कोरोना: नवाझुद्दीन सिद्दिकी भडकला, 'लोकांकडे जेवण नाही, तुम्ही इतका खर्च करताय' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. 'लोकांकडे जेवण नाही, तुम्ही इतका खर्च करताय, लाज बाळगा'
देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत असताना चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि सेलिब्रिटी देश सोडून सुट्या घालवण्यासाठी मालदीवला रवाना होत आहेत. यावर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने टीका केली आहे.
हे कलाकार अशावेळी सुट्यांवर जात आहेत. फोटो पोस्ट करत आहेत. जेव्हा संपूर्ण देश संकटात आहे. लोकांकडे जेवण नाही आणि तुम्ही एवढा खर्च करत आहात. काही तरी लाज बाळगा.'
'या लोकांनी मालदीवला तमाशा लावला आहे. मला माहित नाही त्यांच ट्युरिझम इंडस्ट्रीसोबत असं काय नातं आहे? मात्र माणुसकीच्या नात्यातून तरी आपल्या सुट्या आणि त्यांचे फोटो स्वतःजवळच ठेवा ना. इथे प्रत्येकजण संकटात आहे.' ही बातमी झी 24 तासने दिली.
2. कोरोना महाराष्ट्र: पंढरपुरात कोरोना वाढण्याला नागरिकच जबाबदार - अजित पवार
निवडणूक आयोगाने पंढरपुरात निवडणूक लावली म्हणून आम्ही गेलो. आयोगाने दिलेल्या नियमावलीचं पालन करून आम्ही सभा घेतल्या. पण काहीजण मास्क लावत नव्हते. रुमाल लावायचे, त्यांना आम्ही काय बोलणार. पंढरपुरात कोरोना वाढण्याला नागरिकच जबाबदार आहेत. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
राज्यात एका बाजूला कोरोनाने थैमान घातलेलं असताना दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. याठिकाणी सर्वपक्षीय राजकीय नेते प्रचार करताना दिसून आले. सभांमध्ये मोठी गर्दीही दिसून आली. पण आता निवडणुकीनंतर पंढरपूरची परिस्थिती बिकट झाल्याचं निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पंढरपूर निवडणूक आणि कोरोना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
पवार म्हणाले, "राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या. त्या आम्ही पुढे ढकलल्या. पण पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांतही निवडणूक लावण्यात आली. तिथं सगळे नेते प्रचार करतच होते. कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी स्नान केलं. याला जबाबदार नागरिक आहेत. आयोगाने निवडणूक लावली पण त्यांना जबाबदार कसं धरणार?" ही बातमी लोकमतने दिली आहे.
3. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब आणि संजय राऊत यांची चौकशी करा - चंद्रकांत पाटील
परमबीरसिंग यांच्या पत्रप्रकरणावरून सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली. छापेमारीही करण्यात आली. त्याचप्रमाणे परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावरून उच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. त्याच प्रकारचे गंभीर आरोप सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केले आहेत.
अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदारांकडून 100 कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केला आहे, त्यामुळे परब यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी" असं पाटील म्हणाले.
तसंच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांचीही राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
4. नऊ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला - छगन भुजबळ
देशात ऑक्सिजनचा तुटवडा असून अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जात आहे. या परिस्थितीतही देशातून नऊ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवण्यात आल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Maharashtra dgipr
ऑक्सिजनची कमतरता सर्वच राज्यांत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक कोविडबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. अशावेळी ऑक्सिजन येथून परदेशात पाठवला जात असेल तर ती बाब गंभीर आहे.
लस निर्मितीसाठी कच्चा माल देण्याआधी अमेरिका प्रथम आपल्या जनतेचा विचार करत आहे आणि आपण मात्र परदेशात वाटप करत सुटलो आहोत, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. यावर अद्याप केंद्र सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
5. 'कोरोना रुग्णसंख्या भीतीदायक पण तरीही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'
देशभरात कोरोना संकट आणखी गडद होत चाललं असताना ऑक्सिजन, बेड, औषधांची कमतरता अशा विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दरम्यान देशात IPL स्पर्धाही सुरू आहे. या स्पर्धेवर बऱ्याच जणांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याचाही समावेश आहे. गिलख्रिस्टने ट्विट करून IPL स्पर्धेच्या आयोजनावर टीका केली.
"भारताला माझ्या शुभेच्छा. कोरोनाची रुग्णसंख्या भीतीदायक आहे.
तरीही IPL सुरू आहे. हे योग्य आहे का? प्रत्येक रात्री तुम्ही हे पाहून विचलित होता का? याबाबत आपले विचार काय आहेत. माझ्या प्रार्थना आपल्याबरोबर आहेत, असं अॅडम गिलख्रिस्टने म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























