अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे #5मोठ्याबातम्या

रावसाहेब दानवे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे

गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मारला आहे.

महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना 'पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,' असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावलाय.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रावसाहेब दानवे बोलत होते.

मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि अजित पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर 2024मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचंही दानवेंनी म्हटलंय.

2. कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. यापैकी 1 लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एजन्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचं समोर आलंय.

कुंभ

फोटो स्रोत, REUTERS/Anushree Fadnavis

लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.

हरिद्वारमध्ये एकाच घरातून 50 जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचं उघडकीला आलंय, तर एकच अँटीजेन किट 700 चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याचंही या बातमीत म्हटलंय.

या चाचण्यांसाठी खोटे फोन नंबर्सही देण्यात आले असून कानपूर, मुंबई आणि अहमदाबादसह इतर काही ठिकाणच्या लोकांच्या नावापुढे एकच फोन नंबर देण्यात आल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

3. इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करावं अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी आणि पुतळा प्रतिकृती नक्की करण्यासाठीच्या समितीचं लवकरच पुनर्गठन करण्यात येणार असल्याचंही मुंडेंनी म्हटलंय.

ambedkar

टीव्ही 9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे.

बाबासाहेबांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम दर्जेदार व्हावं याकडे लक्ष द्यावं आणि कामाच्या सध्याची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या आहेत.

4. ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर

कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना आढावा आणि नियोजन बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

फलटणमध्ये 200 बेडचं जम्बो कोव्हिड हॉस्पिटल उभाण्याबाबतचा निर्णय घेऊन पुढच्या 15 दिवसांत हे हॉस्पिटल उभारण्याच्या सूचनाही या बैठकीदरम्यान देण्यात आल्या.

ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कोरोना सेंटर्समध्ये रुग्ण नाहीत म्हणून ही उपचार केंद्र बंद न करण्याच्या सूचना निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

5. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण

पुणे शहरासह जिलह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. पुणे शहरात 63 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून ग्रामीण भागामध्ये 33 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images /RICARDO ARDUENGO

16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेमध्ये आतापर्यंत 57 लाख 44 हजार 664 नागरिकांनी लशीचा डोस घेतलाय. यापैकी 24 लाखापेक्षा जास्तजणांनी पहिला तर 6. 41 लाख जणांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)