कोरोना व्हायरस : राज ठाकरे म्हणतात, 'राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविथ वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा - राज ठाकरे
"देशात एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट उभं असताना राजकीय पक्ष राजकारण करण्यात, निवडणुका घेण्यात मश्गुल आहेत. बाहेर गंभीर परिस्थिती असूनसुद्धा लोकांना मतदानासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं जातं," अशी खंत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. लोकसत्ताने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले विचार प्रकट केले.
"लोक असतील, तर आपण आहोत. त्यामुळे सध्या काही दिवस राजकारण गेलं तेल लावत, आधी लोकांना कोरोनातून बाहेर काढा," अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
"कोरोनातून लोकांना मानसिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यावर काय उत्तर आहे याची कोणाला कल्पना नाही. मात्र, दुसरीकडे गोव्याच्या निवडणुका लागल्या, मुंबई पालिकेच्या निवडणुका लागल्यात हे ऐकायला मिळाल्यानंतर वीट येतो," असं राज ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, "जगावर कोरोना संकट आलं तेव्हा कुणालाच त्याची कल्पना नव्हती. हे हाताळताना अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले. मात्र आपण अजूनही तिथंच आहोत. दुसरी लाट येणार, याची कल्पना असूनही देश सावध राहिला नाही. राजकारणी, सत्ताधारी सतर्क राहिले नाहीत. त्यामुळे 2020 पेक्षाही 2021 मध्ये ही भयानक परिस्थिती निर्माण झाली."
"इथे लोक स्थिर नाहीत, मानसिकता तशी नाही आणि निवडणुकीचे विचार होत आहेत. समाज राहिला तर निवडणुका आहेत. लोक मनाने स्थिर असतील तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे, अन्यथा त्यांचं काय करायचं. अस्थिर मन स्थिर होण्यासाठी सर्वांत जास्त प्रयत्न होणं गरजेचं आहे. हे प्रयत्न राजकारण्यांकडून होतील अशी सर्वांत मोठी अपेक्षा आहे. समाज स्थिर कसा होईल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. जर त्यांनी तो प्रयत्न केला नाही तर राजकारणी होते तर तसेच राहतील," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
लोकसत्तामार्फत आयोजित 'दृष्टी आणि कोन' कार्यक्रमादरम्यान मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
2. चोराचा प्रतिकार करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
लोकलमध्ये मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोराचा प्रतिकार करताना पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान ही घटना घडली.
विद्या पाटील असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून त्या 35 वर्षांच्या होत्या. त्या डोंबिवली येथील रहिवासी होत्या. विद्या यांना 3 मुलंही आहेत.
रेल्वे पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, विद्या पाटील यांनी सोमवारी सायंकाळी 7 वाजता कुर्ला येथून लोकल पकडली. त्या दरवाजाशेजारीच एका बाकावर बसलेल्या होत्या. सव्वासातच्या सुमारास आरोपी फैजल शेखने त्या लोकलमध्ये प्रवेश केला.
गाडी सुरू होताच त्याने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्या यांना त्याचा प्रतिकार करत त्याला पकडलं. सराईत फैजलने पाटील यांना धक्का देत लोकलमधून उडी टाकली. पण या झटापटीत विद्या पाटील यासुद्धा दारातून खाली पडल्या आणि चाकाखाली आल्या. हे निदर्शनास येताच प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
CCTV फुटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी फैजलची ओळख पटवली. फैजलवर यापूर्वीचे चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे दाखल आहेत. सापळा रचून फैजलला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. ही बातमी टाईम्स नाऊने दिली आहे.
3. राज्यातील खासगी रुग्णालयांमधील दर राज्य सरकारकडून निश्चित, ग्रामीण भागाला दिलासा
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका नागरिकांना बसला होता. रुग्णांना खासगी रुग्णालयात भरमसाठ खर्चाला तोंड द्यावं लागत होतं. हे निदर्शनास येताच राज्य सरकारने राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या दरांवर नियंत्रण आणलं आहे.
येथील दर राज्य सरकारने निश्चित केलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत अधिसूचनेला मंजुरीही दिली आहे.

फोटो स्रोत, Maharashtra government
खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. मंगळवारी त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या अधिसूचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अतिदुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारचे भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
4. मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज द्या, आशिष शेलार यांची मागणी
महाविकास आघाडीने मराठा समाजाला EWS आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांचं काहीही कर्तृत्व नाही. हे आरक्षण मोदी सरकारने दिलं होतं. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज द्यावं, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

फोटो स्रोत, facebook
गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळालं. मात्र, आघाडी सरकारनं EWS आरक्षण जाहीर केलं.
जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल.EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ला मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या. यासाठी 3 हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावं, असं शेलार म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार, बाबा रामदेव यांचा दावा
पतंजलीकडून ब्लॅक फंगसवरील औषधाचं आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. कितीही वाद उद्भवला तरी सेवाकार्य करतच राहणार आहोत. पुढील एका आठवड्याच्या आत ब्लॅक, व्हाईट आणि येलो या सर्व फंगसचं औषध उपलब्ध करून देणार आहोत, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
"IMA कोणतीही सायंटिफिक व्हॅलिडेशन बॉडी नाही. त्यांच्याकडे ना कुठली लॅब आहे, ना कोणते शास्त्रज्ञ आहेत. ती फक्त एक NGO आहे, कोरोनिल प्रमाणित नसल्याचं सांगत खिल्ली उडवण्यात आली, योग आणि आयुर्वेदाचा अनादर झाला आहे," असं बाबा रामदेव म्हणाले.
नुकतेच अॅलोपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून बाबा रामदेव वादात सापडले होते. त्यावरून नाराज झालेल्या संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केलेली आहे. त्यानंतर आता आणखी एका वादाला तोंड फुटल्याचं दिसून येतं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























