कोरोना: मुंबई पालिकेच्या कोव्हिड सेंटरवरून पालिका आणि मनसे आमनेसामने

- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबईतील BKC कोव्हिड सेंटरच्या ICU मध्ये एक MBBS डॉक्टर असून, बाकी डेंटिस्ट नेमण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय.
मुंबई महापालिकेने एक पत्रक जाहीर करत मनसेचे आरोप फेटाळून लावलेत, "बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये योग्य पात्रता आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत," असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलंय.
कोव्हिड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असताना, पात्रताधारक डॉक्टर उपस्थित नाहीत असा मनसेचा आरोप आहे.
BKC कोव्हिड सेंटरच्या अनागोंदी कारभाराबाबत येत्या आठवड्याभरात परिस्थिती न सुधारल्यास आंदोलन धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय मनसेने दिला आहे.
ICU मध्ये फक्त एक MBBS डॉक्टर?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी बीकेसी कोव्हिड सेंटरबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टरांची यादी दाखवत मुंबई महापालिका प्रशासनावर आरोप केले.

संदीप देशपांडे यांनी BKC कोव्हिड सेंटरच्या ICU मधील व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या व्यक्तीकडून ही यादी मिळाल्याचा दावा केला. ते म्हणाले, "या यादीनुसार कोव्हिड सेंटरच्या ICU मध्ये फक्त एक MBBS डॉक्टर आहे आणि बाकीचे डेंटल डॉक्टर आहेत."
मुंबई महापालिकेने मनसेचे आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलं.
महापालिकेच्या माहितीनुसार, "अतिदक्षता (ICU) विभागात कार्डियाक हेल्थ केअर (cardiac health care) ह्या संस्थेची बाह्य सेवा तत्त्वावर, आवश्यक कार्यवाही पूर्ण करूनच नेमणूक करण्यात आली."
मनपानुसार अतिदक्षता विभागातली स्थिती
- 21 सल्लागार (एमडी व तत्सम) आहेत
- 54 निवासी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस/बीएचएमएस) आहेत
- 95 परिचारिका आहेत
- 18 तंत्रज्ञ (आयसीयू टेक्निशियन) आणि 70 रुग्ण काळजी सहाय्यक आहेत.
कोव्हिड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नाहीत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केलाय.
संदीप देशपांडे म्हणतात, "कोव्हिड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांसाठी हृदयविकारतज्ज्ञ, डायबिटीसवर उपचारासाठी डायबेटोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट असणं आवश्यक आहे. पण, या सेंटरमध्ये कोणताच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नाही."

फोटो स्रोत, Getty Images
यावर मुंबई महापालिकेने बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये अनुभवी मनुष्यबळ असल्याचा दावा केलाय.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,
- बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये 30 वैद्यकीय सल्लागार (MD- इतर) तर, 18 MBBS डॉक्टर्स आहेत
- 15 बीएएमएस (BAMS) तर 93 बीएचएमएस (BHMS) डॉक्टर्स आहेत
- तर प्रशासकीय कामासाठी 14 बीडीएस (डेंटिस्ट) डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे
- यासोबत 308 परिचारिका आणि 399 वॉर्डबॉय-गर्ल आहेत

फोटो स्रोत, Getty Images
पण, "हे सल्लागार डॉक्टर कुठे काम करतात? जंबो कोव्हिड सेंटरमध्ये केव्हा उपचार देतात याबाबत माहिती नाही," असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या दाव्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना खालील मुद्दे विचारात घेतले जातात.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव पाहिल्यानंतर केली जाते
- मुलाखत घेऊन या डॉक्टरांना घेतलं जातं
- कोव्हिड सेंटरमध्ये योग्य पात्रता आणि अनुभवी कर्मचारी आहेत
बीकेसी कोव्हिड सेंटरमधील ज्या कर्मचाऱ्याने आम्हाला डॉक्टरांची लिस्ट दिली. त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा आरोप मनसेने केला आहे. आम्ही मनसेने दावा केलेल्या कर्मचाऱ्याला फोनकरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, आमचा संपर्क होऊ शकला नाही.
बीकेसी कोव्हिड सेंटरमधील गोंधळाबाबत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याबाबत लक्ष घालण्याची मागणी मनसेने केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























