आदेश

देशभरात 18 आणि त्यापेक्षा वर्षे वयोगटातील तरुण आणि नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्याची विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्था यांच्या कॅम्पसमध्ये बॅनर लावले जावेत, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी दिले आहेत.

या सूचनांची नीट अंमलबजावणी व्हावी, आणि त्यासाठी जैन यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, युजीसी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

या परिपत्रकात युजीसीने देशातील सर्वच केंद्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठे, खाजगी शिक्षण संस्था, स्वायत्त संस्था, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यूजीसीच्या या सूचनांवर राज्यातील विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

5. शिर्डी साई संस्थान राष्ट्रवादीकडे तर पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात

शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)