शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना भवनासमोरच राडा

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात तुफान राडा झाल्याचा प्रकार बुधवारी (16 जून) घडला.
राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती.
त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. दरम्यान शिवसेना कार्यकर्तेही त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं दिसून आलं.
आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटनाही यादरम्यान दिसून आली.
विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर परिसरातील शिवसेना भवनासमोरच हा सगळा प्रकार घडल्याने त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
यानंतर शिवसेना भवनासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत असून परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचं सांगितलं जातं.
काय आहे प्रकरण?
सामनामध्ये छापून आलेल्या एका लेखाचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी शिवसेना भवनासमोर निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी सुरू केली.
हे निदर्शनास येताच शिवसेनेचे कार्यकर्तेही त्याठिकाणी जमा होऊ लागले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
यादरम्यान दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण चिघळत चालल्याचं लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पोलिसांकडून शिवसेना भवनात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.
संपूर्ण परिसरात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं दिसून येतं.
शिवसेनेकडून धाकदपटशा - प्रवीण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. भाजप कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत होते. पण ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अशा प्रकारची धाकदपटशा शिवसेनेने केली, असा आरोप दरेकर यांनी केला.
भाजप कार्यकर्ते चाल करून गेले, हे चित्र उभं केलं जात आहे. ते चुकीचं आहे.

फोटो स्रोत, Ani
राम मंदिरासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी एकत्र येत असताना त्यांच्यावर शिवसेनेने हल्ला केला, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
"भाजप शांततापूर्ण आंदोलन करत होते. हल्ला करण्याच्या प्रवृत्तीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पोलिसांकडे याचे फुटेज आहेत, कुणाच्या हातात दगड होते, कुणी हल्ला केला, याचा निष्पक्ष तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तपासातून सर्वच गोष्टी बाहेर येतील," असं दरेकर म्हणाले.
अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच - सचिन अहिर
शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपनेच सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचं प्रत्युत्तर हे अॅक्शनला रिअॅक्शन स्वरुपातील होतं, असं स्पष्टीकरण अहिर यांनी दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्याची गरज नव्हती. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, असा निरोप कार्यकर्त्यांना मिळाला होता. त्यामुळेच त्यांनी भाजप कार्यकत्यांना विरोध केला," असं अहिर म्हणाले.
"आम्ही कुठेही वाद केला नाही. ते आल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांचा प्रतिकार केला," असं कार्यकर्ते म्हणत आहेत.
पक्ष कार्यालयात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विरोध होणं स्वाभाविक आहे, असंही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.
शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान - राहुल शेवाळे
आमच्या या श्रद्धास्थाकडे वाकडी नजर कोणीही शिवसैनिक खपवून घेणार नाही. मुळात राममंदिर हा केवळ भाजपाचा विषय नसून देशभरातील जनतेच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे.
राममंदिर जमीन खरेदी प्रकरणात काही गैरव्यवहार झालाच असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. याविषयी माननीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अहवाल मागविला आहे.
हा अहवाल जनतेसमोर येण्याआधीच भाजपने सुरू केलेली आंदोलनं म्हणजे त्यांनी खुद्द गृहमंत्र्यावर दाखविलेला अविश्वास आहे, असं शेवाळे म्हणाले.
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचा ठिय्या
राडा प्रकरणानंतर शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी माहिम पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनापासून काही अंतरावर आंदोलन करत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवसेनेची ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याचं दिसून येतं.
शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असूनही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते करतात, असा आरोप भाजपने केला आहे.
रामाचं नाव बदनाम करू नका - आशिष शेलार
राम मंदिर बांधकामामुळे शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे, त्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पद्धतीने होत आहे. त्यामुळे शिवेसनेनं रामाचं नाव बदनाम करू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.
भाजप कार्यकर्ते पोलिसांना सूचना देऊन आंदोलन करत होते. पण शिवसेनेने पोलिसांच्या आड भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. महिला कार्यकर्त्यांनाही त्यांनी सोडलं नाही.
शिवसेनेने सोनिया, वाड्रा जवळ केल्यानंतर त्यांना तेंडुलकर, साठे आणि आंबेकर परके वाटायला लागले, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी
मुंबईत सध्या सुरू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीचं निमित्त राम मंदिर प्रकरण असलं तरी या वादाला मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातं.
मुंबईत पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये सध्याच्या महापालिकेची मुदत संपते.
निवडणुकीला एका वर्षापेक्षाही कमी कालावधी उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्याच्या तयारीला लागल्याचं दिसून येतं.
त्यातही मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतच प्रमुख लढाई असल्याचं सांगितलं जातं. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. पण अटीतटीच्या लढतीत सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आलं होतं.
त्यावेळी निवडणुकीनंतर भाजपने तटस्थ भूमिका घेतली होती. त्यावेळी दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत एकत्र होते. पण दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपची साथ सोडून दोन्ही कांग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलल्याचं दिसून येतं. याचे पडसाद आगामी काळात मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये दिसू शकतात, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























