कोरोना: नरेंद्र मोदी घेणार उद्या उच्चस्तरीय बैठक, पश्चिम बंगाल दौरा केला रद्द

मोदी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ही बैठक असल्यामुळे आपण पश्चिम बंगालमध्ये दौऱ्यावर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात निवडणुका पार पडत आहेत. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक रॅलीज घेतल्या आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेले त्यांचे दौरे रद्द केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील रॅली आपण रद्द करत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं.

याआधी सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की कोरोनाविरोधात लढण्याची सविस्तर योजना सादर करा. याच पार्श्वभूमीवर मोदींच्या या बैठकीची बातमी येत आहे.

कोरोनाविरोधात लढण्याची सविस्तर योजना सादर करा- सुप्रीम कोर्ट

देशातील कोरोना स्थितीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तुमची काय योजना आहे अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला केली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांचा तुटवडा, सोयी-सुविधांचा अभाव या गोष्टींची दखल घेतली. सध्याची स्थिती चिंताजनक आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले.

राज्यांना ऑक्सिजन पुरवण्याची योजना काय, औषधांची, लसीची स्थिती काय याबाबत केंद्राने निश्चित उपाययोजना करून पावले उचलावीत असं म्हटले आहे. याबाबतची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देशाला ऑक्सिजनची खूप गरज असल्याचं सांगितलं.

त्या दृष्टीने वेदांताचा प्लांट उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वेदांता आणि केंद्र सरकारकडून करण्यात आली. वेदांताची बाजू ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी मांडली.

कोरोना
लाईन

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेदांताचा प्लांट बंद करण्यात आला होता. पण सध्या लोक मृत्युमुखी पडत आहे. ते पाहून हा प्लांट सुरू करण्याची परवानगी द्यावी असं साळवे यांनी सांगितलं. जर परवानगी मिळाली तर पाच सहा दिवसात हा प्लांट सुरू करता येईल असंही ते म्हणाले.

या चार मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा - सुप्रीम कोर्ट

ऑक्सिजन, औषधी, आवश्यक इंजेक्शन आणि इतर आवश्यक गोष्टी यांचा पुरवठा कसा होईल, यावर लक्ष केंद्रित करावे असं सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे.

सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की देशातल्या विविध हायकोर्ट कोरोना स्थितीवर सुनावणी होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)